१०० टक्के चिमणी पडणार ! ‘देवेंद्रपंतां’चा प्लॅन बी ठरला हेलिकॉप्टरमध्ये..
By सचिन जवळकोटे | Published: November 13, 2022 01:35 PM2022-11-13T13:35:10+5:302022-11-13T13:35:18+5:30
लगाव बत्ती...
सचिन जवळकोटे
सोलापुरी विमानाची हातघाई आता अंतिम चरणात पोहोचलेली. सोलापूरकरांच्या अंतर्मनाचा स्फोट हजारो सह्यांमधून होऊ लागलेला. हे पाहून अधिकारीही कामाला लागलेले; मात्र इथल्या ‘चिमणी’चा निर्णय दहा दिवसांपूर्वीच फायनल झालेला. सोलापूरच्या आकाशात घिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसून कारखान्याकडे बारीक नजरेनं बघत ‘देवेंद्रपंतां’नी तेव्हाच प्लॅन जाहीर केलेला. ‘चिमणी पडणार अन् विमान उडणार’. सोलापूरकरांसाठी ही खूप मोठी न्यूज. बिग ब्रेकिंग न्यूज. लगाव बत्ती..
- गेल्या शुक्रवारी ‘कार्तिकी एकादशी’ला पंढरपुरात ‘डीसीएम’च्या हस्ते शासकीय महापूजा झाली. त्यानंतर मंगळवेढा अन् बार्शीचा राजकीय दौरा करून ‘देवेंद्रपंत’ सोलापूरच्या विमानतळाकडं निघालेले. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत ‘सुभाषबापू’ अन् ‘कल्याणशेट्टी’ही. या हवाई प्रवासात अनेक विषयांवर चर्चा झालेली. अख्खा जिल्हा ‘कमळ’मय करण्यावर सर्वाधिक फोकस राहिलेला. पुढच्या वेळी अकराच्या अकरा आमदार ‘कमळा’वर निवडून आले पाहिजेत, यावरच अधिक जोर दिला गेलेला. मध्य, मोहोळ, माढा अन् करमाळ्यासारख्या ठिकाणी ‘पक्षाचा आमदार आणा किंवा पक्षाकडे आमदार आणा,’ याचीही जबरदस्त व्यूहरचना आखली गेली. हा होता ‘देवेंद्रपंतां’चा प्लॅन ए. खरी गंमत तर पुढं सुरु झाली.
- हेलिकॉप्टर सोलापूर शहरावर आलं, तेव्हा खाली विमानतळ दिसू लागलं. लगतची ‘चिमणी’ डोळ्यात खुपू लागली. होय.. चक्क खुपू लागली. ‘चिमणी’कडं रोखून बघत ‘पंतां’नी स्पष्टपणे इरादा जाहीर केला, ‘सोलापुरात तुम्हाला विमान उडवायचं असेल तर चिमणी पडली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाडलीच पाहिजे,’ हे ऐकून ‘सुभाषबापू’ चमकले. ‘सचिनदादा’ही दचकले. मात्र प्रत्येकाचे आनंद-दु:खाचे वेगवेगळे भाव दोघांच्याही चेहऱ्यावर नव्हते.
- कधी पाडायची, यावरही मग चर्चा रंगली. ‘हंगाम संपल्यावर पाडू,’ असा काहीसा रोख ‘पंतां’चा होता; मात्र ‘कॉमन पब्लिकचा दबाव प्रचंड वाढत चाललाय. निवडणुकीआधीच कार्यक्रम झाला तर बरं होईल.’ असा सूर शेजारून होता. मात्र ‘पंत’ काही अंत लागू देत नव्हते. यावरही ‘सचिनदादां’नी जुनी आठवण सांगितली. गेल्या निवडणुकीत ‘म्हेत्रेअण्णां’ना पार्टीत ‘घेणार-घेणार’ म्हणवत आपल्याला कसं शेवटपर्यंत टेन्शनमध्ये ठेवलं होतं, हेही त्यांनी रंगवून-रंगवून सांगताच ‘पंत’ ओठातल्या ओठात हसले. खरंतर ते गालातल्या गालात हसल्याचंही कधी समोरच्याला लवकर कळत नाही, हा भाग वेगळा. अखेर हेलिकॉप्टर खाली उतरलं. शेजारच्या विमानात बसून ‘पंत’ मुंबईला गेले. जातानाही नजर या ‘चिमणी’वरच होती. लगाव बत्ती..
- परवा मुंबईतल्या एका टॉप ऑफिसरची गुप्त व्हीसी मिटिंग सोलापूरच्या अधिकाऱ्यांसोबत झाली. ‘मोपलवारां’नी तिकडून खडसावून विचारलं, ‘आजपर्यंत का काढले नाहीत अडथळे?’ कलेक्टर म्हणाले, ‘माझ्याकडून सगळं ओके.’ मग कॅमेरा पालिका अधिकाऱ्याकडं वळाला. मात्र ‘शिवशंकर’ कोर्टाचं कारण सांगू लागले. मात्र ‘मोपलवारां’चा मूड पाहून त्यांनी डिक्लेर केलं, ‘दहा दिवसात नोटीस. दीड महिन्यात पाडापाडी.’ खेळ खल्लास. व्हीसी खतम. हे सारं ऐकून बाहेरच्या साध्या शिपायानंही काय ओळखायचं ते ओळखलं. सरळ टोपी तिरकी करत शेजारच्याला तो हळूच म्हणाला, ‘इगं चिमणी व्हैतु. यल्ला कार्यक्रम फिक्स ऐतू’. लगाव बत्ती..
