सरपंचांनी घेतली जि.प. शाळांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:49 PM2019-07-17T22:49:56+5:302019-07-17T22:50:16+5:30
जि.प. अध्यक्षांना निवेदन : चारपदे रिक्त, वर्गखोली व संरक्षक भिंतीची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : यशवंतराव
निजामपूर - साक्री तालुक्यात निजामपूर येथील ग्रामपालिकेच्या सरपंच सलीम पठाण यांनी सर्व जिल्हा परिषद शाळांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार उर्दू शाळेत रिक्त शिक्षक पदे, शाळा खोली, एका शाळेस वॉल कंपाउंड नसल्याची मागणी निजामपूर ग्रामपालिकेने जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदनाद्वारे केली आहे.
१३ जुलै रोजी निजामपूर ग्रामपालिका सरपंच सलीम पठाण यांनी निजामपूर येथील सर्व जि.प. शाळा व अंगणवाडी सेवीकांची बैठक बोलाविली होती. त्यांच्या समस्या, अडचणी आणि आवश्यक बाबींचा परामर्ष घेतला.
त्यानुसार त्या दूर करण्याच्या दृष्टीने जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांना बुधवार १७ जुलै रोजी सरपंच सलीम पठाण यांचेसह युसूफ सैय्यद, हाजी मियाबेग, शब्बीर पठाण, शहाबुद्दीन शेख, लियाकत सैय्यद,साबीर शेख यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आमदार डी.एस. अहिरे उपस्थित होते.
निजामपूर येथील उर्दू जि.प.शाळा येथे एक मुख्याध्यापक, दोन शिक्षक व एक विषय शिक्षक अशी एकूण चार पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ती पदे भरण्यात यावीत. तसेच शाळेला संरक्षक भिंत केली जावी.
निजामपूर पैकी इंदिरा नगर जि.प. मराठी शाळेला १ वर्गखोली व संरक्षक भिंत अत्यंत आवश्यक असल्याने ते लवकरात लवकर करण्यात यावे, अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.