देवदूत! ९४ कुत्री आणि ६८ मांजरांची काबूलहून सुटका; तालिबान्यांच्या धुमश्चक्रीत ठेवले सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 08:08 AM2021-12-21T08:08:32+5:302021-12-21T08:10:51+5:30

पेन सांगतो, तालिबान्यांनी माझ्या तोंडासमोर एके ४७ रोखून धरलेली होती. त्यामुळे त्यांचं ऐकण्यावाचून काही दुसरा पर्यायच नव्हता.

94 dogs and 68 cats released from kabul after taliban takes over afghanistan | देवदूत! ९४ कुत्री आणि ६८ मांजरांची काबूलहून सुटका; तालिबान्यांच्या धुमश्चक्रीत ठेवले सुरक्षित

देवदूत! ९४ कुत्री आणि ६८ मांजरांची काबूलहून सुटका; तालिबान्यांच्या धुमश्चक्रीत ठेवले सुरक्षित

googlenewsNext

तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केला आणि त्या देशात अचानक हाहाकार उडाला. तालिबानच्या राजवटीचा अनुभव असलेले नागरिक जिवाच्या आकांताने देशाबाहेर पडायचा प्रयत्न करायला लागले. त्या वेळच्या बातम्या,  जिवावर उदार होऊन विमान पकडण्यासाठी विमानतळावर सैरावैरा धावणारी माणसं हे इतक्यात कोणी विसरणार नाही; पण हा सगळा धुमाकूळ अफगाणिस्तानमध्ये चालू असताना पेन फर्दिन्ग नावाचा माणूस मात्र वेगळ्याच विवंचनेत होता. त्याला स्वतःला तिथून बाहेर पडायचं होतं, त्याच्या सहकाऱ्यांना तिथून बाहेर काढायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांना तिथून बाहेर काढायचं होतं आणि हे प्राणी काही एखाद्दोन नव्हते.

पेनने पंधरा वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये युद्धात जखमी झालेल्या प्राण्यांसाठी निवाराघर सुरू केलं होतं. अफगाणिस्तान आणि युद्ध हे समीकरण गेली अनेक वर्षं फारच घट्ट असल्यामुळे त्याच्या त्या निवाराघरात आश्रयाला आलेल्या प्राण्यांची संख्याही खूप होती. या सगळ्या प्राण्यांना अफगाणिस्तानमध्ये सोडून मायदेशी इंग्लंडला परत जाणं त्याला शक्यच नव्हतं. त्यामुळे त्याने ब्रिटिश एअरफोर्सला विनंती केली, की “माझ्या प्राण्यांना माझ्याबरोबर इंग्लंडला घेऊन चला.” पण, अर्थातच ती विनंती नाकारण्यात आली. त्याला उत्तर मिळालं की, “आत्ताच्या परिस्थितीत माणसांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे. माणसांना डावलून प्राण्यांना घेऊन जाता येणार नाही.” अर्थात त्या परिस्थितीत ते कुठल्याही देशाच्या अधिकृत धोरणांशी सुसंगतच  होतं आणि पेनची त्याबद्दल काही तक्रारही नव्हती. सरकारी विमानातून प्राण्यांना नेता येणार नाही म्हटल्यावर त्याने खासगी विमान भाड्याने घेण्यासाठी पैसे जमवायला सुरुवात केली.  लोकांना मदतीचं आवाहन केलं आणि बघता बघता एक संपूर्ण विमान भाड्याने घेण्याइतके पैसे त्याच्याकडे जमले.

पैसे जमले आणि विमानाची सोय झाली म्हटल्यावर पेन त्याचे सगळे प्राणी, त्याच्याकडे काम करणारी माणसं आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना घेऊन काबूल विमानतळाकडे जायला निघाला. पण, तालिबानच्या राज्यात प्रवास इतका सोपा असणार नव्हता. त्याला त्याच्या निवारा घरापासून ते काबूल विमानतळापर्यंतच्या रस्त्यात चार ठिकाणी तालिबानच्या लोकांनी अडवलं. त्या सगळ्या ठिकाणांहून तो सुखरूप सुटला. रस्त्यात एका ठिकाणी त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला होता होता ते सगळे त्यातून वाचले. एकदा विमानतळावर पोहोचल्यावर सगळ्या अडचणी संपल्या, असं वाटत असतानाच तालिबानने सांगितलं की,  प्राणी जाऊ शकतील; पण व्हिसा असल्याशिवाय माणसांना देशाबाहेर जात येणार नाही. 

पेन सांगतो, तालिबान्यांनी माझ्या तोंडासमोर एके ४७ रोखून धरलेली होती. त्यामुळे त्यांचं ऐकण्यावाचून काही दुसरा पर्यायच नव्हता. त्याने नाइलाजाने त्याच्याबरोबर काम करणारे सहकारी, त्यांच्या कुटुंबीयांना परत पाठवून दिलं आणि तो प्राण्यांना घेऊन विमानात बसला. त्या विमानातून इंग्लंडला गेलेल्या एकूण प्राण्यांची संख्या होती १६२! त्यात ९४ कुत्री आणि ६८ मांजरं होती. पेनने  एकूण २३० सीटर विमान बुक केलं होतं. सगळे प्राणी कार्गोमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचे सहकारी त्याच्याबरोबर येऊ शकत नव्हते. त्यामुळे विमानातल्या सगळ्याच्या सगळ्या सीट्स रिकाम्या होत्या.

पेनने ब्रिटिश सरकारला सांगितलं की, माझ्याबरोबर इतकी माणसं येऊ शकतात. लोक जिवाच्या आकांताने देशाबाहेर पडायचा प्रयत्न करत होते; पण तरीही सरकारने त्याच्या या ऑफरकडे दुर्लक्ष केलं आणि एवढ्या मोठ्या २३० सीटर विमानात पेन एकटाच बसून मायदेशी परतला.

अर्थात ही झाली पेनची बाजू; पण ब्रिटिश सरकारमध्ये काम करणाऱ्या राफेल मार्शल या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, पेनची कुत्री आणि मांजरं सोडवण्याच्या नादात अनेक अफगाणी लोकांची देशाबाहेर पडण्याची संधी हुकली. पेनने मात्र हा आरोप स्पष्टपणे नाकारला आहे. तो म्हणतो की, या संपूर्ण कामात मला ब्रिटिश सरकारने कुठलीही मदत केली नाही. मात्र, सरकारी अधिकाऱ्याने असं विधान केल्यामुळे पेनला आता लोकांच्या रोषाला सामोरं जायला लागतं आहे. माणसांच्या जिवापेक्षा त्याला कुत्र्या-मांजरांच्या जिवाची किंमत जास्त होती, त्यासाठी तो त्याच्या सहकाऱ्यांनाही मागे सोडून आला, अशीही टीका त्याच्यावर होते आहे. माणसांच्या जिवाची किंमत कुत्र्या-मांजरांपेक्षा जास्त आहे, यात काही शंका नाही; पण ती किंमत ठरवण्याचा अधिकार माणसाला खरंच आहे का?
 

Web Title: 94 dogs and 68 cats released from kabul after taliban takes over afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.