- जाता-जाता : गेली अडीच-तीन वर्षे ‘थोरले काका बारामतीकरां’चं घरटं लाभलं म्हणून चिमणी वाचली. चार महिन्यांपूर्वी झाडच कोसळलं, घरटंही गायब झालं. प्रशासकीय यंत्रणाही लय हुशार. पाठ पाहून वारा घेणारी. जेव्हा पूर्वी ही चिमणी पाडायला ‘शिवशंकर’ निघाले होते, तेव्हा मुंबईहून याच अधिकाऱ्यांनी निरोप दिलेला, ‘चिमणीकडं दुर्लक्ष करा’. आता राज्यातलं सरकार बदललं. सत्तेतली माणसं बदलली. खुर्चीचं धोरणं बदललं. मग अधिकाऱ्यांचीही भूमिका बदलली. ‘शंभरकर’ काय अन् ‘शिवशंकर’ काय.. इतके दिवस सोलापूरकरांच्या ललाटावर ठेवलेला ‘हातोडा’ आता थेट ‘चिमणी’वर हाणतील. लक्ष फक्त तारखेकडं. तोपर्यंत लगाव बत्ती..
‘गुंडां’ची पाटीलकी !
- कृपया मथळा वाचून दचकू नये. यातील ‘गुंड’ हा शब्द ‘गुंडगिरी’शी संबंधित नाही. ते तर एक आडनाव. होय. ‘अनगरकर पाटलां’चं मूळ आडनाव. आता इतक्या दशकानंतर ते आडनाव आठवायला कारणीभूत ठरला त्यांच्याच भाषणाचा व्हिडीओ.
- ‘आम्हा पाटलांच्या पोरांना लग्नापूर्वीच पोरं होतात,’ असं जाहीर करणाऱ्या ‘अनगरकरां’नी ‘३०२ कलम आमच्या पोरांना सतरा वर्षांपासून ठाऊक,’ असंही ठणकावून सांगितलेलं. हा व्हिडिओ भलताच व्हायरल झालेला. सोशल मीडियावर ‘धुमाकूळ’ घालू लागलेला. ‘पाटलांची भाषा’ ही ‘गुंडांची परिभाषा’ बनल्याची टीका होऊ लागलेली; म्हणूनच आज आठवले ‘गुंड’.
- खरंतर ‘पाटलां’नी त्यांच्या पोरांविषयी जो गौप्यस्फोट केलाय, त्यातून अनेक नवे प्रश्न लोकांनीच उभे केलेले. त्यांच्या पोरांची पोरं कधी जन्माला आली ? कुठल्या दवाखान्यात आली ? त्यांची नावं काय म्हणून ठेवली ? पाटील म्हणून की गुंड म्हणून मोठी झाली ? बापरे बाप..लोकांच्या अचाट कल्पनाशक्तीला धरबंदच न राहिलेला.
- दुसरा मुद्दा ‘तीनशे दोन’चा. ‘पाटलां’ना आज सभेत आठवली सतरा वर्षांपूर्वीच्या खुनाची केस. मात्र त्या प्रकरणातून लाडक्या लेकराला सोडविण्यासाठी याच बापाची झालेली घालमेल किती जणांना ठाऊक ? कैक दिवस उपास-तापास करणाऱ्या माय-माऊलीचे नवस किती जणांना माहीत ? त्यावेळी बारा वाड्यांचे हे कर्तबगार ‘पाटील’ किती हतबल झाले होते, कुठल्या-कुठल्या नेत्यांचे उंबरठे झिजवत होते, किती जणांच्या पाया पडत होते, किती जणांसमोर हात जोडत होते, हे खूप कमी लोकांना ठाऊक. ‘आम्ही असल्या साऱ्या गोष्टींना पूर्वीच सामोरं गेलोय,’ असं कदाचित सांगायचं असावं ‘पाटलां’ना. मात्र त्यांच्या भाषणानंतर लोकांना आठवली मोहोळची ती जाळपोळ, ती दंगल.
- खरंतर, एका ‘पाटला’ची ही ‘तीनशे दोन’ची भाषा असावी कदाचित ‘दोन्ही लेकरांच्या कर्तृत्वा’ला साजेशीच. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘अनगर’चं नाव उंचावू पाहणाऱ्या ‘पायलट लेकी’च्या पित्याला नक्कीच न शोभणारी, अशीही भावना कैक कुटुंबवत्सल नेटकऱ्यांमधून उमटलेली.
- गंमत म्हणजे, ज्या ‘म्हाडकां’ना उद्देशून ‘पाटलां’नी इशारा दिला, त्यांनीही आजपर्यंत ‘कोल्हापुरी भाषा’ पुरती कोळून पिलेली. भलेही ते इथल्या सभांमध्ये ‘सभ्य’ भाषेत बोलत असले तरी त्यांचीही कोल्हापूरच्या ‘बावड्या’तली भाषा वेगळी असते, हे अनेकांना चांगलंच ठाऊक.
- ता. क. : ‘पाटलांची भाषा’ राज्यभर पेटल्यानं आता मोहोळमध्ये त्यांच्याच काही कट्टर कार्यकर्त्यांसमोर नवा प्रश्न उभा ठाकलाय. आगामी ‘कमळ’ प्रवेश’ सोहळ्याला तर यामुळं बाधा येणार नाही नां म्हणे. आता त्या भोळ्या कार्यकर्त्यांना कुणी सांगावं की, जिथं ‘परिचारकांचा मिलिटरी जोक’ पचवला जातो, तिथं ‘पाटलांची लग्नाआधीची पोरं’ का नाही सहन केली जाणार ? लगाव बत्ती..