उशीचं कव्हर आणि ८० वर्षे प्रेमाची प्रतीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:33 IST2025-03-20T10:33:33+5:302025-03-20T10:33:59+5:30

पतीची आठवण म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी एका उशीचं कव्हर आपल्या उराशी बाळगलं होतं. हे त्याच उशीचं कव्हर होतं, जे त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या पतीनं आणलं होतं...

A pillow cover and 80 years of waiting for love | उशीचं कव्हर आणि ८० वर्षे प्रेमाची प्रतीक्षा !

उशीचं कव्हर आणि ८० वर्षे प्रेमाची प्रतीक्षा !

चीनची डू हुझैन ही महिला. १०३ वर्षांचं आयुष्य जगलेल्या या महिलेची कथा सध्या सगळ्यांना अस्वस्थ आणि भावुक करते आहे. नुकतंच त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची ही कहाणी व्हायरल होते आहे. तब्बल ८० वर्षांच्या एका प्रदीर्घ प्रतीक्षेच्या या कहाणीनं अनेकांचे डोळे पाणावले आहेत. नियतीनं आपल्यापासून दूर नेलेल्या पतीची गेल्या आठ दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी वाट पाहिली. पतीची आठवण म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी एका उशीचं कव्हर आपल्या उराशी बाळगलं होतं. हे त्याच उशीचं कव्हर होतं, जे त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या पतीनं आणलं होतं.

डू हुझैन आता या जगात नाहीत, पण त्यांची प्रेमकथा यापुढेही अनेक काळ लोकांच्या स्मरणात राहील. दक्षिण-पश्चिम चीनच्या गुइझू प्रांतात ८ मार्च रोजी त्यांचं निधन झालं. १९४० मध्ये हुझैन यांचं लग्न झालं. पती हुआंग जुन्फू यांच्यापेक्षा तीन वर्षांनी त्या मोठ्या होत्या. लग्नानंतर लगेचंच काही दिवसांत हुआंग कुओमिंतांग सैन्यात दाखल झाले आणि युद्धावर निघून गेले. युद्धावरून ते परत येतील म्हणून हुझैन यांनी पतीची बरीच वाट पाहिली, त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला, त्यासाठी सरकार दरबारीही त्यांनी प्रयत्न केले, शेवटी त्यांनी आपल्या पतीला शोधून काढलंच. त्यासाठी तीन वर्षं त्यांना संघर्ष करावा लागला. युद्धानिमित्त जुन्फू ज्या ठिकाणी होते त्याठिकाणी त्या पोहोचल्या. त्यांच्याबरोबर काही काळ त्यांनी तिथे घालविला, पण गर्भवती झाल्यानंतर त्या पुन्हा घरी परतल्या. 

१९४४ मध्ये त्यांना मुलगा झाला. हुआंग फचांग त्याचं नाव. त्यानंतर जुन्फूही घरी परत आले. पण, सैन्यातली नोकरी म्हटल्यावर त्यांना पुन्हा बोलावणं आलं. त्यांना जावंच लागलं. यानंतर मात्र ते पुन्हा कधीच घरी परत आले नाहीत. तिथून ते पत्नीला पत्र पाठवायचे, तिची ख्यालीखुशाली विचारायचे.. निदान पत्रानं का होईना, पण आपल्या पतीची भेट होते, याचाही हुझैन यांना आनंद होता. त्याही त्यांना पत्र पाठवायच्या. घरी परत या म्हणून विणवायच्या. पत्रापत्रीचा हा सिलसिला काही काळ चालू राहिला; मात्र १५ जानेवारी १९५२ रोजी तोही थांबला. त्या दिवशीचं त्यांचं शेवटचं पत्र. त्यानंतर जुन्फू यांचं ना एकही पत्र आलं, ना त्यांची कधी भेट झाली. आपला नवरा कधी ना कधी परत येईल म्हणून हुझैन रात्रंदिवस त्याच्या वाटेकडे डोळे लावून राहिल्या.

जुन्फू जी पत्रं हुझैन यांना पाठवायचे, त्यावरून त्यावेळी असा अंदाज लावला गेला की ते मलेशियामध्ये असावेत. आपण कुठे आहोत, याचा उल्लेख मात्र जुन्फू यांनी कधीच आपल्या पत्रात केला नाही. पतीची वाट पाहत हुझैन दिवसभर शेतात काम करत. संध्याकाळी सँडल आणि कपड्यांवर वीणकाम करून घर चालवत. त्यांच्या कुटुंबानंही जुन्फूला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पदरी लहान मूल, पुढे आयुष्य पडलेलं, त्यामुळे हुझैन यांनी दुसरं लग्न करावं म्हणूनही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विनंती करून पाहिली, पण हुझैन प्रत्येक वेळी म्हणायच्या, ‘जुन्फू पुन्हा परत आले तर?’ दरम्यानच्या काळात शिक्षक झालेल्या त्यांच्या मुलानंही २०२२ मध्ये जगाचा निरोप घेतला, पण हुझैन यांनी नवऱ्याची प्रतीक्षा सोडली नाही.. अंतिम क्षणीही त्यांच्या ओठी जुन्फू यांचंच नाव होतं आणि हातात उशीचं तेच कव्हर !

Web Title: A pillow cover and 80 years of waiting for love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.