कॉफी शॉपच्या एकांतात (बि)घडणारी पिढी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:19 AM2023-11-07T09:19:54+5:302023-11-07T09:25:10+5:30

कॉफी शॉप्स आता विरंगुळा म्हणून मित्र वा मैत्रिणींसोबत गप्पा मारण्याचे अड्डे राहिलेले नाहीत. तिथले तरुण घोळके ‘वेगळ्या’ दिशेने चालले आहेत, सावधान!

A generation (b) happening in the solitude of a coffee shop! | कॉफी शॉपच्या एकांतात (बि)घडणारी पिढी!

कॉफी शॉपच्या एकांतात (बि)घडणारी पिढी!

- डॉ. सुनील कुटे
(अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक)

तसं म्हटलं तर देशातील जवळपास सर्वच राज्यांत सुरू असलेल्या कॅफे किंवा कॉफी शॉपमध्ये घडणारी ही नियमित घटना. युवक-युवतींचं तिथे घोळक्याने येणं-जाणं. तासन् तास गप्पांचे फड रंगवणं. पण अलीकडे हे बंद झालं. आता घोळके बंद होऊन जोडीजोडीने येणं, निमुळते जिने चढत वरच्या मजल्यावर जाणं, तिथे अंधुकसा प्रकाश, बाकी गच्च अंधार, दोन फूट बाय दोन फुटांचं छोटंसं टेबल. त्याच्या एका कडेला शेजारी शेजारी लावलेल्या दोन खुर्च्या, टेबलाला तीन बाजूने पार्टिशन. एक बाजू पडदा लावून बंद केलेली, बाजूला मोबाइल चार्जिंगचा पॉईंट. जे तासाला शंभर रुपये देऊ शकतील त्यांच्यासाठी बसण्याची ही टेबल-खुर्चीची व्यवस्था... संपूर्ण ‘प्रायव्हसी’ पुरवणारी... जे त्याहून जास्त म्हणजे तासाला तीनशे रुपये देऊ शकतील त्यांच्यासाठी याहून वेगळी म्हणजे सोफा अथवा मिनी बेड असलेली अशाच प्रकारचं कम्पार्टमेंट असलेली मोठी व्यवस्था.

खाणं-पिणं याचे वेगळे चार्ज. हुक्का वगैरे असेल तर त्याचं वेगळं बिल... काही विशिष्ट कॉफी शॉप्समध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे ड्रग्ज... पण तिथे प्रवेश फक्त नेहमीच्या ‘विश्वासू’ ग्राहकांनाच... अलीकडे या सर्व कॅफेमध्ये जाणवणारा अजून एक बदल म्हणजे महाविद्यालयांशिवाय शाळेतील मुलामुलींचा तेथील सहज वावर. अगदी शाळेचा युनिफॉर्म घालून. मध्ये रॉक किंवा पॉप संगीत. खालच्या मजल्यावर जोडीदार नसलेल्या अभाग्यांसाठी टेबलं-खुर्च्या, चहा, कॉफी, कोल्ड्रिंग्ज, कुकीज अन् फास्ट फूड. म्हटलं तर चार क्षण निवांत विरंगुळा म्हणून मित्र वा मैत्रिणींसोबत गप्पा मारण्याचा अड्डा.
पण हा अड्डा चर्चेत यायचं कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या जागी अशा प्रकारच्या तीन कॅफेवर पडलेल्या पोलिसांच्या धाडी... त्यापाठोपाठ नाशिकला पडलेल्या बारा कॅफेंवरील धाडी... लगेचच नंतर मालेगावच्या धाडी... या धाडीत आढळलेली अनधिकृत पार्टिशन्स, बदललेल्या अंतर्गत रचना, बर्थ डे सेलिब्रेशन रूमच्या नावाखाली सोफा-बेड-पडदे असलेल्या पार्टिशन करून बनविलेल्या छोट्या खोल्या. त्यात आढळलेले कंडोम, हुक्का मारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व गप्पांच्या नावाखाली अश्लील चाळे करणारे शाळा-महाविद्यालयातील तरुण-तरुणी. 

