Crime: लैंगिक गुन्हे केल्याने ६० वर्षांची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:52 AM2023-02-04T05:52:42+5:302023-02-04T05:53:03+5:30
Crime News: लॉरेन्स रे नावाच्या अमेरिकन माणसाला महिलांचं, तरुण मुलींचं लैंगिक शोषण करणं या गुन्ह्यासाठी नुकतीच ६० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा सुनावली त्यावेळी या माणसाचं वय होतं ६३ वर्षं.
लॉरेन्स रे नावाच्या अमेरिकन माणसाला महिलांचं, तरुण मुलींचं लैंगिक शोषण करणं या गुन्ह्यासाठी नुकतीच ६० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा सुनावली त्यावेळी या माणसाचं वय होतं ६३ वर्षं. याचा अर्थ हा म्हातारा लाॅरेन्स त्याचं उरलेलं संपूर्ण आयुष्य अमेरिकन तुरुंगात घालवणार आहे. आता जन्मापासून अमेरिकन नागरिक असलेल्या या माणसाला हे तर माहितीच असणार की महिलांचं लैंगिक शोषण करणं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्यासाठी अमेरिकन न्यायव्यवस्थेत कठोर शिक्षा होत असते. मग तरीही या माणसाने हा गुन्हा का केला असेल? तर कुठल्याही गुन्हेगाराप्रमाणे लॉरेन्स रेला अशी खात्री होती की, तो पोलिसांपेक्षा स्मार्ट आणि कायद्यापेक्षा प्रगत आहे. त्यामुळे तो कधीच पकडला जाणार नाही. त्यात त्याच्या गुन्ह्यांचं स्वरूप असं होतं, की त्याचे बळी ठरलेल्या महिला त्याबद्दल कधी बोलणारच नाहीत याचीही त्याला खात्री असावी. अर्थातच त्याचे या बाबतीतले सगळेच अंदाज चुकले. पण, ते बऱ्याच काळानंतर. बरीच वर्षं त्याचे गुन्हे उघडकीला आलेच नाहीत.
या सगळ्याची सुरुवात झाली ती २०१० साली. आतापासून १३ वर्षांपूर्वी. २०१० साली पन्नास वर्षांचा लॉरेन्स रेची मुलगी न्यू यॉर्कच्या सारा लॉरेन्स कॉलेजच्या वसतिगृहावर राहत होती. त्यावेळी लॉरेन्स रे अनधिकृतपणे तिच्या खोलीवर राहू लागला. या काळात त्याने विद्यापीठातील मुलींशी ओळख वाढवायला सुरुवात केली. त्याने त्या मुलींसमोर स्वतःची प्रतिमा एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे उभी केली. साहजिकच वसतिगृहावर एकट्या राहणाऱ्या मुली त्याच्या जवळ आल्या. त्याचा फायदा घेऊन त्याने त्या मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांशी असलेल्या संबंधात विष कालवलं. त्यामुळे त्या मुलींच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण झाली की, त्यांच्या आयुष्यात जणू काही लॉरेन्स रे हा एकमेव चांगला माणूस होता. त्यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि त्या विश्वासाचा रे ने गैरफायदा घेतला.
त्याने त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं. ज्या मुलींनी सरळपणाने त्याचं म्हणणं ऐकलं नाही त्यांच्यावर बळाचा वापर केला. आणि मग अर्थातच त्यातून ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू झाला.
ज्या मुली त्याच्या जाळ्यात अडकल्या त्यांना अर्थातच त्याचं खरं स्वरूप समजलं; पण तोवर त्यांचा पाय त्यात इतका अडकलेला होता की, त्यांना त्यातून बाहेर पडता येईना. मग प्रत्येक वेळी पीडित महिलेच्या बाबतीत वापरलं जाणारं ब्लॅकमेलिंगचं अस्त्र रेने या मुलींविरुद्ध वापरलं. कुठे तक्रार केली, कोणाला सांगितलं तर रे काय करेल याची इतकी दहशत त्या मुलींच्या मनात होती की अनेक वर्षं त्याच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.
ब्लॅकमेलिंग करून रे काय करायचा? - तर या मुलींकडून तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे मागायचा, त्यांचं अजून लैंगिक शोषण करायचा आणि त्यांना त्यांच्यासारख्या मुलींना फसवून त्याच्याकडे आणायला भाग पाडायचा. २०१९ सालापर्यंत लॉरेन्स रेचा हा धंदा बिनबोभाट सुरू होता. मात्र, २०१९ साली न्यू यॉर्क मॅगेझिनमध्ये त्याच्यावर एक स्टोरी छापून आली आणि तिथपासून हे सगळं उजेडात यायला सुरुवात झाली. आणि मग लॉरेन्स रेवर अमेरिकेतल्या विविध कोर्टांमध्ये विविध गुन्ह्यांखाली खटले भरण्यात आले. या खटल्यांमध्ये कट रचणे, हल्ला करणे, मारहाण करणे, लैंगिक व्यापार करणे, लैंगिक शोषण करणे, कर बुडवणे आणि पैशांची अफरातफर करणे असे विविध आरोप लावण्यात आले. लॉरेन्स रे यातल्या प्रत्येक कोर्टातल्या प्रत्येक खटल्यातल्या प्रत्येक गुन्ह्यात दोषी ठरला. मात्र, त्याआधी त्याने अनेक मुलींच्या आयुष्याची अक्षरशः वाट लावली.
लॉरेन्सने कमावले कोट्यवधी रुपये!
या धंद्यातून लॉरेन्स रेने किती पैसे कमावले याचे आकडे थक्क करणारे आहेत. अर्थातच हा सर्व काळा पैसा असल्याने त्याची नेमकी रक्कम कधीच कळू शकत नाही. पण, रेच्या कारस्थानांना बळी पडलेल्या मुलींनी दिलेल्या जबाबानुसार जरी बघितलं तरी ही रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जाते. सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की, रेने त्याच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं असा कांगावा करून किमान पाचजणींकडून एक मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ऐंशी लाख रुपये उकळले. त्यातल्या एका मुलीला तर पैसे वसूल करण्यासाठी त्याने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं. एका विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबानुसार, चार वर्षांच्या काळात तिने स्वतःचं शरीर विकून अडीच मिलियन डॉलर्स म्हणजेच दोन कोटी साडेतीन लाख रुपये रेला दिले. एका विद्यार्थिनीने तक्रार केल्यावर अनेक जणी पुढे आल्या. त्याचाच परिपाक म्हणून लॉरेन्स आता उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवणार आहे.