२८२ जावयांची - ४९ सुनांची सासू आणि हजारोंची माय...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:34 AM2022-01-06T06:34:20+5:302022-01-06T06:34:43+5:30
अर्ध्या वयात सारं गमावून बसलेल्या या स्त्रीने एकाकी लढा दिला.. जळणाऱ्या प्रेताच्या निखाऱ्यावर भाकरी भाजून खाणारी सिंधूताई पुढे अनेकांचा आधार ठरली.
- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक
नुसती शाळा-महाविद्यालये काढून कधी समाजसेवा होत नसते. त्यासाठी गोरगरीब, शोषित, पीडितांच्या उत्थानासाठी झटावं लागतं, चटके सोसावे लागतात. अशाच शेकडो निराधार जिवांना आपल्या पदराखाली सामावून घेत त्यांना मायेची ऊब देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र खरंच पोरका झाला आहे.
सिंधूताईंमध्ये कामाची प्रचंड ऊर्जा होती. वाणीवर कमालीचे प्रभुत्व होते. शब्दांमध्ये धार होती. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी (मेघे) या गावी जन्मलेल्या या विदर्भकन्येने देश-विदेशातील अनेक व्यासपीठं गाजविली. म्हणूनच तर म्हणावं लागतं, २२ देश फिरून आलेली नऊवारी आज हरपली आहे. हाफ टाइम शिकलेली (तेही चौथी वरपास) २८२ जावई, ४९ सुनांची सासू आणि हजारोंची माय झाली. ही सोपी गोष्ट नाही. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी जग संपलं तेव्हा सुन्न झालेल्या या स्त्रीने एकाकी लढा दिला.. स्मशानात राहणारी, भीक मागणारी, जळणाऱ्या प्रेताच्या निखाऱ्यावर भाकरी भाजून खाणारी ती अनेकांचा आधार ठरली. लहानशा गावातून सुरू झालेलं त्यांचं कार्य देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचलं.
सिंधूताई १९८० ला चिखलदरा येथे आल्या. आदिवासींप्रमाणेच गवळी बांधवांच्या समस्या त्यांच्या लक्षात आल्या. पशुपालक असलेला हा समाज दुर्लक्षित राहू नये, सर्व मुला-मुलींनी शिक्षण घ्यावं, पशुपालन करताना येणाऱ्या अनेक समस्यांवर त्यांनी लक्ष वेधलं होतं. ८ मार्च १९९२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक एका अंध विद्यालयाच्या उद्घाटनासाठी चिखलदरा येथे आले असता थेट मंचावर चढून त्यांच्या हातातील माईक घेत माझ्या गवळी बांधवांच्या समस्या सोडवा, असं स्पष्ट सांगणाऱ्या सिंधुताईंची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. वनविभागाने गवळी समाजाला जंगलात गुरं चारण्यास मज्जाव केला होता. त्यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. त्यावेळी सिंधूताईंनी केलेलं सलग शंभर दिवस साखळी उपोषण आजही स्मरणात आहे. पुढे वन विभागाला नमतं घ्यावं लागलं. गुरं चारण्याची परवानगी मिळाली. मतदार नोंदणीमध्ये तरुणांच्या मतांची टक्केवारी वाढावी यासाठी २०१८ ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या त्या आयकॉन होत्या. वर्धा जिल्ह्यात त्यांनी सुरू केलेल्या गोपिका गाईरक्षण केंद्रासारख्या विविध सामाजिक संघटना शोषित, पीडितांना न्याय देण्याचं काम करीत आहेत.
सिंधूताईंना ‘पद्मश्री’ मिळाल्याची घोषणा होताच मनापासून आनंद झाला होता. चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथून सुरू झालेला त्यांचा लढा कुणीही विसरू शकत नाही. म्हणूनच पुरस्कार मिळाल्याची माहिती त्यांनी सर्वप्रथम शहापूरवासीयांना दिली होती. त्यांच्यासारखी मराठमोळी साधी महिला पुण्यासारख्या शहरात जाऊन आपल्या कार्याच्या तेजाने प्रकाशमान झाली. भगवान रजनीश म्हणत, ‘नारी ही क्रांती कर सकती है.’ म्हणूनच मदर टेरेसांनंतर कुणाचं नाव निघत असेल, तर त्या सिंधुताई सपकाळ आहेत!
मुमकिनात मे है कि गिरकर तुम संभल जाओ
किसी के आंख से गिरकर तुम संभल नही सकते
गमों की तपती हुई धूप में सहमते हुये
जो रास्ते में ठहर जाये वो चल नही सकते......
शब्दांकन : गजानन चोपडे