६० मुलांच्या मृत्यूचे संन्यस्त अपराधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:07 AM2017-08-17T00:07:02+5:302017-08-17T00:07:05+5:30

धार्मिक, यौगिक आणि राजकीय अशा तीनही सत्तांनी युक्त असलेल्या योगी आदित्यनाथ या सत्पुरुषाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद प्रचंड बहुमतानिशी ताब्यात घेतले आहे.

60 convicted criminal convicts | ६० मुलांच्या मृत्यूचे संन्यस्त अपराधी

६० मुलांच्या मृत्यूचे संन्यस्त अपराधी

googlenewsNext

धार्मिक, यौगिक आणि राजकीय अशा तीनही सत्तांनी युक्त असलेल्या योगी आदित्यनाथ या सत्पुरुषाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद प्रचंड बहुमतानिशी ताब्यात घेतले आहे. मोदींचे केंद्र सरकार आणि त्याचा एकूणच संघ परिवार यांचा त्यांना एकमुखी व निष्ठापूर्वक पाठिंबा आहे. कधी काळी ‘मुसलमानांनी येथून चालते व्हावे’, ‘मोदींना मत न देणारे सारे लोक पाकिस्तानी आहेत’, ‘वंदेमातरम् म्हणणार नाहीत ते देशद्रोही आहेत’ आणि ‘गाय हे ज्यांचे दैवत नाही त्यांना जगण्याचा हक्क नाही’ असे म्हणत साºया दुनियेला गुन्हेगार ठरवित निघालेल्या या योगीराजाचे त्याच्या स्वत:च्या मतदारसंघाकडे जराही लक्ष नाही हे आता उघड झाले आहे. गोरखपूर मतदारसंघातून ते १९९८ पासून आजवर लोकसभेत निवडून आलेले आहेत. धार्मिक व यौगिक उपासनांमध्ये जास्तीचा वेळ घालविणारे असले तरी या आदित्यनाथांनी आरोग्य व कुटुंबकल्याण या विषयावर लोकसभेत आजवर ८९ प्रश्न विचारले आहेत. तरीही त्यांच्या दिव्यदृष्टीला त्यांच्याच गोरखपुरातील बाबा राघवदास या सरकारी इस्पितळात नव्याने जन्माला आलेली ६० मुले एन्सेफलायटीसच्या आजाराने अवघ्या दोन आठवड्यात मृत्यू पावल्याची घटना दीर्घकाळ दिसली नाही. तिची कारणे शोधणे व तिच्यावर तातडीचे उपाय करणे या मानवी गोष्टीही त्यांना दीर्घकाळ करता आल्या नाहीत. त्यांच्या पक्षाचे केंद्रातील एक मंत्री तर एवढे निबर कातडीचे की आॅगस्ट महिन्याच्या सुमाराला अशी मुले तेथे मरतच असतात असे सांगून त्यांनी आपली व योगीराजांची वस्त्रे झटकून टाकली आहेत. त्यातून आता एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याने सरकारी दवाखान्यात अत्याधुनिक सेवा देणे शक्यच नाही असेही सांगून टाकले आहे. ही मुले एन्सेफलायटीसने तर मृत्यू पावलीच पण त्याहून त्यांच्या मृत्यूचे खरे कारण, त्या आजारात आवश्यक असलेला प्राणवायूचा जीवनदायी पुरवठा त्यांना झाला नाही हे आहे. त्या दवाखान्याला प्राणवायू पुरविणाºया कंपनीचे पैसे थकल्यामुळे तिने तो पुरवठा थांबविल्याचे आता चौकशीत लक्षात आले आहे. सरकारी इस्पितळे, सर्व औषधे व साधनांनिशी सुसज्ज असली पाहिजेत आणि त्यांनी अल्पवयीन मुलांच्या आजाराकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे हा आरोग्य सेवेचा मूलमंत्र या योगीराजांना व त्यांच्या सरकारला ठाऊकच नसावा याचा हा पुरावा आहे. एकेकाळी महाराष्टÑातील अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट