सिने उद्योगातल्या स्त्रियांच्या छळाची मल्याळी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:18 AM2024-08-24T05:18:21+5:302024-08-24T05:19:29+5:30

मल्याळम चित्रपट उद्योगातील स्त्री कलाकारांच्या लैंगिक छळाला वाचा फोडणाऱ्या के. हेमा आयोगाच्या अहवालाने जुनीच चर्चा नव्याने सुरू केली आहे.

A Malayalam story of harassment of women in the film industry | सिने उद्योगातल्या स्त्रियांच्या छळाची मल्याळी कहाणी

सिने उद्योगातल्या स्त्रियांच्या छळाची मल्याळी कहाणी

- अमोल उदगीरकर
(चित्रपट समीक्षक, अभ्यासक)

‘आट्टम’ या एका नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या विनयभंगानंतर तिच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये उठलेलं वादळ दाखवणाऱ्या मल्याळम सिनेमाला  सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला असतानाच केरळात आणि काही प्रमाणात उर्वरित देशातही ‘के. हेमा आयोगा’च्या अहवालावरून धुरळा उडालेला असणं, हा एक रोचक योगायोग आहे. के. हेमा आयोगाच्या अहवालात मल्याळम चित्रपट उद्योगात कार्यरत असणाऱ्या स्त्री कलाकारांच्या लैंगिक छळाबद्दल आणि त्यांना होणाऱ्या इतर त्रासांबद्दल अतिशय गंभीर निरीक्षणं मांडलेली आहेत.

या आयोगाने हा अहवाल अनेक स्त्री कलावंतांना भेटून आणि बोलून तयार केलेला आहे. मल्याळम चित्रपट उद्योगाचं  पुरुषप्रधान असणं आणि त्यातून स्त्री कलाकारांना मिळणारी तुच्छतापूर्ण दुय्यम वागणूक यानिमित्ताने पुन्हा दृग्गोचर झाली आहे. अर्थात भारतातल्या बहुतेक चित्रपट उद्योगात अशीच परिस्थिती आहे, हे अमान्य करण्यातही अर्थ नाही. देशातल्या सर्वभाषिक चित्रपट उद्योगात स्त्री कलाकारांवर इंडस्ट्रीतल्या ताकदवान पुरुषी धेंडांनी अन्याय - अत्याचार केल्याची अनेक उदाहरणं सापडतील.

केरळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना २०१७  साली झाली. हा आयोग स्थापन करण्याची निकड मुळातच निर्माण का झाली, हे लक्षात घेतलं तर वरकरणी सगळं उत्तम चालू असलेला मल्याळम चित्रपट उद्योग आतून कसा सडत चालला आहे, हे कळू शकतं. एका लोकप्रिय मल्याळम अभिनेत्रीचं काही गुंडांनी अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्या अत्याचाराचं चित्रीकरण  केलं. चौकशीअंती या गुन्ह्याची पाळंमुळं मल्याळम सुपरस्टार दिलीपपर्यंत पोचायला लागली आणि केरळात एकच वादळ उठलं.

दिलीप हा प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांचाही लाडका, मामुटी आणि मोहनलाल यांच्या श्रेणीतला अभिनेता. त्याच्यावरच आरोप केले गेल्याने केरळातलं समाजमन ढवळून निघालं. या प्रकरणात चक्क दिलीपला काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. आता दिलीप जामिनावर बाहेर आला आहे आणि पुन्हा जोमाने कार्यरत आहे. कोर्टात अनेक साक्षीदारांनी आपल्या जबान्या फिरवल्या. मल्याळम चित्रपट उद्योगातले अनेक बडे निर्माते, कलावंत ठामपणे दिलीपच्या मागे उभे राहिले. मोहनलालसारख्या  अभिनेत्याने  अप्रत्यक्ष का होईना, दिलीपचीच बाजू घेतली.

