जुळ्यांच्या राजधानीत जुळ्यांचा उत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:44 AM2024-10-19T10:44:48+5:302024-10-19T10:45:26+5:30

जगातली जुळ्यांची राजधानी म्हणजे  ‘इग्बो ओरा’ अशी या गावाची ख्याती आहे...

A celebration of twins in the capital of twins! | जुळ्यांच्या राजधानीत जुळ्यांचा उत्सव!

जुळ्यांच्या राजधानीत जुळ्यांचा उत्सव!

जुळी मुलं का होतात? यामागचं कारण विज्ञानाने स्पष्ट केलं आहे. पण तरीही जुळे बघितले की त्याबद्दल कुतूहल वाटतंच. त्यातही एकमेकांसारखे न दिसणारे जुळे म्हणजे आश्चर्यच. पण ‘इग्बो ओरा’साठी जुळे हे आश्चर्य नाही तर देवाची देणगीच. देवाचा आशीर्वाद आहे! जगातली जुळ्यांची राजधानी म्हणजे  ‘इग्बो ओरा’ अशी या गावाची ख्याती आहे. 

हे गाव कथा-कादंबरीतलं, चित्रपटातलं काल्पनिक नाही. हे गाव नायजेरिया या देशातलं आहे. ओयो राज्यातलं हे गाव  जुळ्यांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. जगभरात जुळे जन्माला येण्याचं प्रमाण १०००  मुलांमध्ये फक्त १२ आहे. पण इग्बो ओरा हे जगातलं एकमेव गाव आहे जिथे जुळे जन्माला येण्याचं प्रमाण १००० मध्ये ५०  इतकं आहे. या गावात प्रत्येक कुटुंबात जुळ्या व्यक्ती आढळतातच. गावात फारच थोडी कुटुंबे आहेत जिथे जुळ्या व्यक्ती नाहीत. हे घडण्यामागे अनेकजण आहाराचे कारण सांगतात. भेंडीच्या झाडाची पानं किंवा इलासा सूप सेवन केल्याने जुळी मुलं होतात असं म्हटलं जात असलं तरी हा दावा प्रजनन तज्ज्ञांना मान्य नाही. त्यांच्या मते आहार आणि जुळी मुलं यांचा काहीही संबंध नाही. यामागे अनुवांशिक घटक असू शकतात असा त्यांचा होरा असून तसा  शोध ते घेत आहेत. 

जुळ्यांमागची कारणमीमांसा काहीही असली तरी जुळ्यांबाबतची योरुबालॅंडवरील माणसांची धारणा एकच. जुळी मुलं म्हणजे ओल्डुमरे या सर्वोच्च देवाने दिलेली सुंदर आणि मौलिक भेटवस्तू. या धारणेला इथे कोणी अंधश्रद्धा म्हणत नाही. खुद्द शासन देखील लोकांच्या याच धारणेला बळकटी देतं. नायजेरिया देशावर सध्या मोठे आर्थिक संकट आहे. पण देशावर, राज्यावर, आपल्या गावावर आजपर्यंत अनेक संकटं आलीत, त्या संकटांना आपण धीराने तोंड दिलं, त्याबदल्यात देवाने आपल्या गावातील लोकांना जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला, असं त्यांना वाटतं. जुळ्यांबाबत समाजमनात असलेल्या धारणांवर, योरबा संस्कृतीवर इबादान विद्यापीठात अभ्यासही केला जात आहे.

योरबा संस्कृतीत जुळ्यांमधील मोठ्यांना ‘तायवो’ म्हटलं जातं. याचा अर्थ ज्याने जगाची चव चाखली आणि धाकट्यांना ‘केहींदे’ म्हटलं जातं. केहींदे म्हणजे मागून येणारा.  येथील जुळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश जुळे विश्वास बसणार नाही इतके एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात.

देवाकडून मिळालेल्या या भेटीचा इग्बो ओरा या गावात दर १२ ऑक्टोबरला  मोठा उत्सव साजरा केला जातो. गावात असलेल्या जुळ्यांचा सन्मान, कौतुक करण्यासाठी, देवाच्या आशीर्वादाचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. दूरदूरवरुन लोक तो पाहण्यासाठी इग्बो ओरा या छोट्याशा गावात येतात.

या उत्सवात फक्त लहान मुलंच नाही तर प्रौढ, वयस्क जुळेही सहभागी होतात. जुळ्यांच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरलेला असतो. जुळ्या मुलांना जांभळ्या रंगाचे कपडे घातले जातात. दोघांच्या हातात एकसारखी पर्स किंवा बटवा दिलेला असतो.  मोठी माणसंही पारंपरिक पोशाख, डोळ्यावर स्टायलिश गाॅगल घालून लाल कार्पेटवर अभिमानाने चालून जुळेपणाचा आनंद साजरा करतात. हा उत्सव आयोजित करणारे स्वत:ही जुळेच असतात. या उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर जुळे एकत्र येतात. हे जगभरात इतरत्र कुठेच घडत नाही. पुढल्या वर्षी आयोजकांना गावात जगाने दखल घ्यावा असा   जुळ्या जोडप्यांचा लग्नसोहळा आयोजित करायचा आहे.

इग्बो ओरा या गावात अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. पण माणसं आपल्या गावाला देवाने जुळ्यांचा भरभरून आशीर्वाद दिला  या आनंदात रममाण असतात. सुलिअत मोबोलजी ही ३० वर्षांची महिला. तिला जुळी मुलं झाल्याने भलतीच आनंदात आहे. ही मुलं आत्ता आठ महिन्यांची आहेत. ही मुलं जन्माला  आल्यापासून आपल्या घरावर आनंदाचा वर्षाव होतो आहे असं तिला वाटतं. जुळ्या मुलांमुळे आपलं आयुष्यच बदललं असं म्हणणरी सुलिअत याकडे नशीब म्हणून नाही तर देवाचा आशीर्वाद म्हणूनच बघते. जुळ्यांबद्दल असाच विचार करणाऱ्या हजारो सुलिअत इग्बो ओरात आहेत ज्या जुळ्यांच्या आनंदात हरवून गेल्या आहेत.

जुळ्यांच्या उत्सवाला जागतिक दर्जा
ओयो राज्याचे गव्हर्नर सेयी माकिंदे हे इग्बो ओरा येथे झालेल्या जुळ्यांच्या उत्सवाची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. जुळ्यांचा उत्सव आणखी मोठ्या प्रमाणावर साजरा करून आपण जगातल्या लोकांची पावलं आपल्या गावाकडे वळवू शकतो, असा त्यांना विश्वास वाटतो. देवाने दिलेली भेट कौतुकाने जपायला हवी हीच धारणा सामान्य माणसापासून देश चालवण्यापर्यंत सगळ्यांची आहे.

Web Title: A celebration of twins in the capital of twins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.