तालुक्यात आदिवासींची शेकडो मुले पावसाळ्यात कुपोषणाने मृत्यू पावत. तेव्हाही अशा अविकसित भागातली मुले मरतच असतात असे संवेदनाशून्य वक्तव्य तेथील एका मंत्र्याने दिले होते. योगीराज आणि त्यांचे पाठिराखे केंद्रीय मंत्री यांनीही या निबरपणात आपण जराही कमी नाही ते त्यांच्या वागणुकीतून सिद्ध केले आहे. उत्तर प्रदेश हे तसेही एक बिमारू राज्य आहे. त्यातून त्याचा पूर्व भाग जरा जास्तीच बिमारू आहे. त्या राज्याचे राजकारणही बिमारू म्हणावे असेच आहे. मायावती, मुलायमसिंग, राजनाथसिंग व अखिलेश या बसपा, सपा आणि भाजपा पक्षांची सत्ता तेथे दीर्घकाळ राहिली आहे. जातीपातींची समीकरणे जुळविण्यात गुंतलेले तेथील पुढारी आणि त्यांच्या तंत्राने चालणारे तेथील प्रशासन या दोहोंच्याही कर्तृत्वहीनतेवर या ६० मुलांच्या मृत्यूने आता शिक्कामोर्तब केले आहे. पण योग्याला नावे कोण ठेवील? तसे करणे धर्मदृष्ट्या पाप ठरेल याची धर्मभितांना काळजी आहे आणि इतरांना या योग्याने त्याच्या आश्रमात पोसून ठेवलेल्या गुंडशक्तीचे भय आहे. शिवाय केंद्र सरकार व संघ त्यांच्यासोबत आहे. राजकारण सोडा, पण या प्रश्नात साधी माणुसकी गुंतली आहे. योगाचा वा धर्माचा मनुष्यधर्माशी संबंध असतो की तो फक्त ईश्वर आणि अध्यात्म यांच्याशीच जुळलेला असतो? संन्याशांना साºया संसाराचा तिटकारा असतो असे म्हटले जाते पण त्या माणसांच्या वठलेल्या मनाला नव्याने जन्माला आलेल्या अर्भकांविषयीही आत्मियता वाटू नये काय? एवढी मुले मेली तरी त्या योगीराजाच्या स्थितप्रज्ञ चेहºयावर जराही सुरकुती नाही, त्याचे दु:ख नाही, पश्चाताप नाही, मग प्रायश्चित्त फार दूर राहिले. अशा बेछूट माणसांना व त्यांच्या सरकारांना जाब विचारणार कोण? नरेंद्र मोदी? पण संघातील अनेक माणसे त्या आदित्यनाथाकडेच आपले भावी पंतप्रधान म्हणून पाहतात त्याचे काय? (त्यांच्या यादीत नितीशकुमार नाही, जेटली, राजनाथ वा गडकरी असे आणखीही कुणी नाही) संन्याशाने सत्ताधारी व्हावे या मानसिकतेत गैर काही नाही. उलट अशी माणसे स्वच्छ व कार्यक्षम कारभार करतात अशीच साºयांची अपेक्षा असते. मात्र राजकारणी संन्याशांच्या राज्यात माणसांची व मुलांची स्थिती कशी होते हे गोरखपुरातील या बालकांचा बळी प्रकरणाने देशाला दाखविले आहे. संन्याशांना पाप चिकटत नाही असे म्हणतात. मग या मुलांच्या अपमृत्यूचे खापर सरकारी निष्काळजीपणावर फोडायचे की मरणाºया बालकांचे ते दुर्दैवी प्राक्तन समजायचे. साºया देशाच्या डोक्यात धर्माच्या नावाने राजकारण करून नुसत्या अंधश्रद्धा पेरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. आदित्यनाथ योगी आहेत की मुख्यमंत्री? संन्याशी आहेत की सत्ताकारणी? या मुलांच्या मृत्यूला त्यांचे मुख्यमंत्रिपद कारण आहे की त्यांचे तथाकथित संन्याशी असणे? संन्याशांच्या नावावर मते मिळविता येतात, सत्ता राबविता येत नाही, हेच खरे.

Web Title: 60 convicted criminal convicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.