जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धुळ्यातही महाविकास आघाडी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:57 AM2019-12-04T11:57:27+5:302019-12-04T11:57:47+5:30
शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष हिलाल माळी यांचे प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही शिवसेना कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकविणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हिलाल माळी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेची मंगळवारी सायंकाळी जिल्हा कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख अतुल सोनवणे, विशाल देसले, दत्तु गुरव, आधार हाके, नेरचे सरपंच शंकरराव खलाणे आदी उपस्थित होते.
हिलाल माळी म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे.
आगामी काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसदर्भात कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसशी बोलणी करण्यात येईल. या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवून जिल्हा परिषद व पंचायत समितींवर भगवा फडकविणार आहे.
निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विशाल देसले, शंकरराव खलाणे, विलास चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीला देवराम माळी, धनंजय कासार, सुदर्शन पाटील, बाळासाहेब देसले, चंद्रकांत म्हस्के, महावीर जैन यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.