एक चेंडू 30 लाखांचा, एक ओव्हर 3 काेटींची; आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी मोजले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:06 PM2022-06-26T12:06:06+5:302022-06-26T12:08:08+5:30
मुळात मीडियाचे जे हक्क दिले गेले आहेत, ते २०२३ ते २०२७ अशा पाच वर्षांसाठी आहेत.
मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
सन २०२३ ते २०२७ या वर्षांकरिता आयपीएल क्रिकेट सामन्यांचे मीडियाचे हक्क तब्बल ४८ हजार ३९० कोटी रुपयांना विकले गेले. एवढ्या विक्रमी व्यवहारामुळे आता आयपीएल क्रिकेट थेट अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीग, अमेरिकेच्याच नॅशनल फुटबॉल असोसिएशन आणि इंग्लडच्या इंग्लिश प्रीमियर लीग या जगातील तीन प्रमुख अर्थ भक्कम क्रीडा प्रकारांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. हा व्यवहार व्यवहार्य आहे का? इतके भरभक्कम पैसे वसूल होतील का? किंवा यामुळे भारतीय जाहिरात क्षेत्राचे अर्थकारणही बदलेल का?
हा व्यवहार व्यवहार्य आहे का?
- मुळात मीडियाचे जे हक्क दिले गेले आहेत, ते २०२३ ते २०२७ अशा पाच वर्षांसाठी आहेत.
- उपलब्ध माहितीनुसार, एकूण चार प्रकारांत या हक्कांची विक्री बीसीसीआयने केली आहे. यामध्ये
१) भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे हक्क २) डिजिटल हक्क ३) १८ सामने (ज्यामध्ये उद्घाटनाच्या दिवसाचा खेळ, शुक्रवार, शनिवार, रविवार असे आठवड्याअंती होणारे सामने ४) उर्वरित जगात प्रसारणाचे हक्क असे चार प्रकार आहेत.
n हक्कासाठी निश्चित झालेल्या एकूण ४८ हजार ३९० कोटी रुपयांचा विचार हा आगामी पाच वर्षांकरिता केला तर ढोबळमानाने, ९,६७८ कोटी रुपये वर्षाकाठी खर्च होतील.
n वार्षिक खर्चासाठी झालेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत किमान १२ ते १५ टक्के जास्त रक्कम ही जाहिरात तसेच अन्य प्रमोशन्सच्या माध्यमातून मिळविण्याचे गणित मांडले जाते.
जाहिरातीचे मार्केट किती?
सन २०२२ च्या पहिल्या पाच महिन्यांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील जाहिरातींचे मार्केट हे १ लाख ७ हजार ९८७ कोटी रुपयांच्या घरात आहे. जाहिरातीच्या बाजारात ११ टक्क्यांची वार्षिक वाढ अपेक्षित असून २०२६ पर्यंत हे मार्केट १२५ कोटी ३२ लाख रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. जाहिरात देणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन आणि आपला ग्राहक या अनुषंगाने, टीव्ही, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, रेडिओ, मोबाइल जाहिराती, आऊटडोअर मीडिया आदी माध्यमांद्वारे जाहिराती देतात.
एक असाही हिशेब... -
चार वर्षांत होणाऱ्या एकूण सामन्यांची संख्या ४१०
प्रत्येक मॅचमध्ये टाकल्या जाणाऱ्या चेंडूंची संख्या -
२४० (नो बॉल,
वाईड सोडून)
एकूण ४१० सामन्यांत टाकले जाणार - ९८,४०० चेंडू
एका चेंडूसाठी मोजले गेले - ५० लाख रुपये
एका ओव्हरसाठी मोजले गेले - ०३ कोटी