३० हजार कोटींसाठी!.........
By admin | Published: July 10, 2015 10:39 PM2015-07-10T22:39:52+5:302015-07-10T22:39:52+5:30
सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना
सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना जे काँग्रेस-राष्ट्रवादीत घडत होते तेच आता भाजपा-शिवसेनेत सुरु झाल्याचे चित्र आहे. जे काही घडते आहे त्याला मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणुक होईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वबळाचा नारा मुंबई दौऱ्यात दिला, त्याच्याही आधी भाजपा शिवसेनेत प्रत्येक छोट्या गोष्टीवरुन धुसफूस सुरु आहे.
महापालिकेत शिवसेना वरचढ आहे तर राज्य सरकारमध्ये भाजपा. राज्य सरकारच्या प्रत्येक चुकीवर शिवसेना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. तेच काम महापालिकेच्या कारभाराच्या बाबतीत भाजपा करीत आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि नाले सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. त्यासाठी त्यांनी पक्षांतर्गत नगरसेवकांची चौकशी समिती नेमली. मुंबई तुंबल्याच्या प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही, मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेशी आपले काही घेणे देणे नाही, जे काही वाईट घडते आहे, चुकीचे होत आहे त्याची सगळी जबाबदारी शिवसेनेची आहे असे चित्र तयार करत शेलार यांनी भाजपाला वेगळे करण्याचा आटापीटा चालवला आहे. ज्यावेळी नाले सफाईची कामे होत होती त्यावेळी भाजपाचे नगरसेवक काय करत होते? त्यांचा याच्याशी काहीच संबंध नसेल तर नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते कमी पडले का, याचा एका शब्दानेही खुलासा न करता स्वत:ला सगळ्या चुकीच्या गोष्टींपासून दूर करण्यात शेलार धन्यता मानीत आहेत.
शिवसेना देखील हेच करते आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्यावर टीका केली, तेव्हा सामना मधून अग्रलेख लिहिला गेला. तावडेंच्या पदवी प्रकरणावर देखील उध्दव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले तर पंकजा मुंडेंचा घोटाळा गंभीर विषय आहे असे सांगत भावाने बहिणीवर टीका केली. सत्तेत असताना सामूहीक जबाबदारी असते याचेही भान न ठेवता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.
मुंबईत होणारा कोस्टल रोड हे तर या वादाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीलिंक नको असे सांगत कोस्टल रोडची संकल्पना मांडली. त्यांच्या काळात ती होऊ शकली नाही मात्र भाजपा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिल्लीत अडलेल्या काही परवानग्या मिळवल्या. त्यानंतर आशिष शेलार यांनी जणू काही कोस्टल रोडच पूर्ण झाला या थाटात मुंबईभर पोस्टर लावली. त्यावर शिवसेनेने देखील कोस्टल रोड मनपा करणार आहे, भाजपा सरकार नाही असे सांगून शेलारांच्या पोस्टरवर पाणी टाकले. शेलार हे ‘पोस्टर बॉय’ आहेत अशी मल्लीनाथीही सेनेच्या एका नेत्याने केली. हेच शेलार मुंबईच्या रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकबद्दल का बोलत नाहीत, ई-सॅप प्रणालीमुळे पालिकेच्या झालेल्या नुकसानीबद्दल का आरोप करत नाहीत असे चिमटे सेनेतून घेतले जात आहेत.
‘आमचा तो बंडू, तुमचे ते कार्टे’ या न्यायाने दोघेही वागत आहेत. शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी वॉर्डनिहाय माहिती असणाऱ्या एका पुस्तकाचे प्रकाशनही अमित शहा यांच्या हस्ते केले होते. त्याच्या मर्यादित प्रती केल्या गेल्या. त्यात जातीनिहाय, समाजनिहाय मतदारांचे गणीत मांडलेले आहे.
काही करुन शिवसेनेला महापालिका सोडायची नाही, आणि भाजपाला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत पूर्ण सत्ता हवी आहे. ३० हजार कोटीचे बजेट असणारी पालिकेची सत्ता दोघांनाही हवी आहे त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत दोघांमधील ही भांडणे अशीच वाढत जातील. किंबहुना ती दरवेळी नवनवे रुप घेतील.
जाता जाता : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र सत्तेत राहून भांडण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, असा (अनाहूत?) सल्ला शिवसेनाला दिला आहे.
- अतुल कुलकर्णी