शेवटी हे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण  थंड बस्त्यात जाण्याच्या मार्गावर असतानाच के. हेमा आयोगाचा अहवाल आला आहे. जिच्यासोबत हे दुर्दैवी प्रकरण घडलं ती अभिनेत्री आता जवळपास सक्तीची निवृत्ती घेऊन घरी बसली आहे. पण, या प्रकरणात उठलेल्या धुरळ्यानंतर सरकारला काही पावलं उचलणं भाग होतं. सरकारने मल्याळम चित्रपट सृष्टीतल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेचा  आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय आयोग निर्माण केला. या आयोगाने आपला अहवाल २०१९  सालीच सरकारला दिला होता. पण, या अहवालात अनेक बड्या धेंडांची नावं असल्याने हा अहवाल प्रसिद्ध होऊ नये, यासाठी प्रचंड दबाव आला.

प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यान महिला कलाकारांना किती वाईट परिस्थितीमध्ये काम करावं लागतं, याचा उल्लेख अहवालात आहे. मध्यरात्री अभिनेत्रीच्या हॉटेल रुमचा दरवाजा जोरजोरात बडवला जाणं, एखाद्या भूमिकेसाठी निर्मात्यासोबत किंवा अभिनेत्यासोबत ‘ॲडजेस्टमेंट’ करण्याचा दबाव हे नेहमी घडणारे प्रकार. जी अभिनेत्री अशा दबावांना झुगारून लावण्याचा प्रयत्न करील, तिच्यावर अघोषित ‘बॅन’ लावला जातो, तिला काम मिळणं हळूहळू बंद होतं, हे सारं या अहवालात उघड झालं. 

पाच वर्षांनंतर प्रकाशित झाला असला तरी या अहवालाची स्थिती दात आणि नखं काढलेल्या सिंहासारखी आहे. कारण मूळ अहवालात असलेली नावं प्रकाशित अहवालातून  वगळली आहेत. नावंच  नाहीत म्हटल्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही. आता केरळ सरकार काय (कारवाई) करतं, हे बघणं रोचक राहील. केरळ हे साक्षरतेचा प्रसार झालेलं पुरोगामी राज्य मानलं जातं. त्या राज्यातल्या चित्रपट उद्योगात इतकी भयानक परिस्थिती असेल तर देशातल्या इतर ठिकाणी काय अवस्था असेल, याचा अंदाज करता येतोच! सध्या अख्खा देश मल्याळम सिनेमाच्या प्रेमात असताना तिथेच उघडकीला आलेली ही प्रकरणं अस्वस्थ करणारी आहेत. 

मध्यंतरी बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ प्रकरणाची लाट आली होती. अनेक बडी नावं यात होती. पुढे काय झालं?- कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही. आर्थिक मोबदला देऊन अनेक प्रकरणं दाबण्यात आली. ज्यांची ज्यांची नावं ‘मी टू’मध्ये होती, ते सगळे पहिल्यासारखेच कार्यरत आहेत. केरळमध्ये पण काही वेगळं होईल,  याची सुतराम शक्यता नाही. हॉलिवूडमध्ये हार्वे विन्स्टाईनसारखा बडा निर्माता कास्टिंग काऊचचे आरोप लागताच त्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारागृहात जातो. 

यासंदर्भात आपल्या व्यवस्थेचं पंगूपण अजूनच अस्वस्थ करून जातं. ‘आट्टम’मधल्या त्या अभिनेत्रीसोबत  विनयभंगाचा प्रकार घडल्यानंतर अनेक वर्षांपासून सोबत काम करणारे तिचे सहकारी तिला साथ द्यायचं नाकारून स्वार्थ सांभाळायला लागतात. यात तिचा प्रियकरही असतो. काही सहकारी मित्र तर तिच्यावरच संशय घ्यायला लागतात. शेवटी ती अभिनेत्रीच तो ग्रुप सोडून निघून जाते... खऱ्या आयुष्याचं  प्रतिबिंब कलेमध्ये  पडतं ते असं.

Web Title: A Malayalam story of harassment of women in the film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.