कुणाच्याही व्यक्तिगत स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा प्रश्न नाही. पण, ज्या वयात पुढच्या चाळीस वर्षांच्या व्यावसायिक आयुष्याचा पाया घालायचा, ज्ञान संपादन करायचं, व्यासंग वाढवायचा, करिअरची क्षितिजं काबीज करणारं यश मिळवायचं, खेळाची मैदानं असो की स्पर्धा परीक्षांचे फड, ते गाजवायचे; देशाच्या बेरोजगारीला हातभार न लावता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची स्वप्नं पाहायची, देशाला विश्वगुरू करणं वा तीन ट्रिलियन अर्थव्यवस्थेची महाशक्ती बनविणं इतक्या मोठ्या बाता न मारता किमान स्वतःचं पोट भरण्याइतपत, गेला बाजार या कॅफेतल्या एका बैठकीचं बिल स्वतःच्या कमाईतून भरण्याइतपत सक्षम होणं साधायचं, आई-वडिलांची स्वप्नं पुरी करायची; त्या वयात शाळा-कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये व्यसनं करायची, कॉफी शॉपमध्ये ड्रग्ज वा हुक्का सेवन करायचा, एकमेकांसोबत अनैतिक, बेकायदेशीर व अश्लील कृत्यं करायची, सीसीटीव्ही नसलेल्या कॅफेमध्ये ‘प्रायव्हसी एन्जाॅय’ करायची, बर्थ डे पार्ट्यांच्या नावाखाली नको त्या पार्ट्या साजऱ्या करायच्या हे उद्याच्या भारताच्या तरुण-तरुणींसाठी चिंताजनक आहे.
जनरेशन गॅप वा जुनाट व बुरसटलेले विचार या नावाखाली टीका करत करत आधुनिकतेच्या नावावर अनैतिक व बेकायदेशीर वर्तन व त्याचं समर्थन करणारी व्हाॅट्सॲप विद्यापीठातील युवकांची व युवतींची ही पुढारलेली पिढी अशा गल्लोगल्ली असलेल्या कॅफेमधून (बि)घडत असणं ही पालकांसाठी चिंतेची बाब असली पाहिजे. आम्ही अज्ञानी व पुढची पिढी फारच ‘स्मार्ट’ आहे, असे सतत गोडवे गाणारे आजी-आजोबा असोत की आई-वडील; त्यांच्यासाठी अशा कॉफी शॉप्सना  भेट देण्याच्या सहली आयोजित करण्याची वेळ आली आहे.

टीका करून व पोलिसांच्या धाडी टाकून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी वयात येणाऱ्या मुलांबरोबर पालकांना थोडातरी वेळ घालवावा लागेल. आयुष्यात चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखायला आपल्या कृतीतून आपल्या पुढच्या पिढीला शिकवावं लागेल. घरातल्या मुला-मुलींशी नियमित संवाद साधून त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागेल. आयुष्याचे प्रश्न, जीवनातील आव्हानं, काळ्या व चुकीच्या मार्गाने आलेल्या पैशांचा तिरस्कार, नव्या युगाच्या नव्या आव्हानांसाठी लागणाऱ्या कौशल्यांचे संस्कार, मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन, व्यायामाचा आग्रह, सकस आहाराचं मूल्य, वाचनाची गोडी, सभा-संमेलने व व्याख्यानांना नियमित हजेरी, आपल्या मुला-मुलींसोबत महिन्यातून किमान एकदा जवळपासच्या निसर्ग सहली, शाळा व महाविद्यालयातील आपल्या मुला-मुलींच्या शिक्षक, प्राध्यापकांसोबत नियमित संपर्क, अभ्यासातील प्रगतीवर कठोर लक्ष या बाबी अंमलात आणल्या तरच आई-वडील हे या पिढीचे ‘बेस्ट फ्रेण्ड’ बनतील, अन्यथा कॉफी शॉपकडे वळलेल्या या पावलांची पुढची वाटचाल कारागृहाच्या गजांकडे झाल्याशिवाय राहणार नाही.
 

Web Title: A generation (b) happening in the solitude of a coffee shop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.