कामातिरेकापोटी जन्मलेले नवे ‘काम’सूत्र : क्वाएट क्वीटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 12:30 PM2022-09-08T12:30:12+5:302022-09-08T12:32:34+5:30
सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यात ६ दिवस काम काम, फक्त काम करण्याला नकार देणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांचा जीवतोड मेहनतीला नकार?
डॉ. भूषण केळकर, संचालक, न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन -
क्वाएट क्वीटिंग (Quit Quitting) अशी एक नवीन संज्ञा गेले दोन महिने समाजमाध्यमात बरीच गाजते आहे. या संज्ञेचा अर्थ असा की नोकरी तर सोडायची नाही पण पूर्ण झोकून देऊन कामही करायचे नाही! पूर्वी जसे लोक सर्वस्व ओतून काम करायचे (कामातिरेक!) तसे न करता, अगदी आवश्यक असेल तितकेच, अंग चोरून काम करायचे! ‘सर्वस्व झोकून’ आणि ‘अंग चोरून’ अशा दोन शब्दात या दोन संस्कृती सांगता येतील!
आता तुम्ही म्हणाल की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तर वरील लक्षणे स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे अमृतकालातही जिवंत आहेतच! तर मुद्दा हा की ही लक्षणे व हे नवीन ‘काम’सूत्र आता खासगी उद्योगात पण येते आहे आणि म्हणून ही चर्चा!! हे क्वाएट क्वीटिंग का होते आहे, त्याची काही कारणमिमांसा आपल्याला सहज सांगता येईल.
पहिले म्हणजे लोकांच्या - विशेषत: नवीन पिढीच्या असे लक्षात आले आहे, येते आहे की, अतिप्रचंड काम करून (म्हणजे मी ज्याला ‘कामातिरेक’ म्हणतोय) बर्न आऊट होतोय आणि वर्क लाइफ बॅलन्स अजिबातच साधता येत नाही. चीनमध्ये ‘९९६’ अशी एक संज्ञा प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यात ६ दिवस काम काम आणि फक्त काम!
दुसरे म्हणजे कामाचे प्रकार, संधी इतक्या वेगवेगळ्या उपलब्ध होत आहेत की, वैविध्य व नाविन्य यामुळे पण गीग इकॉनॉमीमध्ये ‘जीवतोड मेहनत का करा’ असाही विचार बळावतोय!
तिसरे म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’मध्ये एकजिनसी काम कमी होऊन मुख्यत्त्वे नाविन्यपूर्ण, प्रतिभाप्रवण कामांना असणारा वाव! चौथे कारण म्हणजे कोविड - १९! या जागतिक महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ची चटक लागल्याने, हवे तेव्हा काम करण्याची मुभा हवीहवीशी वाटू लागली; त्यामुळे एकूणच दिनक्रमातले स्वातंत्र्य, कुटुंबाबरोबर देता येणारा वेळ वाढला, त्यातील आनंद वाढला आणि आता ऑफिसला जाऊन काम करणे, प्रवास व त्यातील ट्रॅफिकमध्ये वाया जाणारा वेळ, ती धावपळ... हे सारे लोकांना नको वाटते आहे.
कोविड काळात आणखीही काही घडले. घरूनच काम असल्याने जास्त कामाची अपेक्षाही झाली. कंपन्या व मॅनेजर्स/वरिष्ठ अवाच्या सव्वा काम झालेच पाहिजे म्हणून हटून बसले! कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यापेक्षा आपल्या कंपनीला निव्वळ नफ्यामध्येच रस असतो, याचा अनेकांना विषाद वाटला.
क्वाएट क्वीटिंग हे कर्मचारी आळशी व वाईट असल्यामुळे आहे की, असंवेदनशील कंपन्या व वरिष्ठ अतिकडक असल्यामुळे आहे? याचा उहापोह ‘हावर्ड बिझनेस रिव्ह्यू’मध्ये केला गेला आहे. एक मात्र खरे, जनरेशन झेड आणि मिलेनियल्स या पिढ्यांना पैशाबरोबरच आपल्या एकूण जीवनमानाचा दर्जाही महत्त्वाचा वाटतो. त्यांच्यासाठी ‘पॅशन’ हे महत्त्वाचे मूल्य आहे. मग या क्वाएट क्वीटिंगचे काय परिणाम होतील, हे चांगलं की वाईट?
मी एक छान वाक्य वाचलं ‘क्वाएट क्वीटिंग इज नॉट क्वीटिंग ऑन जॉब बट क्वीटिंग ऑन लाईफ’.
मला वाटतं की, अल्प काळाच्या रोमांचकतेपोटी क्वाएट क्वीटिंग करत राहणे हे दीर्घकालीन तोट्यात पडेल! जागतिक मंदीची चाहूल लागते आहे, बेरोजगारी वाढते आहे आणि असे अनिश्चितेचे सावट असताना हे नवे आवर्त कसे परवडेल?
समजा थोडे दिवस तुमचे क्वाएट क्वीटिंग कंपनीने सहन केले अन् ‘भीक नको पण कुत्रा आवर’ म्हणून नारळ दिला, तर? आणि मग नवीन नोकरीसाठी चांगली शिफारस कशी मिळेल?
- हाती घेतलेले काम उत्तम आणि मनापासून करणे; निव्वळ हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणे हे केव्हाही अधिक श्रेयस्कर!