खुनाच्या गुन्ह्यात ४८ वर्षे तुरुंगात, नंतर निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 07:59 IST2025-04-03T07:59:07+5:302025-04-03T07:59:26+5:30
Japan News: जपानमधला हा एक जगप्रसिद्ध खटला आहे, जो सध्या खूपच गाजतो आहे. केवळ जपानमध्येच नाही, तर संपूर्ण जगानं त्यावर आश्चर्य आणि खेद व्यक्त केला आहे. काय आहे हा खटला? -हा खटला आहे सध्या ८९ वर्षे वय असलेल्या आणि त्यांच्या तरुणपणी बॉक्सर असलेल्या इवाओ हाकामादा यांचा.

खुनाच्या गुन्ह्यात ४८ वर्षे तुरुंगात, नंतर निर्दोष
जपानमधला हा एक जगप्रसिद्ध खटला आहे, जो सध्या खूपच गाजतो आहे. केवळ जपानमध्येच नाही, तर संपूर्ण जगानं त्यावर आश्चर्य आणि खेद व्यक्त केला आहे.
काय आहे हा खटला? -हा खटला आहे सध्या ८९ वर्षे वय असलेल्या आणि त्यांच्या तरुणपणी बॉक्सर असलेल्या इवाओ हाकामादा यांचा. त्यांना तब्बल ४८ वर्षे तुरुंगात काढावी लागली, तीही यासाठी, की जो गुन्हा त्यांनी केलेलाच नव्हता! आपला बॉस, त्याची बायको आणि त्यांची दोन मुलं यांचा खून केल्याच्या कारणावरून इवाओ यांना १९६६मध्ये अटक करण्यात आली. २०१४ पर्यंत म्हणजे जवळपास ४८ वर्षे ते तुरुंगातच होते.
खटला पुन्हा नव्यानं चालवण्याची ‘अत्यंत दुर्मीळ’ अशी परवानगी त्यांना मिळाल्यानंतर न्यायालयात हा खटला पुन्हा चालवण्यात आला. त्यानंतर खुनाच्या या खटल्यातून गेल्यावर्षी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली! मुख्य म्हणजे या कथित गुन्ह्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तुरुंगात असताना आणि नंतरही त्यांनी आपल्या आयुष्याचा एक एक दिवस आणि एक एक क्षण ज्या पद्धतीनं काढला, हरघडी ज्या वेदनांना आणि पुढ्यातल्या मृत्यूला त्यांना ज्या पद्धतीनं सामोरं जावं लागलं, त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही.
जपानमध्ये ज्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली आहे, त्याला कधी फाशी दिलं जाणार हे सांगितलं जात नाही. फाशीच्या केवळ काही तास आधी ‘तुला आता फासावर चढवणार’ याची कल्पना त्याला दिली जाते. या काळात आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण इवाओ यांनी मृत्यूच्या छायेत घालवल्यानं त्यांच्या मानसिक स्थितीवरही अत्यंत विपरित परिणाम झाला.
‘नुकसानभरपाई’ म्हणून न्यायालयानं त्यांना नुकतीच १.४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे बारा कोटी रुपये) भरपाई मंजूर केली आहे. दिवसाला १२,५०० येन म्हणजेच ८३ डॉलर्स या हिशेबानं न्यायालयानं ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. दोन अर्थांनी हा खटला ऐतिहासिक आहे. खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष असलेल्या व्यक्तीला तब्बल ४८ वर्षे तुरुंगात काढावी लागल्याचा हा जगातील पहिलाच सर्वांत मोठा खटला आहे. याशिवाय कोणत्याही व्यक्तीला एवढी मोठी नुकसानभरपाई दिल्याचाही जपानमधील हा पहिलाच खटला आहे.
इवाओला अटक झाल्यानंतर टाहो फोडून त्यानं सांगितलं, माझा काहीही दोष नाही, पण गुन्हा कबूल करण्यासाठी त्याच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे वेदनांपायी त्यानं शेवटी गुन्हा ‘कबूल’ केला! या खटल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इवाओ यांची मोठी बहीण हिडेको हाकामादा. सध्या ती ९१ वर्षांची आहे. कोणाचा नसला तरी तिचा विश्वास होता आपल्या भावावर. तो निर्दोष आहे यावर ती ठाम होती. त्यामुळे इवाओ तुरुंगात असतानाही वर्षानुवर्षे त्याच्या वतीनं तिनं लढा दिला हिंमत न हारता. अनेक ठिकाणी दार ठोठावलं. इतक्या वर्षांनी का होईना, तिच्या तपश्चर्येचं फळ तिला आणि तिच्या भावाला मिळालं. तिचं आणि इवाओच्या वकिलांचं म्हणणं आहे, निर्दोष असताना इतकी कमी नुकसानभरपाई देणं म्हणजे इवाओच्या आयुष्याची आणि त्याच्या वेदनांची ही थट्टा आहे!