मुलांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाचा आता प्रारंभ
By किरण अग्रवाल | Published: June 4, 2023 11:19 AM2023-06-04T11:19:08+5:302023-06-04T11:19:35+5:30
SSC Exam : इयत्ता दहावीचा निकाल हा आयुष्याला वळण देणारा महत्त्वाचा टप्पा असतो हे खरेच, पण तेच आणि तेवढेच खरे हे मात्र चुकीचे.
- किरण अग्रवाल
आयुष्याला वळण देणाऱ्या टप्प्यावर पालक म्हणून निर्णय घेताना केवळ मुलांची मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून उपयोगाचे नसते, तर त्यांच्यातील उपजत कलागुण हेरून त्यातील त्यांची रुची व गतीदेखील लक्षात घेणे गरजेचे असते. तसे केले गेले तर पुढील शिक्षणाचीच नव्हे, आयुष्याची परीक्षाही उत्तीर्ण होणे अवघड ठरत नाही.
इयत्ता दहावीचा निकाल हा आयुष्याला वळण देणारा महत्त्वाचा टप्पा असतो हे खरेच, पण तेच आणि तेवढेच खरे हे मात्र चुकीचे. आयुष्याच्या वाटचालीत याखेरीजही अन्य अनेक परीक्षेचे टप्पे येतात, तेव्हा दहावीत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून चिडचिड करू नका; तर नाराज झालेल्या मुलांच्या पाठीशी आत्मविश्वासाचे बळ उभे करा. तेच गरजेचे आहे.
यंदाचा दहावीचा निकाल हाती आल्यानंतर आता मुलं व त्यांच्या पालकांची पुढील प्रवेशाची गडबड सुरू झाली आहे. अमरावती विभागात वाशिम जिल्हा निकालाच्या बाबतीत सर्वात पुढे राहिला आहे, तर बुलढाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अकोला जिल्ह्यात यंदा टक्का घसरला. गतवर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी आकडा खाली आला, तसेच गतवर्षी जिल्ह्यातील २५९ शाळांचा निकाल शंभर टक्के होता, यंदा ती संख्या १४० एवढीच राहिली. अर्थात, हे चालायचंच. सर्व दिवस सारखे नसतात, तसे सर्व निकाल अपेक्षेप्रमाणे असूच शकत नाहीत. टक्का कमी अधिक होत असतोच. यशस्वी विद्यार्थ्यांचं, गुणवंतांचं कौतुक सर्वत्र होतं व ते व्हायला हवंच; मुद्दा एवढाच की, ते होताना अपयश वाट्याला आलेल्या किंवा कमी टक्केवारीच्या मुलांकडे तिरपा कटाक्ष टाकला जाऊ नये.
शिक्षणातील परीक्षेची स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कितीही गुण मिळविले तरी ते कमीच वाटतात. अभ्यास करून करून डोक्याचा भुगा होतो असं मुलं सांगतात ते उगीच नव्हे, पण पालकांना मार्क्स हवे असतात. या शर्यतीत आपल्या मुलांची उपजत गुणवत्ता वा कुवत किती, हे अधिकतर पालकांकडून लक्षातच घेतलं जात नाही. परिणामी टक्का घसरला की पालकांची घरात चिडचिड सुरू होते व त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. असह्य होणाऱ्या दबावातून काही मुलं तर थेट आयुष्यच संपवायला निघतात. असे होऊ नये म्हणून तर शिक्षण मंडळाने गुणवत्ता याद्यांचा प्रघात बंद केला. तेव्हा आपणही मुलांना समजून घ्यायला हवं.
परीक्षेतील टक्का महत्त्वाचा आहेच, पण प्रयत्न करूनही तो गाठता येत नसेल तर उपजत आवडीच्या विषयात करिअरच्या वाटा शोधता यायला हव्यात. प्रत्येकच मुलगा हा डॉक्टर किंवा इंजिनीयर होऊ शकत नाही. तेव्हा पालकांनी आपली इच्छा त्यांच्यावर न लादता त्यांच्या प्रतिभेतून त्यांना फुलू द्यायला हवं. कला, क्रीडा, संस्कृती आदी क्षेत्रांतील कौशल्य विकासाची संधी अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पारंपरिक शिक्षणाच्या धबडग्यात मुलांचा जीव घुसमटत असेल तर त्यांना ज्या विषयात गती व रुची आहे, त्या क्षेत्राची निवड करता येईल. त्यासाठी हवं तर करिअर कौन्सिलिंगचं साहाय्य घेता येईल. थोडक्यात, अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत म्हणजे संपलं, आता आयुष्यात काही खरं नाही; असा निराशावादी सूर आळवण्याऐवजी मुलांना समजून घेत त्यांना आत्मविश्वासाने उभं करण्याचा हा काळ आहे.
मुलांचं सामान्य असणं गैर किंवा वावगं नाही, त्यांच्या सामान्यतेतील असामान्यतेला ओळखता येणं पालकांसाठी महत्त्वाचं आहे. त्याच बाबतीत खरी गडबड होताना दिसते. मुलाला जे वाटतं, अगर आवडतं त्याचा विचार न करता, आपल्या आवडी व अपेक्षा पालकांकडून त्याच्यावर थोपल्या जातात; परिणामी त्याचं गटांगळ्या खाणं स्वाभाविक ठरतं. 'थ्री ईडियट्स' सिनेमा आपल्याला भावतो खरा, पण आपण त्यातून बोध घेत नाही. तेव्हा मार्कांच्या मागे धावण्यापेक्षा मुलांमधील फुनसुख वांगडू शोधता आला पाहिजे.
सारांशात, दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशाची लगबग सुरू असताना केवळ पारंपरिक विद्याशाखांचा सोस न धरता, बदलत्या जगाची गरज लक्षात घेता ज्या नवीन शाखा उदयास आल्या आहेत त्याचाही विचार प्रामुख्याने व्हावा आणि परीक्षेच्या या पहिल्या पायरीवर धडपडलेल्यांना धीर देऊन पुन्हा आत्मविश्वासाने उभं करूया इतकंच यानिमित्ताने.