आनंदघन नव्हे चिंतेचे ढग, अभ्यासकांपुढे मोठे आव्हान; अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:31 AM2022-06-08T09:31:05+5:302022-06-08T09:31:27+5:30

सरकारी हवामान खाते किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी सांगितलेला केरळमध्ये मोसमी पावसाच्या बरसातीचा महूर्तही नेमकेपणाने साधला नाही. मोसमी पाऊस दाखल झाला की नाही, यावरूनही हवामान खाते व स्कायमेट यांच्यात चकमक उडाली.

A cloud of anxiety, not joy, a great challenge for scholars; Misleading farmers due to miscalculation | आनंदघन नव्हे चिंतेचे ढग, अभ्यासकांपुढे मोठे आव्हान; अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल

आनंदघन नव्हे चिंतेचे ढग, अभ्यासकांपुढे मोठे आव्हान; अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल

Next

यंदा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर मान्सून दाखल होणार, यंदाचे पर्जन्यमान देशाच्या सरासरीइतके किंवा झालेच तर त्याहून अधिक असेल. यंदा पाऊस लहरी राहणार नाही, सगळीकडे सारखा बरसेल वगैरे भारतीय हवामान खात्याने गेल्या महिना-दीड महिन्यात देशवासीयांना दिलेल्या आनंदवार्ता वाऱ्यावर उडून गेल्या आहेत. सरकारी हवामान खाते किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी सांगितलेला केरळमध्ये मोसमी पावसाच्या बरसातीचा महूर्तही नेमकेपणाने साधला नाही. मोसमी पाऊस दाखल झाला की नाही, यावरूनही हवामान खाते व स्कायमेट यांच्यात चकमक उडाली.

हिंदी महासागरातून मोठ्या जोशात निघालेले मोसमी पावसाचे ढग मध्येच थबकले, अडकले. गोवा व कोकण किनारपट्टीवर पडणारा पाऊस महाराष्ट्रात सह्याद्री घाटमाथ्यावर सुखाचा सांगावा धाडतो. गोव्यात पाऊस पडतोय पण, तो मान्सूनचा नाही. मान्सून पश्चिमेकडे बंगळुरू, कारवारमध्ये तर पूर्व किनाऱ्यावर पुदुचेरीपर्यंतच पाेहोचला आहे. मध्य भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे नवतपा संपल्यानंतर, अगदी मृग नक्षत्राची सुरुवात होतानाही उन्हाच्या प्रचंड झळा सुरू आहेत. परिणामी, हवामान खात्याने दिलेल्या आनंदवार्ता चिंता व निराशा बनतात की काय, असे वाटू लागले आहे.

हवामान खात्याचा जवळचा किंवा लांबचा अंदाज चुकणे आता सवयीचे झाले आहे. अब्जावधी रुपये खर्च करून उभी केलेली हवामान खात्याची डॉपलर रडार, निरीक्षणकेंद्रे, अद्ययावत यंत्रसामग्री ही यंत्रणा, त्यात काम करणारे शेकडो हवामानशास्त्रज्ञ १४० कोटी जनतेला पावसाचा तंतोतंत अंदाज देऊ शकत नाहीत. त्यामुळे हंगामाचे व वर्षभराचे शेती, अर्थकारणाचे नियोजन शक्य होत नाही. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागते. जगातील प्रगत देशांना शक्य झाले ते भारतात का नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते. दुबार पेरणीचे संकट ओढवते, आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांचा गैरफायदा अनेकजण घेतात.

बोगस बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जातात. हे पाहता हवामान खाते पावसाचे अंदाज देताना अन्य शक्याशक्यतांचा विचार करीत नाही का, असा प्रश्न पडतो. कारण, भारतात सारे काही मोसमी पावसावर अवलंबून आहे. हिंदी महासागरात दूरवर मान्सूनचे ढग घेऊन उत्तरेकडे निघायला तयार हाेत असतात तेव्हा देश उष्णतेच्या झळांनी त्रस्त असतो. मान्सून दक्षिण किनाऱ्यावर धडकतो तेव्हा उत्तर भारतात उष्णतेची लाट असते. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या दोन्ही शाखा अर्धगोलाकार आकारात एकमेकांच्या हातात हात घालून भारतीय उपखंड कवेत घेत पुढे सरकत जातात.

देशाच्या वायव्य टोकावर, राजस्थानच्या सीमावर्ती भागात जुलैमध्ये मोसमी पाऊस पोहोचतो तेव्हा दक्षिणेकडे पिकांची कापणी सुरू झालेली असते. हा प्रवास दरवर्षी कमीअधिक प्रमाणात असाच होतो. कधी अल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ तर कधी ला निनो म्हणजे तापमानात घट या कारणांनी विषुववृत्ताच्या उत्तरेकडे वाहणाऱ्या, पाण्याने लदबदलेल्या ढगांची दिशा बदलते, ढगांची जलघनता कमीअधिक होते आणि त्याचा परिणाम पावसाच्या प्रमाणावर होतो.

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतुमानात जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आदींमुळे मोसमी पाऊस अलीकडे अधिक लहरी बनला आहे. ऋतुमान विस्कळीत झाले आहे. हिवाळ्यात पाऊस किंवा पावसाळ्यात दडी असे प्रकार वाढले आहेत. जुलैमधील पाऊस कमी होऊन तो अलीकडच्या जूनमध्ये वाढल्याचे तर ऑगस्टमधील पाऊस सप्टेंबरमध्ये सरकल्याच्या काही नोंदी आहेत. प्रशांत व हिंदी या दोन महासागरांसह मान्सूनसाठी अनेक घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असल्यामुळे कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या पलीकडील भूप्रदेशासारखा नेमका अंदाज मोसमी पावसाबद्दल देणे जिकरीचे व जटील आहे, हे खरे.

परंतु, आता आपण एकविसाव्या शतकात, डिजिटल युगात आहोत. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात माणसांचे जगणे सुखकर बनविण्याइतके प्रगत विज्ञान हातात आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मानवी इतिहासातील सर्वोच्च बिंदू गाठला आहे. कित्येक प्रकाशवर्षे दूर अशा ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहताऱ्यांचा, तसेच महासागराच्या खोल तळाचा वेध घेण्याइतके प्रगत विज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध असताना पावसाच्या अंदाजासाठी नशिबावर अवलंबून राहावे लागणे अजिबात भूषणावह नाही. आपले शास्त्रज्ञ व अभ्यासकांपुढे हे मोठे आव्हान आहे.  

Web Title: A cloud of anxiety, not joy, a great challenge for scholars; Misleading farmers due to miscalculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस