बाळाला घरात कोंडून आई गेली सहलीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 08:06 AM2024-05-16T08:06:10+5:302024-05-16T08:06:31+5:30

बाळासाठी आई काय असते हे वर्णन शब्दात करता येणे अशक्य.

a mother went on a trip after locking the baby in the house | बाळाला घरात कोंडून आई गेली सहलीला!

बाळाला घरात कोंडून आई गेली सहलीला!

बाळासाठी आई काय असते हे वर्णन शब्दात करता येणे अशक्य. प्रेम, विश्वास, सुरक्षा हे सर्व बाळाला आई देत असते. बाकी काही नको. बाळाला समोर फक्त आई हवी असते. बाळाची भूक म्हणजे आईचा सहवास. हे सत्य जगात कुठेही जा, बदलत नाही. याला अमेरिकेतील ओहायो राज्यातील क्रिस्टेल कॅंडेलारियोसारखी आई अपवाद असू शकते. 

आपल्या १६ महिन्यांच्या मुलीसोबत एखादी आई एवढी निष्ठूर कशी वागू शकते, असा प्रश्न न्यायालयाने शिक्षा सुनावण्याआधी उपस्थित केला. क्रिस्टेल हिला तिच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिवाय या शिक्षेरम्यान ती एकही दिवस पॅरोलवर बाहेर येणार नाही याची तरतूदही या शिक्षेत करण्यात आली आहे. आपल्या बाळाला जो त्रास क्रिस्टेलने दिला आहे त्यासाठी यापेक्षा कमी शिक्षा असूच शकणार नाही असं कोर्टाचं म्हणणं पडलं.

किस्टेलने असं केलं तरी काय? -ही घटना आहे जून २०२३ मधली. आपल्याशिवाय १६ महिन्यांच्या जेलिनचं कसं होईल, याचा जरासाही विचार न करता क्रिस्टेल ६ जूनला सरळ आपल्या मित्रासोबत सहलीला निघून गेली. जेलिनला तिने घरात प्लेपेनमध्ये (बाळांसाठी बनवलेली एक लाकडी चौकट. जमिनीवर त्या चौकटीचा अडसर लावून बाळांना आत ठेवतात) ठेवलं. त्यात दुधाच्या बाटल्या ठेवल्या आणि घराला कुलूप लावून क्रिस्टेल निघून गेली. 

एक दोन नाही, तब्बल दहा दिवसांनी म्हणजे १६ जूनला ती घरी परत आली. तेव्हा तिला जेलिन मृत अवस्थेत आढळली. तिने तातडीने ९११ क्रमांकावर फोन करून ‘माझी मुलगी मरते आहे, मला प्लीज मदत करा’ असा संदेश दिला. कोणी पोहोचण्याआधी तिने जेलिनचे कपडे बदलले. पण, बाळाला स्वच्छ कपडे घातले म्हणून आईनं केलेल्या गुन्ह्याचं चित्र बदललं नाही. पोलिस आले. वैद्यकीय परीक्षक आले. तेथील एकूण परिस्थिती बघता क्रिस्टेलच्या सांगण्यात त्यांना विसंगती आढळली. 

प्रत्यक्ष परिस्थिती पाहणाऱ्याचं हृदय पिळवटून टाकणारी स्थिती होती. जेलिन पडलेली होती ती जागा शू आणि शीने भरलेली होती. जेलिनचे डोळे बाहेर आलेले होते. ओठ सुकलेले होते. तिच्या तोंडात शी आणि हाताचे नखही आढळले. 

पोलिस आणि गुप्तहेरांनी आजूबाजूला चौकशी केली असता क्रिस्टेल जेलिनला एकटीला टाकून निघून गेल्याच्या  दुसऱ्या दिवशी रात्री मधूनमधून तिचं मोठमोठ्यानं किंचाळणंही शेजारच्यांना ऐकू आलं होतं. या सहलीला जाण्यापूर्वी क्रिस्टेल एकदा दोन दिवस जेलिनला एकटीला घरात ठेवून बाहेर गेली होती हेही तपासादरम्यान उघड झालं. जेलिनचा मृत्यू एकटेपणाच्या भीतीने, तीव्र भूक आणि तहानेने झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तपास पथकांनी दिला. 

९ महिने ते १८ महिने या कालावधीत बाळांना एकटेपणाची प्रचंड भीती असते. जेलिनच्या वाट्याला हेच एकटेपण आलं होतं. मुलगी भुकेने तळमळत होती, आई दिसावी म्हणून तडफडत होती तेव्हा क्रिस्टेल १०० मैल अंतरावरील एका पिकनिक स्पाॅटवर आपल्या मित्रासोबत आनंदाचे क्षण घालवत होती. ते फोटो समाजमाध्यमांवरून शेअर करत होती. 

कोर्टात खटला सुरू असताना क्रिस्टेल आपल्याला कोर्टाने माफी द्यावी यासाठी याचना करत होती. मी माझ्या वागण्याचं समर्थन करत नाहीये, पण मला काय त्रास होतोय हे कोणालाच माहीत नाही. देव आणि जेलिन मला माफ करेल!’ असा आक्रोश करत होती. पण, आई आणि बाळामधील विश्वासलाच तडा देणाऱ्या किस्टेलला  शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीशांनी खडे बोल सुनावले. आई आणि बाळाचं नातं म्हणजे पवित्र नातं. पण, जेलिनशी इतक्या निर्दयीपणे वागून क्रिस्टेलने, आपल्या बाळाचा आणि या नात्याचाच विश्वासघात केला. 

आई असून, आपल्या निष्पाप बाळाला एका ‘तुरुंगात’ ठेवण्याचा गुन्हा क्रिस्टेलने केला. हा तुरुंगवास आता क्रिस्टेललाही भोगणं अपरिहार्य आहे. फरक इतकाच की जेलिनच्या तुरुंगवासात तिला खायलाही नव्हतं, क्रिस्टेलला तुरुंगवासात खायला मिळेल, पण तिला मुक्त सोडणं योग्य नाही, असं म्हणत कोर्टाने क्रिस्टेलला आजन्म तरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

क्रिस्टेलने हे मुद्दाम केलं नाही! 

क्रिस्टेल आजारी आहे, ती मानसिक रुग्ण आहे. तिने हे मुद्दाम केलं नाही. ती जेव्हा मानसिक आजारपणावरची औषधं घेत नाही तेव्हा क्रिस्टेलचं नैराश्य आणि भीती वाढते. ती या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि हे असं काही होईल, झालं असेल याची कल्पना कुटुंबातल्या कोणालाच नव्हती, असा जबाब क्रिस्टेलच्या आईने केटी टोरेसने दिला. पण, यामुळे वस्तुस्थिती बदलणार नव्हती. न्यायालयानं क्रिस्टेलला शिक्षा दिलीच..

 

Web Title: a mother went on a trip after locking the baby in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.