स्वातंत्र्यसूर्य: १५ स्वातंत्र्यसेनानींचा निजामाच्या 500 पोलिसांवर हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:12 AM2022-08-25T07:12:46+5:302022-08-25T07:13:22+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळातील हा थरार आहे. परंडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेंद्री रेल्वे स्टेशनवर भाई उद्धवराव पाटील आणि त्यांच्यासमवेत १५ तरुण सेनानींनी निजामाच्या ५०० पोलिसांच्या तुकडीवर भरदिवसा हल्ला केला.
स्वातंत्र्यपूर्व काळातील हा थरार आहे. परंडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेंद्री रेल्वे स्टेशनवर भाई उद्धवराव पाटील आणि त्यांच्यासमवेत १५ तरुण सेनानींनी निजामाच्या ५०० पोलिसांच्या तुकडीवर भरदिवसा हल्ला केला. अवघी ४० ते ५० काडतुसे, दोन रायफली इतकीच हत्यारे. समोर मात्र ५०० पोलिसांची सशस्त्र तुकडी. अचानक झालेल्या या हल्ल्याने निजाम पोलीस तुकडी हादरली. पिंपरी, भोईजी येथील पंडितराव पाटील यांच्या वाड्यात आश्रयासाठी घुसली. भाई जी. डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली तरुण क्रांतिकारक सैनिकांनी वाड्यावर हातबॉम्ब फेकले. त्यामुळे निजाम पोलिसांची झोप उडाली. हल्ला करून भूमिगत होणाऱ्या सेनानींचा पाठलाग करण्याची अपयशी धडपड निजाम पोलिसांनी अनेकदा केली. शेवटी स्वातंत्र्यसेनानींसमोर हार पत्करत वाड्यातून निजाम पोलीस बाहेर पडले.
- भाई उद्धवराव पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी जी. डी. लाड यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन असे कैक सशस्त्र लढे दिले. हैदराबाद संस्थानातील प्रदेश एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत होता. एकीकडे देशातून ब्रिटिशांविरुध्द ‘चले जाव’चा नारा दिला जात होता. त्याचवेळी हैदराबाद संस्थानातील जनता जुलमी निजाम राजवटीविरुद्धही लढा देत होती. हा लढा राजकीय होता. मात्र, काही प्रसंगांमध्ये त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला. ज्यामुळे निजामाविरुद्ध संताप व्यक्त करताना काहीजणांनी स्थानिक निरपराध, अल्पसंख्याकांनाही लक्ष्य केले. संतांची भूमी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात गुण्यागोविंदाने सर्व जाती-धर्माचे लोक नांदत होते. अशावेळी समाजस्वास्थ्य बिघडू नये म्हणून एकीकडे सशस्त्र लढा, तर दुसरीकडे समाज प्रबोधनाचा धडा समजावून सांगण्याचे कार्य भाई उद्धवराव पाटील आणि तरुण क्रांतिकारकांनी केले.
निजामावरचा राग निर्दोषांवर काढू नये, यासाठी विविध धर्माच्या वस्त्यांमध्ये मुक्काम केले. प्रसंगी त्यांना संरक्षण पुरविले. शत्रू कोण आणि लढा कोणाविरुद्ध आहे, हे समजावून सांगणारे भाई उद्धवराव यांच्यासारखे धुरीण केवळ राजकीय स्वातंत्र्याचे नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार ठरले. जुलूम करणाऱ्या पोलिसांवर हातबॉम्ब फेकले. रायफली चालविल्या. मात्र, त्याचवेळी शतकानुशतके आपल्यासोबत राहणाऱ्या सर्वधर्मीयांची काळजी घेणारे सेनानी होते, हे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे वैशिष्ट्य आहे.
पुढच्या काळात भाई उद्धवराव पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राहिले. आमदार, खासदार आणि विरोधी पक्षनेतेपद भूषविले. शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले.
हैदराबाद मुक्तिसंग्रामात लातूर जिल्ह्यातील नागरसोगा येथील डॉ. देवीसिंग चौहान गुरुजी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. १९४३ च्या काळात गुरुजींची वकिली उत्तम सुरू होती. त्यावेळी स्वातंत्र्यसेनानी बाबासाहेब परांजपे यांच्या सूचनेवरून महिना १२०० रुपयांची मिळकत सोडून २०० रुपये मानधनाच्या मुख्याध्यापक पदावर रुजू झाले होते. दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र झाला; परंतु हैदराबाद संस्थानातील मराठवाडा अजूनही निजामाच्या पारतंत्र्यात होता.
दि. १५ ऑगस्ट रोजी देवीसिंग गुरुजींनी उमरगा येथे तिरंगा फडकविला. त्यामुळे त्यांची उस्मानाबादच्या तुरुंगात रवानगी झाली. त्यावेळी तुरुंगातून बाहेर पडून सशस्त्र लढ्यात सहभाग घ्यावा, अशा सूचना तरुण क्रांतिकारकांना होत्या. परिणामी, देवीसिंग गुरुजींनी श्रीनिवास अहंकारी यांच्यासमवेत पलायन केले; परंतु पहारेकऱ्यांनी पाठलाग करून गुरुजींना पकडले आणि पुन्हा तुरुंगात डांबले. देवीसिंग गुरुजी ऋग्वेदाचे भाष्यकार, मराठी व दक्खिनी हिंदीचे, इराणी सांस्कृतिक संबंधाचे संशोधक होते. द्विभाषिक मुंबई राज्यात शिक्षण खात्याचे ते उपमंत्री होते. ज्येष्ठ साहित्यिक, ध्येयनिष्ठ शिक्षक, स्वातंत्र्यसेनानी असा त्यांचा लौकिक होता.
उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील देवीसिंग चौहान गुरुजी, भाई उद्धवराव पाटील यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसेनानींनी गावोगावी जुलमी राजवटीचा सामना केला. अनेकांनी भूमिगत राहून लढा दिला. विशेष म्हणजे महिला, शालेय विद्यार्थीही लढ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होते. तरुणांनी तर निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या. निजाम पोलिसांचा बंदोबस्त केला. त्याचवेळी सर्वसमाजात, धर्मा-धर्मात कटुता येणार नाही, यासाठीही स्वातंत्र्य सैनिकांनी बजावलेली सामाजिक भूमिका इतिहासात ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
- प्रा. रवि सुरवसे, उस्मानाबाद