..हा तर म्हशीसमोरचा कडबा झाला, श्रीयुत मनोहर भिडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 09:41 AM2022-11-04T09:41:05+5:302022-11-04T09:41:14+5:30
भूतकाळाच्या शिंक्यातले लोणी मटकावण्याच्या लालसेने इतकी डोकी फिरलेली असताना तुम्हाला अनुल्लेखाने दूर सारणे कसे परवडेल ?
- अपर्णा वेलणकर
श्रीयुत मनोहर भिडे, भारतमाता ही सौभाग्यवती आहे, विधवा नाही.. त्यामुळे मुलींनी आपले कपाळ रिकामे ठेवू नये, कपाळावर टिकली लावावी, कारण मुली आणि स्त्रिया हे भारतमातेचेच रूप असते, असा सल्ला तुम्ही एका पत्रकार तरुणीला दिलात. वरून तिला हेही सांगितलेत, की आधी टिकली लावून ये, मग तुझ्याशी बोलतो! यावरून आता वाद पेटला आहे, म्हणजे तुम्ही खूशच असाल. फार दिवसात कुणी तुम्हाला फारसे विचारले नव्हते; आता जो-तो/जी-ती तुमच्याच मागे! आधुनिक जगातल्या विचारांचा वाराही लागू नये म्हणून अति संकुचित परिघात चिणून घेतलेले आणि सतत जातीपातीच्या, भेदभावांच्या कर्दमात रुतून असलेले तुमचे व्रतस्थ की काय ते जीवन, आता निदान दोनेक दिवस तरी सोशल मीडियात तुम्ही झळकत राहाल, मनोहर भिडे! केवढा तो गलबला!!
कपाळावर टिकली लावा सांगितलेत म्हणून चिडलेल्या विचारी स्त्रियांनी तुमच्या विरोधातला संताप नोंदवण्यासाठी हॅशटॅग तयार केलेत... आणि शिकल्यासवरल्या मुलीबाळींंचे आधुनिक वर्तन अजिबात सहन न होणाऱ्या, त्यांच्या आत्मविश्वासाचे-आत्मभानाचे भय वाटणाऱ्यांनी अचूक संधी साधून तुमच्या सदा फिस्कारलेल्या सनातनी मिशीआडून आपापले बाण मारणेही सुरू केले आहे. काय तर म्हणे, लावली टिकली तर काय बिघडले? कपाळावर कुंकू लावणे ही ‘आपली’ संस्कृतीच आहे, कुंकू लावायला लाज वाटते का?... काही महिन्यांपूर्वी #नोटिकलीनोबिझिनेस असा फतवा काढणाऱ्यांनी तर अत्याधुनिक युगातली टेक्नॉलॉजी वापरून पुराणकाळातल्या चिखलातच जगत राहण्याच्या आपल्या अचाट सामर्थ्याचे निर्लज्ज प्रदर्शन टिकलीच्या निमित्ताने पुन्हा एकवार भरवले आहे, मनोहर भिडे! त्यांनाही वाटतेच, बाईने उंबरठ्याआत असावे, नजर खाली ठेवावी, खांद्यावरचा पदर आणि डोईवरची संस्कृती सांभाळावी.
बाई जागची हलली की संस्कृतीचा कडेलोटच!! कुणाही विचारी नागरिकाला त्रास होईल असे बरेच काही सध्या देशात घडते आहे. त्याकडे बारीक दुर्लक्ष व्हायला हवे, तर माध्यमांच्या उपाशी म्हशीसमोर चघळायला कडबा टाकावा लागतोच हल्ली. तुम्ही तो कडबा आहात, असे काहींचे म्हणणे, मनोहर भिडे! कधी म्हणता अमक्या झाडाचा आंबा खाल्ला की हमखास मुलगाच होतो, कधी म्हणता भारतमाता विधवा नाही!...तुम्ही स्वत:च सिध्द करता हे वेळोवेळी, की उद्योग नसलेल्यांना चघळत बसायला कडबा यापलीकडे विचारी जनांनी लक्ष द्यावे, असे काही तुमच्यापाशी नाहीच! ज्या कोणत्या संस्कृतीच्या अतिउच्चतेचा धाक घालून आपले काम चोख करत असलेल्या एका तरुणीला तुम्ही उध्दटपणे फटकारलेत; त्या संस्कृतीने किमान सभ्यता आणि संकेतांचीही एक चौकट रेखलेली आहे, हे तुम्ही कधीच वाचले/ऐकले नाही का हो, मनोहर भिडे?
काही लोक म्हणतात, त्या मुलीने तिथल्या तिथेच उलट उत्तर देऊन तुमचा रुबाब उतरवायला हवा होता! - पण हे इतके सोपे नाही. बाईने टिकली लावलीच पाहिजे, बुरखा घातलाच पाहिजे किंवा घातला नाहीच पाहिजे हे असले फतवे काढणाऱ्यांचा धर्म कोणताही असो, आधुनिक समकालीन स्त्रियांची स्वतंत्र झेप सहन न होण्याच्या दुखण्याचे ते सांगता येऊ नये अशा अवघड जागी झालेले गळू आहे. धर्म, लिंग, जात, देश अशा कोणत्याच निकषाच्या आधाराने कोणाच्याही बाबतीत केला गेलेला दुजाभाव वर्ज्य मानणाऱ्या आधुनिक विचारधारेमुळे ज्यांच्या बुडाखालच्या जुन्या खुर्च्यांना सुरुंग लागले, ते सगळेच रेटारेटी करून अधिकाधिक जुनाट, सनातन होण्याच्या स्पर्धेत जणू धावत सुटले आहेत. हे आपल्याच देशात नाही, जगभर घडते आहे.
आधुनिक जगातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे, संपर्क-जाळ्यांचे, शिक्षण-संधींचे सगळे फायदे हवेत, पण सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनाचे नियमन करणाऱ्या साऱ्या समाजरचना मात्र सनातन काळातल्याच हव्यात असला विचित्र उन्माद जगभरात वाढतो आहे. या उन्मादाला संस्कृती-रक्षणाचा झगमगता वर्खही आहे. एकाच वेळी वर्तमानाचे फायदे लाटून भूतकाळाच्या शिंक्यातले लोणी मटकावण्याच्या या लालसेने भल्याभल्यांची डोकी फिरलेली असताना तुमच्यासारख्या संस्कृती-शिरोमणीला अनुल्लेखाने दूर सारणे कसे परवडेल, मनोहर भिडे! - म्हणूनच केवळ सांगायला हवे, बाईने टिकली लावावी की लावू नये हे तिचे ती ठरवेल. आपण जरा थंड घ्या!!