उंचावरून पडलेला माणूस मरतो, मांजर का नाही?
By Shrimant Mane | Published: August 5, 2023 11:52 AM2023-08-05T11:52:16+5:302023-08-05T11:54:52+5:30
उंचावरून टाकल्यानंतर सरळ पायावर उतरण्याचे मांजराचे कौशल्य म्हणजे ‘फॉलिंग कॅट प्रॉब्लेम’! हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न संशोधक करताहेत.
श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर -
घरात सतत पायांत घुटमळणारे, बघाल तेव्हा झोप घेणारे मांजर अनेकांचे लाडके असेल. ते कुत्र्याइतके इमानदार नसले तरी अनेकांच्या कुटुंबात रमते खरे! अर्थात लोक खबरदारी घेतातच. मांजराला बंद खोलीत मारण्याचा प्रयत्न करू नये, ते सरळ नरडीवर झेप घेते. मांजराला मारले तर प्रायश्चित्त घ्यावे लागते म्हणे! हेच मांजर चांगल्या कामाला निघताना आडवे गेले तर अंधश्रद्धाळू मंडळींना अपशकुन वाटतो. प्रत्यक्षात त्याला यातील काहीच माहिती नसते; पण, घरातले माणसाळलेले किंवा जंगलातले रानमांजर असो; चतुष्पाद प्राण्यांपैकी सर्वांत भन्नाट असे कौशल्य त्याच्या अंगी असते आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी त्याचे उदाहरण अनेक वेळा दिले जाते. कुठूनही फेकले, तरी मांजर जसे चार पायांवर उभे राहते तसे स्पर्धेत टिकून राहता आले पाहिजे.
उंचावरून टाकल्यानंतर सरळ पायावर उतरण्याचे मांजराचे शारीरिक कौशल्य ‘फॉलिंग कॅट प्रॉब्लेम’ म्हणून ओळखले जाते आणि तो तिढा सोडविण्याचा प्रयत्न जगभरातील संशोधक, अभ्यासक अनेक वर्षे करताहेत. त्यात जॉर्ज गॅब्रिअल स्टोक्स, जेम्स क्लर्क मॅक्सवेल व इटेन जुल मारे यांची नावे प्रमुख आहेत. मॅक्सवेल यांनी मांजर वेगवेगळ्या उंचीवरून खाली टाकून परिणामांचे बारकावे टिपले; तर फ्रेंच संशाेधक इटेन जुल मारे यांनी एकशे तीस वर्षांपूर्वी या अभ्यासाचा पायाच घातला. मारे यांनी १० नोव्हेंबर १८९४ रोजी एका बगीच्यात उंचावरून फेकलेले मांजर नेमके चार पायांवरच कसे पडते हे दाखविणारी एक फिल्म बनवली. सेकंदाला १२ फ्रेम घेणारा त्या काळाच्या मानाने आधुनिक कॅमेरा त्यासाठी वापरला. तो मांजरावरचा पहिला; तर एकोणिसाव्या शतकातील केवळ तिसरा चलत्चित्रपट होता. त्यात दिसले की, मांजराचे चारही पाय हातात धरून वरून उलटे फेकलेले मांजर सुरुवातीला जसे फेकले तसे म्हणजे उलटेच खाली येते. मग स्वत:च्याच अक्षाभोवती गिरकी घेऊन सरळ होते आणि जमिनीवर चार पायांवरच उभे राहते.
मांजर असे कसे पायांवरच उभे राहते, याविषयीचा ठाम निष्कर्ष त्यानंतर जवळपास पाऊणशे वर्षांनंतर निघाला. १९६९ साली कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील टी. आर. केन आणि एम. पी. शेअर यांचे ‘अ डायनॅमिकल एक्स्प्लनेशन ऑफ द फॉलिंग कॅट फिनामिनन’ नावाचे संशोधन प्रसिद्ध झाले. त्यांनी यांत्रिकी विज्ञानाच्या अंगाने मांजरांच्या लँडिंगचे विश्लेषण केले आणि फॉलिंग कॅटचा गुंता बऱ्यापैकी सुटला. अगदी अलीकडे, युराेपियन फिजिकल सोसायटीने हानो एसेन व आर्न नाॅर्डमार्क यांचे ‘अ सिम्पल मॉडेल फॉर फॉलिंग कॅट प्राॅब्लेम’ नावाने पुढचे अधिक सखोल संशोधन ‘जर्नल ऑफ फिजिक्स’मध्ये प्रकाशित केले.
