२०२० हे नवे ‘स्वातंत्र्य वर्ष’ : या वर्षाचे कृतज्ञ राहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 01:52 AM2020-10-03T01:52:31+5:302020-10-03T01:52:52+5:30
घेतलेले ड्रेसेस, चप्पला, बूट वापरलेलेच नाहीत. सपात्या घातल्या की झाले ! काय करायचे ते करा. स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. मास्क मात्र हवाच, साबण-सॅनिटायझर वापरा, सतत हात धुवा, सहा फुटांचे अंतर राखा..
डॉ. विजय पांढरीपांडे।
ब्रिटिशांच्या गुलामीतून आपल्याला पहिले स्वातंत्र्य मिळाले ते १९४७ साली. सात दशके हे स्वातंत्र्य आपण भलेबुरेपणाने उपभोगले. या काळात काय कमावले, काय गमावले हा वेगळा विषय; पण आता २०२० साली आपल्याला पुन: नवे स्वातंत्र्य मिळाले. आधीचे स्वातंत्र्य लौकिकार्थाचे आणि आताचे स्वातंत्र्य आपल्याला सर्वार्थाने मुक्त करणारे, स्वत:च स्वत:चा शोध घ्यायला लावणारे. प्रश्नामागे धावण्याऐवजी उत्तरांचा शोध घ्यायला लावणारे; एका दृष्टीने आध्यात्मिक स्वातंत्र्य! पूर्वी रस्त्यावर गर्दी असायची, माणसाची, वाहनांची. श्वास घेणे कठीण. या कोरोनाने दिलेल्या स्वातंत्र्यात (काही काळ) रस्त्यावरची गर्दी गेली. वाहने कमी झाली. प्रदूषण पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाले. माणसे श्वास घ्यायला मोकळी झाली. मुलांना शाळेचं बंधन नाही. आॅफिसची बंधनेही सैलावलेली. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना कामाच्या वेळेपासून काम करताना घालायच्या पोषाखापर्यंत सगळ्याचेच स्वातंत्र्य!
घरची कपाटे आधी घेतलेल्या, गरज असलेल्या, नसलेल्या पोशाखांनी भरली आहेत. महिनोन्महिने अनेकांनी नीट पोशाख केलेलाच नाही. आवडीने
घेतलेले ड्रेसेस, चप्पला, बूट वापरलेलेच नाहीत. सपात्या घातल्या की झाले ! काय करायचे ते करा. स्वातंत्र्यच स्वातंत्र्य. मास्क मात्र हवाच, साबण-सॅनिटायझर वापरा, सतत हात धुवा, सहा फुटांचे अंतर राखा... तेव्हढेच काय ते बंधन! बाकी फुल फ्रीडम. कोरोनाने सगळ्या जगाला एकत्रच भीतीच्या खाईत लोटले. तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, पहेलवान असा, डॉक्टर-इंजिनिअर असा, आमदार-खासदार असा, काही फरक पडत नाही. शेवटी मृत्यूची भीती सगळ्यांना सारखीच आहे. संपत्ती जमवण्याचा केवढा सोस माणसाला; पण आज तो सोसच निरर्थक होऊन बसला आहे. भरोसाच नाही कशाचा, आपल्या जिवाचादेखील ! गुलामासारखे मरमर मरून, कष्ट करून कमावले हे सारे. पण कमावले त्याचा उपयोग करण्याचे साधन, औचित्यच उरलेले नाही आपल्याकडे. आपल्यानंतर आपण कमावलेल्या मालमत्तेचे, पैशा-अडक्याचे प्रयोजन काय; याची चरचरती जाणीव या वर्षाने दिली, तशी याआधी कधी झाली नव्हती हे नक्की ! अखंड मौजमजेची हाव, त्यासाठी शोधलेले किती चोचले आणि किती एक मार्ग! आपली मुलेही आपल्यासारखीच चैनचंगळीला सोकावलेली! अखंड खाणे-पिणे, फिरणे, खरेदी, हाव, लालसा, स्पर्धा.. गेले काही महिने यातले काहीच केले नाही आपण. काहीच उपभोगले नाही.
दार उघडे, रस्ते मोकळे, तरी आपण बाहेर जात नाही. एक विषाणू, जो कुठून, कसा आला, कधी-कसा जाणार, केव्हा जाणार; कुणालाच काहीही माहिती नाही, अशा विषाणूने आपल्याला नवा धडा शिकवला. स्वातंत्र्याचा खरा अर्थ शिकवला. स्वातंत्र्य म्हणजे हवे तसे वागणे, हवे ते खाणे पिणे, हवे ते बोलणे, मर्जीनुसार हवे ते करणे एवढेच अभिप्रेत होते आपल्याला. कोरोनाने, लॉकडाऊनने सारे बदलले. आपण ज्यामागे धावत होतो ते मृगजळ होते हे समजले. नात्याची-दोस्तीची किंमत कळली. मुख्य म्हणजे मदतनीसांचे महत्त्व समजले. कुणी लहान नाही, मोठा नाही, वरिष्ठ- कनिष्ठ नाही. आपण एकाच बोटीतले प्रवासी, साधी माणसे आहोत, ही जाण या नव्या स्वातंत्र्यवर्षाने आपल्याला दिली.
२०२० हे नवे स्वातंत्र्य-वर्ष आपल्या आयुष्यात आले. डॉ अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्रज्ञांनी, बुद्धिवंतांनी २०२० हे वर्ष अनेक उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य वर्ष ठरवले होते. त्या उद्दिष्टांपैकी काय, किती साध्य झाले हा अर्थातच संशोधनाचा विषय. पण एका वेगळ्या अर्थाने हे वर्ष नव्या आगळ्यावेगळ्या उद्दिष्टाचे सार्थक वर्ष ठरले हे निश्चित. आपली दिशा-दशा बदलणारे ठरले. आपल्या डोळ्यात अंजन घालणारे वर्ष, आपल्याला नवी दृष्टी देणारे वर्ष. आपल्याला आपला खरा चेहरा दाखवणारे वर्ष. फक्त शरीर अन् शरीराच्या गरजा महत्त्वाच्या नाहीत; तर या शरीराच्या आत जे मन आहे, मनात जे विचार आहेत, त्याचेही आरोग्य सांभाळणे जास्त महत्त्वाचे. जगण्यासाठी फक्त शरीर महत्त्वाचे नसते; ते तर क्षणभंगुर. मनाचे, विचारांचे आरोग्य, विकारांचे नियमन जास्त महत्त्वाचे. २०२० या स्वातंत्र्य वर्षाने हे सारे आपल्याला शिकवले. जगाला सार्वत्रिक भीतीच्या खाईत लोटणाºया कोरोनाचे हे ‘बाय प्रॉडक्ट’ काही कमी महत्त्वाचे नाही. बाकी घसरलेल्या सर्व गाड्या यथावकाश रुळावर येतीलच. त्याची चिंता नको.
(लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आहेत)