४८ पैकी ४५ भाजपला; उरले ते ३ कोण?
By यदू जोशी | Published: January 6, 2023 10:20 AM2023-01-06T10:20:23+5:302023-01-06T10:21:58+5:30
भाजपने लोकसभेसाठी ज्या जागा सोडल्या, त्यात एक बारामतीची असेल, बाकीच्या? तटकरेंचं रायगड, अमोल कोल्हेंचं शिरूर की सातारा, रत्नागिरी?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे चंद्रपूर अन् औरंगाबादला येऊन गेले. महाराष्ट्रात मिशन ४५ राबविणार म्हणजे लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकणार हे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. म्हणजे केवळ तीन जागा भाजपने इतरांसाठी सोडल्या. त्यात भाजप युतीच्या बाहेर असलेले चार पक्ष आणि एक अपक्ष खासदार आहेत. भाजपने लक्ष्य साध्य केले तर चारपैकी एका पक्षाच्या हाती भोपळा येणार. आता भाजपने ज्या तीन जागांवर आपण जिंकू शकत नाही, असे एकप्रकारे कबूल केले आहे. त्यात बारामतीची जागा तर नक्कीच असेल. म्हणजे उरल्या फक्त दोन. त्या कोणत्या असतील? सुनील तटकरेंचं रायगड असेल की अमोल कोल्हेंचं शिरूर? सातारा, परभणी की विनायक राऊतांचं रत्नागिरी-सिंधुदुर्ग?
असं म्हणतात की, जिंकून येण्यासाठी कठीण असलेल्या जागा म्हणून बारामती, रायगड, शिर्डी, औरंगाबाद, सातारा, अकोला, चंद्रपूर, दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, हातकणंगले, उस्मानाबाद, परभणी, नांदेड हे मतदारसंघ भाजपच्या डायरीत लिहिलेले आहेत. परभणीचे खासदार बंडू जाधव, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर हे अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि ती भाजपसाठी मोठी चिंता आहे. खान पाहिजे की बाण या मुद्द्यावर निवडणूक होणाऱ्या मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये हिंदुत्ववादी मतदार उद्धव यांच्यासोबत गेला तर...? ही भीती भाजपला नक्कीच सतावत आहे. ४५चं लक्ष्यच मुळात अतिमहत्त्वाकांक्षी! ते साधलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची सेना, लहान पक्ष आणि अपक्ष मिळून केवळ तीन जागा जिंकतील, असा अर्थ होतो; जे अशक्यप्राय!
२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या; पण आताचा विचार केला तर भाजप- २३, शिवसेना (बाळासाहेबांची)- १३, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- ५, राष्ट्रवादी- ४, काँग्रेस- १, एमआयएम- १, अपक्ष १ असं संख्याबळ आहे.
देशाच्या पातळीवर भाजपकडे नरेंद्र मोदींसारखं भक्कम नेतृत्व आहे. मात्र, महाराष्ट्रात कोणाच्या नेतृत्वात ते लढणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या? भाजपच्या आम कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे; पण तेच फडणवीस सांगतात की आम्ही शिंदेंच्या नेतृत्वात लढू. शिंदेंनी हातात कमळ घेतलं तरच हे शक्य होणार! त्यांच्यासोबतचे बरेच आमदार, खासदार हे उद्या धनुष्यबाण नाही मिळाला तरी कमळावर लढण्यास उत्सुक आहेत.
आता राज्याचं नेतृत्व तर भाजपने शिंदेंना दिलं; पण निवडणुकीचं नेतृत्व फडणवीस यांच्याऐवजी शिंदेंना देताना दहादा विचार केला जाईल. लोकसभेबरोबरच राज्यातील विधानसभेची निवडणूक घ्यायची आणि शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात लढायचं, असा एक फॉर्म्युलाही समोर येऊ शकतो. नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचा केंद्र व राज्यात एकाचवेळी फायदा करून घेण्याची कल्पना त्यामागे आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर जागोजागी सांगत आहेत की, लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा आम्ही जिंकू. म्हणजे विधानसभेत अख्ख्या विरोधकांना ८८ जागांवर निपटवतात की काय? लोकसभा निवडणुकीचा विचार करता मोदींना सक्षम पर्याय अजूनही उभा राहू शकलेला नाही.
राहुल गांधी स्वत:च त्यांचं लक्ष्य २०२९ची निवडणूक असल्याचं सांगतात. विरोधकांची देशपातळीवरील युती भाजप होऊ देणार नाही आणि काही अदृश्य हात त्यासाठी त्यांना मदत करतील. मात्र, लोकसभेतील विजयाची पुनरावृत्ती विधानसभेत होतेच असं नाही. २०१९ मध्ये मोदी लाट होती तरीही लोकसभेतील यश सहा महिन्यांनंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत टिकू शकलं नव्हतं. दिग्गज भाजप नेत्यांच्या प्रभावपट्ट्यात भाजपला पराभवाचे मोठे धक्के बसले होते. २०१४ मध्ये १२२ जागा जिंकलेला भाजप १०५ वर थांबला होता. लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणांचा बोलबाला नसतो; विधानसभेला तो असतो. दोन्हींमधील यशापयशाचे निकष वेगळे असतात. बावनकुळे नवे आहेत, कळेल हळूहळू.
भाजपला भीती कोणाची?
भाजपच्या डायरीत राज्यात सर्वात मोठं आव्हान म्हणून शरद पवार यांचं नव्हे, तर उद्धव ठाकरे यांचं नाव आहे म्हणतात. शिवसेनेची शकलं पाडण्यात यश आलं असलं तरी शिवसैनिक अजूनही मोठ्या प्रमाणात ठाकरेंसोबत असल्याचं भाजपमधील जाणकारांना वाटतं. निवडणुकीतही हेच चित्र राहिलं तर कठीण जाईल.
शिवसेनेचे किमान ५० टक्के मतदार शिंदेंमार्फत आपल्याकडे वळविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसेल. भावनिक राजकारणाच्या आधारे ठाकरे भारी पडू शकतात. त्यातच महाविकास आघाडी भक्कमपणे एकत्र राहिली तर आव्हान मोठं असेल. काँग्रेसचा परंपरागत मतदार, राष्ट्रवादीचे मजबूत बालेकिल्ले आणि ठाकरे शिवाय सोबत ॲड. प्रकाश आंबेडकर या ऑल इन
वन फॉर्म्युल्यासमोर लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० जागांच्या बुलेट ट्रेनमध्ये बसणं भाजपला मुश्कील जाईल.