एक पत्र, शंभर डॉलर आणि २३ वर्षांनी भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 07:52 AM2023-01-26T07:52:39+5:302023-01-26T07:52:53+5:30

३१ मे १९९९ या दिवशी १७ वर्षांची वांजा कोन्टिनो आणि १२ वर्षांची आयडा झुगे या दोन मुली आपला युगोस्लाव्हिया हा देश आणि आपल्या आई-वडिलांना कायमचं सोडून देऊन अमेरिकेच्या विमानात बसल्या होत्या.

A letter a hundred dollars and a gift after 23 years | एक पत्र, शंभर डॉलर आणि २३ वर्षांनी भेट!

एक पत्र, शंभर डॉलर आणि २३ वर्षांनी भेट!

Next

३१ मे १९९९ या दिवशी १७ वर्षांची वांजा कोन्टिनो आणि १२ वर्षांची आयडा झुगे या दोन मुली आपला युगोस्लाव्हिया हा देश आणि आपल्या आई-वडिलांना कायमचं सोडून देऊन अमेरिकेच्या विमानात बसल्या होत्या. त्यांच्यापैकी वांजाला जेमतेम मोडकंतोडकं इंग्लिश येत होतं आणि आयडाचा तर तोवर इंग्लिश भाषेशी काही संबंधच आलेला नव्हता. असं असताना त्या दोघीच अमेरिकेच्या विमानात बसल्या होत्या, कारण त्यांना अमेरिकेत आश्रय मागायचा होता. युगोस्लाव्हियात त्यावेळी इतकी पराकोटीची युद्धपरिस्थिती होती की, तिथल्या नागरिकांना जिवंत राहण्याचीही शाश्वती वाटत नव्हती. अशा वेळी जर दोन अज्ञान मुली अमेरिकेत आसरा मागायला गेल्या तर त्यांना तो कदाचित अधिक सहज मिळेल अशा अंदाजाने त्या दोघीच बहिणी अमेरिकेला यायला निघाल्या होत्या.

त्याच विमानात ट्रेसी पेक नावाची एक चाळिशीतील अमेरिकन महिला होती. योगायोगाने तिची जागा या दोघी बहिणींच्या जवळ होती. ट्रेसी टेनिस खेळायची आणि नुकतीच पार पडलेली फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा बघून ती मायदेशी परत निघाली होती. तिने सहज या दोन मुलींची चौकशी केली. त्या दोघींनी मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये तिला त्यांची सगळी कहाणी ऐकवली. 

ते ऐकल्यावर विमान उतरण्याच्या वेळी ट्रेसीने त्या दोघींच्या हातात एक पाकीट ठेवलं. त्या पाकिटावर लिहिलं होतं, “युगोस्लाव्हियाहून आलेल्या मुलींना, तुमच्या देशात होणाऱ्या बॉम्बवर्षावामुळे तुमच्या कुटुंबाला इतका त्रास सहन करावा लागतोय याबद्दल मला फार वाईट वाटतं आहे. तुमचा अमेरिकेतील मुक्काम सुरक्षित आणि आनंददायी असेल अशी मला आशा आहे. अमेरिकेत तुमचं स्वागत आहे. अमेरिकेत राहण्यासाठी तुम्ही हे वापरा. - तुमची विमानातील मैत्रीण, ट्रेसी”

ट्रेसीने पाकिटात घालून त्या दोघा बहिणींना शंभर डॉलर्स दिले होते. वांजा आणि आयडाने अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवण्याआधीच त्यांना एका अमेरिकन नागरिकाने आपलं म्हटलं होतं. विमान अमेरिकेच्या भूमीवर उतरलं आणि ट्रेसी तिच्या मार्गाने निघून गेली. वांजा आणि आयडाचा अमेरिकेतील प्रवास सुरू झाला. हा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. मात्र, या दोघा बहिणींनी त्यातून मार्ग काढत अतिशय कष्टानं अमेरिकेत स्वतःचं 
आयुष्य उभं केलं. या सगळ्या प्रवासात त्यांना साथ देत होतं ते ट्रेसीने एका पाकिटावर लिहिलेलं छोटंसं 

पत्र. काहीही ओळखदेख नसताना कुठल्याशा परक्या देशातून अमेरिकेत स्वतःच्या हिमतीवर जगायला येऊ पाहणाऱ्या दोन लहान मुलींना उभारी देणारं छोटंसं दोन-चार ओळींचं पत्र! 

आज वांजा एक्केचाळीस वर्षांची आहे, तर आयडा पस्तीस वर्षांची आहे. दोघीही त्यांच्या आयुष्यात स्थिरावल्या आहेत. वांजा तर भूलतज्ज्ञ झाली आहे. आयुष्य थोडं मार्गी लागल्यावर दोघी बहिणींनी आपल्याला भेटलेल्या विमानातल्या मैत्रिणीचा शोध घ्यायला सुरुवात केली; पण तिला शोधण्याची सुरुवात कुठून करावी हेही त्यांना कळत नव्हतं. त्यांना केवळ तिचं ट्रेसी हे नाव माहीत होतं आणि त्यांच्याकडे तिच्या हस्ताक्षरातील पत्र होतं. आणि हो, ती टेनिस खेळते हीही एक माहिती त्यांना होती.

तेवढ्याच माहितीवर विसंबून त्यांनी ट्रेसीला शोधायला सुरुवात केली. कारण त्यांचं आयुष्य मार्गी लागण्यात तिचा फार मोठा हात होता. त्यांनी तिच्या हस्ताक्षरातील पत्र आणि तिच्याबद्दल होती तेवढी माहिती सोशल मीडियावर टाकली. ट्रेसीला शोधण्याच्या या प्रवासात अनेक जणांनी मदत केली. त्यांनी केलेलं आवाहन अक्षरशः लाखो लोकांपर्यंत पोहोचलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातल्या काहींनी चक्क तिचं हस्ताक्षर ओळखलं आणि सांगितलं, ‘अरे, ही तर मिनेसोटाच्या ब्लेनमधली ट्रेसी पेक आहे!’

हा सगळा शोध घेण्यात सोशल मीडियाने खूप मदत केली आणि या दोन्ही बहिणींचा ट्रेसीशी संपर्कही झाला; पण त्यांची प्रत्यक्ष भेट मात्र झाली नव्हती. २३ वर्षं वाट बघून जी भेट झाली ती मात्र वाजतगाजत आणि लाखो लोकांच्या साक्षीने. कारण या तिघी जणी भेटल्या त्या थेट ‘सीएनएन हिरोज - ॲन ऑल स्टार्स ट्रिब्यूट’ या कार्यक्रमात, न्यू यॉर्कमध्ये!

‘नाहीतर मी बोहल्यावर चढणारच नाही!’
तब्बल २३ वर्षांनी भेट झाल्यानंतर तिघींचेही डोळे पाणावले होते. दोघी बहिणी वांजा आणि आयडा म्हणतात, आता ट्रेसीला आम्ही पुन्हा हरवू देणार नाही. त्या दोघींना जणू त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, मोठी बहीण भेटल्याचा आनंद झाला होता. आयडा लवकरच लग्न करणार आहे. त्या लग्नाला अर्थातच ट्रेसी येणार आहे. आयडा म्हणते, ट्रेसी आल्याशिवाय मी ‘बोहल्यावर’ चढणारच नाही! काही झालं तरी अमेरिकन भूमीवरची तिची ती पहिली मैत्रीण आहे!

Web Title: A letter a hundred dollars and a gift after 23 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.