दिल्लीत शिजतेय 'बिरबलाची खिचडी', मतांसाठी 'शाही' हुशारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 04:12 PM2019-01-07T16:12:23+5:302019-01-07T16:14:40+5:30
नोटाबंदीचा ‘तुघलकी’ निर्णय आणि ‘शेखचिल्ली’ टाईप राफेल करारावरून उठलेले वादळ कायम असताना आता दिल्लीत बिरबलाची खिचडी शिजू घातली आहे.
- नंदकिशोर पाटील
(कार्यकारी संपादक, लोकमत)
अकबर बादशहाचे राज्य खालसा होऊन शेकडो वर्षे लोटली तरी, त्याच्या ‘अकबरी कारनाम्यांचा’ पगडा भारतीय राज्यकर्त्यांवर मनावर कायम असल्याचा प्रयत्य वारंवार येत असतो. विशेषत: गेल्या साडेचार वर्षात तर राजधानी दिल्लीत बादशहा अकबर, मोहंमद तुघलक, की शेखचिल्ली? यापैकी नेमकं कोण राज्य करतंय, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. तो पडण्यामागं तशी असंख्य कारणं आणि धोरणं आहेत. पण ‘हम करे सो कायदा’ हे या सर्व भूतपूर्व आणि सध्याच्या राज्यकर्त्यांचे समानसूत्र आहे. आजवरचे अनेक राजेमहाराजे, ‘दिल्ली जिंकली म्हणजे जग जिंकले’, अशा आविर्भावात होते. सध्याच्या राज्यकर्त्यांचा समजही तसाच आहे. नोटाबंदीचा ‘तुघलकी’ निर्णय आणि ‘शेखचिल्ली’ टाईप राफेल करारावरून उठलेले वादळ कायम असताना आता दिल्लीत बिरबलाची खिचडी शिजू घातली आहे.
बिरबलाची ती गोष्ट अशी-
बिरबलाची गोष्ट तशी सर्वांना माहित आहेच. असेच थंडीचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब घोषणा केली. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली गेलीे. ती ऐकून एक गरीब माणूस रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हा त्याचे नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याशा दिव्याकडे जाते. अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणाऱ्या माणसाला उब मिळाल्याचे अनुमान अकबर काढतो आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो.
तो गरीब माणूस दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, 'तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.'
दुस-या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. बिरबल खिचडी शिजल्यानंतरच येणार असल्याने राजा दरबाराच्या कामास सुरवात करतो. दुपार झाल्यावरही बिरबल न आल्याने राजा दुसºया सेवकाला पाठवितो. दूसरा सेवकही बिरबलाची खिचडी झालीच नसल्याचे सांगतो.
अकबराला आश्चर्य वाटते. दरबार संपतो तरी बिरबल येत नाही म्हणून अकबरच त्याच्या घरी जातो. तेथे गेल्यानंतर पाहतो तो काय. बिरबलाने छोटी चूल पेटवून बºयाच उंचीवर एका मडक्यात खिचडी शिजायला ठेवलेली असते. अकबर हसतो आणि म्हणतो, अरे बिरबल तू एवढा हुशार आणि चतुर. मग तुला एवढे समजत नाही, की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर ती तापेल कशी?
तेव्हा बिरबल म्हणतो, 'क्षमा असावी महाराज, दूरच्या दिव्याची उब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो, मग याच न्यायाने खिचडी शिजायला काय हरकत आहे? राजाच्या चूक लक्षात येते. रात्रभर पाण्यात उभा राहणारया माणसाला तो तातडीने बोलावणे पाठवून शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देतो.
आजच्या खिचडीची गोष्ट अशी-
येत्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीतील लोकांची मते मिळावित म्हणून भाजपा नेत्यांनी नामी शक्कल लढविली आहे. देशभरातील अनु.जाती-जमातीतीच्या लोकांच्या घरून आणलेल्या तीन हजार किलो तांदूळ आणि डाळीची खिचडी दिल्लीत शिजवली जात आहे. त्यासाठी खास नागपुरी शेफ विष्णू मनोहर यांना पाचारण करण्यात आले आहे. आजवर ९१८ किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. भाजपा नेत्यांना ३ हजार किलो तांदूळ व डाळीच्या खिचडीचा नवा विक्रम प्रस्थापित करायचा आहे. ही खिचडी खाल्ल्यानंतर देशात खºया अर्थाने समरसता येईल, असा दावा केला जात आहे.
सम्राट अकबराच्या दरबारात बिरबल होता म्हणून गरीबांना न्याय आणि सुधारणांना वाव होता, मात्र मोदींच्या दरबारात शहेन‘शहा’ची चलती असल्याने खिचडी खा आणि मस्त राहा!