मृत्यूनंतर १०० वर्षे उलटली, तरी अमर असलेला 'रयतेचा राजा'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:44 AM2021-05-06T01:44:03+5:302021-05-06T01:44:48+5:30
दु:ख-दारिद्र्य, अज्ञान-अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करीत मानव कल्याणाचे ‘नवे माॅडेल’ आकाराला आणणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपतींचे कृतज्ञ स्मरण!
वसंत भोसले
ज्येष्ठ संशोधक धनंजय कीर यांनी ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या चरित्र ग्रंथाच्या प्रस्तावनेत खूप महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत. ते म्हणतात, “राजर्षी शाहू छत्रपती ही एक अष्टपैलू महान व्यक्ती होती. हिंदी शास्त्रीय संगीताचा एक उत्साही पुरस्कर्ता, मराठी रंगभूमीचा एक प्रमुख शिल्पकार, मल्लविद्येचा एक मोठा आधारस्तंभ नि आधुनिक महाराष्ट्राचा एक निष्ठावंत भाग्यविधाता अशा महत्त्वाच्या विविध भूमिका त्यांनी यशस्वीरीत्या वठविल्या; परंतु त्यांनी भारतात नवसमाजनिर्मितीसाठी एक समाज क्रांतिकारक नेता म्हणून जी महान कामगिरी केली, ती संस्मरणीय व ऐतिहासिक महत्त्वाची ठरली.” राजर्षी शाहू छत्रपती यांच्या निधनाला आज, गुरुवारी (६ मे) ९९ वर्षे होऊन त्यांच्या स्मृतीचे शताब्दी वर्ष सुरू होते आहे. पुढील वर्षी या तारखेस जाऊन राजर्षी शाहू छत्रपती यांना शंभर वर्षे होतील. केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कोल्हापूरच्या छत्रपतींनी केवळ समाजक्रांती केली नाही, केवळ नव शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी खुली केली नाहीत, तर त्या वेळच्या समाजातील दु:ख, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करीत मानवी कल्याणाच्या विकासाचे एक नवे माॅडेल मांडले. संपूर्ण भारतात अशा प्रकारचे माॅडेल मांडणारा आणि ते कृतीत आणणारा एकमेवाद्वितीय राजा राजर्षी शाहू छत्रपतीच आहेत. नव्या पिढीची जडणघडण होण्यासाठी शिक्षणापासून रोजगारापर्यंत आणि व्यापारापासून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यापर्यंतची दृष्टी या राजाकडे होती. त्यामुळेच आजही राजर्षी शाहू छत्रपती यांचे विकासाचे माॅडेल कालबह्य ठरत नाही. प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर शाश्वत उपाय योजले पाहिजेत, हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी प्रसंगी परंपरावादी विचारांशी मुकाबला केला. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावरदेखील संघर्षाची तमा केली नाही. अनेक हल्ले परतवून लावले. प्रत्येक समस्येवर स्वार होऊन सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग कधी सोडला नाही.
राजे कधी राजवाड्यावर ऐषोरामात राहिलेच नाहीत. त्यांनी सामाजिक संघर्ष केला तसा आर्थिक प्रगती साधण्यासाठीदेखील केला. कारखाने उभारले, औद्योगिक वसाहती निर्माण केल्या, व्यापारासाठी बाजारपेठा वसविल्या. शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. एवढेच नव्हे, तर चांगले पशुधन तयार व्हावे यासाठी संकराचे प्रयोगही केले. नवी पिके आणि पीक पद्धती आणण्यासाठी धडपड केली. औद्योगिक, तसेच कृषी प्रदर्शने भरविली.
हे सर्व करण्यासाठी आणि ते काम शाश्वत होण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असते. शिक्षणासाठी शाळा, वसतिगृहे, चांगले शिक्षक, अधिकारी असावे लागतात. लोकसहभाग वाढविण्यासाठी जागृती करावी लागते. शेतीसाठी पाणी लागते. आपल्या संस्थानात धरण आणि तलावाची साखळीच त्यांनी निर्माण केली होती. त्यापैकी राधानगरीचे धरण आणि अनेक तलाव आजही उपयोगात आहेत, त्याला शंभर वर्षांहून अधिक वर्षे झाली. रस्ते, रेल्वे आणि गिरण्या आदींचा पाया घातला. आर्थिक सुधारणा करताना समाजाची साथ मिळाली नाही आणि सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत, तर त्यांचा लाभ उपेक्षितांना मिळणार नाही. म्हणून सनातन्यांशी संघर्ष करीत सामाजिक सुधारणांचे अनेक पुरोगामी कायदे केले. कौंटुबिक हिंसाचारापासून स्त्रियांना संरक्षण मिळायला हवे, यासाठी कायदा करणारा हा राजा एकमेवाद्वितीयच!
शिक्षण हा माणसांच्या सुधारणेचा पाया आहे, हे त्यांनी ओळखले होते. स्पृश्य-अस्पृश्याची जळमटे समाजविरोधी आहेत, हे त्यांनी जाणले होते. मुंबई मुक्कामी त्यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले; पण त्यांनी समाजाला दिलेल्या विकाससूत्राचे किंबहुना विकासाच्या मॉडेल्सचे महत्त्व तसूभरही आजही कमी झालेले नाही. त्यामुळेच राजर्षी शाहू छत्रपती यांचे स्मरण करताना त्यांच्या विचारधारेचे जतनही करावे लागते. कोल्हापूर संस्थानाचा डंका साऱ्या भारतवर्षात नेहमीच वाजत राहिला, याचे कारण शंभर वर्षांपूर्वी त्यांनी ज्या आधुनिक विचारधारेचा आग्रह धरला तो आजही आवश्यक आहे. कोरोना संसर्गसाथीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू छत्रपती यांनी १९१७ मध्ये प्लेगच्या साथीच्या वेळी अलगीकरणाचा प्रयोग करून ही साथ आटोक्यात आणली होती. रोजी-रोटी बुडाल्याने लोकांची व्यवस्था त्यांनी संस्थानच्या तिजोरीतून केली होती. प्रचार-प्रसाराचा मार्ग हाताळला होता. उत्तम आरोग्यसेवा आणण्याचा प्रयत्न केला होता. राजर्षी शाहू छत्रपती आज शंभर वर्षांनंतरही पदोपदी स्मरणात येतात. त्यांच्या विचारांचे जतन करावे आणि समाजाच्या सर्वसमावेशक विकासाचे जे मॉडेल त्यांनी मांडले त्याचे जतन करावे, त्याचा विस्तार आजच्या राज्यकर्त्यांनी करावा, अशी अपेक्षा ठेवून राजर्षी शाहू छत्रपती यांच्या ९९ व्या स्मृतीस विनम्र अभिवादन!