चंडीगडच्या विकृतीचा धडा, मुलींचे स्नान करतानाचे व्हिडिओ काढल्याने संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 08:40 AM2022-09-20T08:40:14+5:302022-09-20T08:40:52+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तसेच त्यांच्या आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सखोल तपासाचा शब्द विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिला आहे
विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींचे स्नान करताना, कपडे बदलतानाचे व्हिडिओ त्यांची सहपाठी विद्यार्थिनीच काढते, ते तिच्या सिमला येथे राहणाऱ्या मित्राला पाठवते, तिथून ते सोशल मीडियावर जातात आणि देशभर खळबळ माजते, हा चंडीगडमधील प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. हा प्रकार चव्हाट्यावर येताच, साहजिकच विद्यार्थिनी संतापल्या. त्यांनी मोठे आंदोलन केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ती विद्यार्थिनी, तिचा मित्र, तसेच वसतिगृहाच्या अधीक्षिकेला अटक केली आहे. नेमक्या किती विद्यार्थिनींचे असे व्हिडिओ काढले गेले, त्या मुलीनेच ते काढले का आणि तिच्या मित्राशिवाय आणखी कुणाचा ते व्हिडिओ सोशल मीडियावर, इंटरनेटवर जाण्यात हात आहे का, वगैरे प्रश्नांची उत्तरे अर्थातच संबंधितांच्या मोबाइलची फाॅरेन्सिक तपासणी केल्यानंतरच मिळतील, पण तत्पूर्वीच या प्रकारात अफवांचे पेव फुटले. व्हिडिओंची संख्या हा सुरुवातीच्या अफवांचा भाग होता. हा प्रकार उजेडात येताच, काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही अफवा पसरली. प्रत्यक्षात तसे काहीही घडले नसल्याचे पोलीस, तसेच विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. सरकारने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तसेच त्यांच्या आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सखोल तपासाचा शब्द विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिला आहे. संयम राखण्याचे आवाहन केले आहे. देशभर भावनाही अशीच आहे की, महाविद्यालयीन जीवनातील अशी घटना तरुण मुलींच्या आयुष्यावर, त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कारकिर्दीवर दूरगामी परिणाम करणारी असल्याने त्यांना सांभाळायला हवे. दोषींना अजिबात दयामाया दाखविली जाऊ नये. अशी विकृती ठेचून काढायला हवी. अर्थात, ही जबाबदारी केवळ सरकार किंवा पोलिसांचीच नाही. माध्यमे, राजकारणी यांनीही अशी नाजूक प्रकरणे अधिक संवेदनशीलपणे हाताळायला हवीत. सामान्य जनतेनेही अफवांना बळी पडून लगेच उत्तेजित व्हायला नको. अशा प्रकरणात आपली दृकश्राव्य माध्यमे चेकाळल्यासारखे वृत्तांकन करतात. याही वेळेस व्हिडीओची वर्णने वगैरे प्रकार झाले. ते टाळायला हवेत. देशातील समृद्ध राज्यांपैकी एक असलेले पंजाब आधीच मादक द्रव्यांसाठी बदनाम आहे. त्यात या एमएमएसची भर पडली, तर केवळ तरुणाईचेच नव्हे, तर त्या राज्याचे, देशाचे मोठे नुकसान होईल, हे भान राखायला हवे. चंडीगड विद्यापीठातील हा प्रकार अनेक दृष्टीने समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. जणू एक धडाच या प्रकाराने देशाला शिकविला आहे.
सोशल मीडिया, इंटरनेटवरील पॉर्न वगैरे विकृती आणि त्यावर पोसला जाणारा आंबटशौकीन वर्ग या सर्वांनी मिळून कोणती संकटे आपल्यापुढे वाढून ठेवली आहेत, याची चुणूकच जणू या घटनेने दाखवून दिली आहे. आतापर्यंत आपण इंटरनेटचे दुष्परिणाम, त्यातून घरातील टीनएजर्स मुले-मुली कशी पॉर्नच्या आहारी गेलीत, पौगंडावस्थेतील मुले, तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेली तरुणाई कशी वाहवत चालली आहे, याची चर्चा व चिंता करीत आलो. मात्र, ही चर्चा कधीच, उमलत्या वयात मुलांना योग्य ते लैंगिक शिक्षण देणे, शरीररचना समजावून सांगणे, या वैज्ञानिक अंगांनी झाली नाही. त्याऐवजी त्यांना शारीरिक आकर्षणापासून परावृत्त करण्यासाठी सांगितले जाणारे बहुतेक उपाय सांस्कृतिक आहेत. त्यात शाळकरी मुलामुलींना एकमेकांपासून दूर ठेवणे, त्यांचे वेगवेगळे वर्ग भरविणे वगैरे तद्दन अवैज्ञानिक गोष्टींचा फापटपसारा आपल्यापुढे मांडला जातो. कधीतरी हे समजून घ्यायला हवे की, हे आकर्षण वगैरे सारे काही नैसर्गिक आहे. मुलांना जितके परावृत्त करीत जाऊ, तितके त्यांच्यात या गोष्टींचे आकर्षण वाढत जाईल. एका टप्प्यावर त्या आकर्षणातून विकृती जन्माला येते. त्या विकृतीच्या अपत्याचे पालनपोषण आधुनिक तंत्रज्ञान करते. संपूर्ण जग स्मार्टफोनच्या रूपाने तरुण पिढीच्या हातात सामावलेले असते. सोशल मीडिया त्याला खतपाणी घालतो आणि एक दिवस अचानकपणे चंडीगडसारखा स्फोट होतो. हे टाळण्यासाठी शैक्षणिक संस्था, त्यावर नियंत्रण ठेवणारी सरकारी यंत्रणा, माध्यमे, जाणकार तज्ज्ञ या सर्वांनी वेळीच दक्षता घ्यायला हवी. लैंगिक शिक्षणाचा आग्रह ते संपर्क साधने, इंटरनेट, समाजमाध्यमांचा वापर करताना तारतम्य, त्यांच्या दुष्परिणामाबद्दल जागृती याबद्दल कृतिशील पावले उचलायला हवीत.