२७ सभा, प्रचंड गर्दी; पण अपेक्षित चमत्कार नाहीच

By admin | Published: October 20, 2014 01:24 AM2014-10-20T01:24:22+5:302014-10-20T01:24:22+5:30

विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याइतपत यश मिळाले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर मोठा चमत्कार घडेल, हा भाजपा नेत्यांचा होरा फोल ठरला.

27 gatherings, tremendous crowd; But do not expect the miracle | २७ सभा, प्रचंड गर्दी; पण अपेक्षित चमत्कार नाहीच

२७ सभा, प्रचंड गर्दी; पण अपेक्षित चमत्कार नाहीच

Next

गजानन जानभोर, (सहायक संपादक, लोकमत) - 
विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या जवळ जाण्याइतपत यश मिळाले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर मोठा चमत्कार घडेल, हा भाजपा नेत्यांचा होरा फोल ठरला. मोदींनी राज्यात तब्बल २७ प्रचारसभा घेतल्या़. विशेष म्हणजे, यातील अर्ध्या सभा या तालुक्यांच्या ठिकाणी घेण्यात आल्या़ ग्रामीण भागात भाजपाला मजबूत करणे, हा त्यामागचा उद्देश होता़ परंतु, विदर्भातील ब्रह्मपुरी, धामणगाव रेल्वे, कोल्हापूर जिल्ह्यातील तासगाव, कोकणातील कासर्डे (कनकवली), ही गावे ज्या मतदारसंघात येतात तेथील भाजपा उमेदवार हरले़ याचा अर्थ मोदींचा प्रभाव नव्हता असे म्हणणे चुकीचे ठरेल़ परंतु, यासोबतच मोदी प्रचाराला आले म्हणून आपण जिंकणारच, हा भाजपा उमेदवारांचा विश्वासही खोटा ठरला़ त्यामुळे यापुढे कोणालाही मोदींची सभा झाली म्हणजे, ‘मी निवडून येणारच’ असे ठामपणे म्हणता येणार नाही़ म्हणजे मग महाराष्ट्रात भाजपाला जे मोठे यश मिळाले त्याचे श्रेय मोदींना द्यायचे नाही का? तर ते नक्कीच द्यावे लागेल़ पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा निर्माण झालेला प्रभाव निश्चितच जनतेच्या अपेक्षा उंचावणारा होता़ या देशाने न बोलणारा पंतप्रधान पाहिला आणि सतत संवाद साधणारा पंतप्रधानही पाहिला़ सामान्य माणसांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या लहान-सहान प्रश्नांची आपल्या पंतप्रधानांना जाणीव आहे, हा विश्वास मोदींनी जनतेत निर्माण केला. मोदी सतत देशातील नागरिकांचा, त्यांच्या कल्याणाचा विचार करतात, हेही लोकांना जाणवले़ त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेस अद्याप सावरली नसल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी प्रचाराला आले खरे़ पण, त्यांचा प्रचार कर्तव्य पालनाचा आणि त्यापेक्षा सोपस्काराचाच भाग अधिक वाटला. प्रचारासाठी आवश्यक असलेली आक्रमकता व विजयासाठी आवश्यक असलेला विश्वास त्यांच्या भाषणातून कधी जाणवला नाही़ काँग्रेसचे प्रादेशिक स्तरावरचे नेतेही आपल्या मतदार संघाबाहेर फिरकले नाहीत़ काँग्रसने ही निवडणूक जणू लढवलीच नाही, असेच म्हणावे लागेल़ काँग्रेस भुईसपाट होते की काय असे वाटत असताना या पक्षाने दखलपात्र यश मिळवले हेही विसरता येणार नाही. ज्या तासगावात मोदी आले तेथे आऱ आऱ पाटील जिंकले़ बारामतीत तर अजित पवार तब्बल ७० हजार मतांनी निवडून आले़ ही मोदींच्या प्रभावाची लक्षणं निश्चितच नाहीत़
या देशातील मतदार प्रत्येकवेळी एखाद्या नेत्याच्या प्रभावात दिपून जातो किंवा लाटेत वाहवत जातो, हे म्हणणे आमच्या मताधिकाराचा अपमान आहे, ही गोष्टही राज्यातील मतदारांनी न बोलता सांगून टाकली आहे़ आपली लोकशाही अधिक दृढ आणि मतदार अधिक सुज्ञ होत असल्याचेच हे लक्षण आहे़

Web Title: 27 gatherings, tremendous crowd; But do not expect the miracle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.