या अभ्यासकांनी नोंदविलेली मांजराच्या अद्भुत कौशल्याची काही वैज्ञानिक निरीक्षणे - उंचावरून खाली येत असताना मांजराचे धड वाकते; पण ते मुरगळत नाही. हवेतच सुरुवातीला मणका पुढच्या बाजूला झुकतो. त्यानंतर आधी एका बाजूला, मग मागे, मग दुसऱ्या बाजूला व शेवटी पुढच्या बाजूला अशी शरीराची जणू घुसळण होते. या चक्राकार हालचालींमध्ये अगदी सुरुवातीला पुढचे व मागचे असे चारही पंजे मांजर शरीराजवळ घेते, जेणेकरून शरीरातील जडत्वाची गती कमी होते. शरीराचा झुकाव मागच्या बाजूला असतो. शरीराचा वरचा म्हणजे मणक्याचा भाग स्वत:च्या अक्षाभोवती फिरतो. नंतर मांजर पुढचे पाय जमिनीवर उतरण्याच्या तयारीने पुढे आणते. मागचे पाय अधिक ताणले जातात. पाठीचा कणा ताठ, उंच होतो. जेणेकरून शरीराचा भार गरजेनुसार मागच्या व पुढच्या बाजूला ढकलला जातो. मणका इतका लवचिक असतो की शरीराची अशी हवेतच घुसळण शक्य होते. अखेरची गिरकी अशा पद्धतीने घेतली जाते की, शरीराचा पुढचा भाग मागच्या भागापेक्षा मोठा दिसायला लागतो. अभ्यासकांनी या चक्राकार क्रियेची तुलना मसाल्याचे पदार्थ दळणाऱ्या पेपरमिल रोटेशनशी केली आहे. यात कोणत्याही स्थितीत अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोनीय संवेग बदलत नाही.
हा सगळा अभ्यास वैज्ञानिक अंगाने आणि भौतिकशास्त्रातील मूलभूत प्रमेये नजरेसमाेर ठेवून होत असताना, मांजर थेट त्या नियमांनाच कसा चकवा देते हे १९८० मध्ये न्यूयॉर्कमध्ये दिसून आले. त्या शहरात जून ते नोव्हेंबरदरम्यान उंच इमारतींवरून मांजर पडल्याच्या १३२ घटनांचा अभ्यास दोन पशुवैद्यकांनी केला. तेव्हा, आढळले की प्राणी जितका उंचावरून पडेल तितकी गंभीर दुखापत अथवा वाचण्याची शक्यता कमी, हा भौतिकशास्त्राचा नियम मांजरांनी पार धुडकावून लावला. ३२ व्या मजल्यापर्यंतच्या उंचीवरून पडलेल्या त्या मांजरांपैकी ९० टक्के मांजरांचा जीव वाचला.
जी मेली ती बरगड्या तुटल्यामुळे. सातव्या मजल्यापर्यंतच्या उंचीवरून पडलेल्या मांजरांच्या जखमा अधिक गंभीर होत्या. त्यापेक्षा अधिक उंचीवरून पडलेल्या मांजरांना जणू पक्ष्यांप्रमाणे जमिनीवर उतरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. त्यांच्या जखमा तितक्या गंभीर नव्हत्या. अकराव्या किंवा बाराव्या मजल्यावरून पडलेल्या मांजरापेक्षा सहाव्या किंवा पाचव्या मजल्यावरून पडलेल्या मांजरांच्या जिवाला अधिक धोका पाेहोचला. उंचावरून पडलेल्या मांजरांना पृथ्वीची गुरुत्त्वाकर्षण शक्ती आणि हवेतून खाली येताना तयार होणारी घर्षणशक्ती अशा दोन परस्परविरोधी शक्तींचा सामना करावा लागला. त्यामुळे अधिक उंचावरून पडलेल्या मांजरांना गती कमी करण्यासाठी थोडा वेळा मिळाला आणि ती वाचली.
shrimant.mane@lokmat.com