‘दिनूच्या गावातून एक नदी वाहते, लोक तिथे गुरे चरायला नेतात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 07:29 AM2024-01-23T07:29:15+5:302024-01-23T07:29:31+5:30
शीर्षकात दिलेले वाक्य आठवीतले विद्यार्थी वाचू शकत नाहीत, हे मी प्रत्यक्ष पाहतो आहे. ‘असर’चा अहवाल खरा की खोटा, यावर वाद घालून काय होणार?
-हेरंब कुलकर्णी
‘असर अहवाला’तले यावर्षीचे चित्र जास्त धक्कादायक आहे. कारण नववी ते बारावीपर्यंतचे २५ टक्के विद्यार्थी दुसरीचे पुस्तक वाचू शकत नाही. यापेक्षा धक्कादायक हे की, हे विद्यार्थी किमान ८ वर्षे शिक्षण घेतलेले आहेत आणि अकरावी, बारावीचे विद्यार्थी तर बोर्डाची परीक्षा पास झालेले आहेत. पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नाही, हा पसरलेला गैरसमज आणि बोर्डाच्या परीक्षा अतिसोप्या करण्याच्या नादात पर्यवेक्षण नीट होत नसलेले शिक्षण अधिक केविलवाणे होते आहे.
महाराष्ट्रातील इतर भागात हे चित्र इतके वाईट नाही, हे मान्य करायला हवे; पण वाचन, लेखन, गणन न येणारी अगदी माध्यमिक स्तरावरही संख्या खूप मोठी आहे. पाचशे अकरा ही संख्या ५००११ असे लिहिणारे आठवी-नववीच्या वर्गातले विद्यार्थी मी बघितले आहेत. शिक्षकांवर असणाऱ्या इतर कामांच्या ओझ्याचे कारण यासाठी दिले जाते; पण आठ वर्षे शिक्षण घेऊन ‘दिनूच्या गावातून एक नदी वाहते, गावातील लोक तिथे गुरे चरायला नेतात’ इतके साधे वाक्य विद्यार्थी वाचू शकत नसतील तर त्याचा खुलासा कोण कसा करणार? - ती जबाबदारी शिक्षक आणि शाळेचीच आहे.
मी गेली अनेक वर्षे खूप शाळांमध्ये जाऊन अशा चाचण्या घेतल्या आहेत. मी स्वतः गेली १० वर्षे माझ्या शाळेत वाचन, लेखन न येणाऱ्या मुलांचे तास घेतो. त्यातून माझे असे निरीक्षण आहे की, प्राथमिक स्तरावर जोडाक्षरे व वजाबाकी आणि भागाकार याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. तेच विद्यार्थी माध्यमिक शाळेत येतात व तिथेही त्यासाठी प्रयत्न होत नाही. त्यातही पुन्हा जोडाक्षरे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘र’च्या खुणा असलेले शब्द लिहिण्याचा फारसा सराव नसतो. साधारण हुशार विद्यार्थीही ऑस्ट्रेलिया, कृष्ण, राष्ट्रपती, वऱ्हाड अशी जोडाक्षरे लिहू शकत नाहीत.
याचा अर्थ या शब्दांचा सराव फार होत नाही. तीच गोष्ट भागाकाराची आहे. बेरीज, वजाबाकी करणारे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येची वजाबाकी व भागाकार करू शकत नाहीत. याचे कारण? - शिकवणे हा एक भाग आहे व सराव हा दुसरा! कठीण प्रकारची जोडाक्षरे आणि गणिती क्रिया यांचा सराव आवश्यक असतो. तो शाळांमध्ये फार होत नाही व असे विद्यार्थी तसेच पुढे हायस्कूलला आल्यावर हायस्कूलचे शिक्षक ते आपले कामच नाही असे समजतात. सर्वांनाच पास करायचे म्हणून विद्यार्थी पुढे जात राहतात व असे अहवाल समोर येतात.
यावर उपाय म्हणून मी माझ्या शाळेत गेली दहा वर्षे दरवर्षी १ जुलैला पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची सोप्या दहा शब्दांची व बेरीज, वजाबाकीची लेखी चाचणी घेतो. त्यात अगदी सोपे शब्द, वेलांटी, उकार, मात्रा, सोपी जोडाक्षरे असतात. तेही लिहिता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज शाळा भरण्यापूर्वी एक तास स्वतंत्र वर्ग घेतला जातो. मी व माझ्या सहकाऱ्यांनी मिळून त्यासाठी सोपे शब्द, काना-वेलांटी-मात्रा-उकार यापासून ‘र’च्या खुणा असलेल्या २४०० शब्दांचा संग्रह तयार केला आहे. त्या आधारे या विद्यार्थ्यांना सराव दिला जातो.
दरवर्षी शाळा उघडल्यावर पहिले १५ दिवस सर्व शिक्षक फक्त मूलभूत गणिती क्रिया, वाचन, जोडाक्षरे, इंग्रजीचे शब्द असा सराव घेतात. जे विद्यार्थी चांगले वाचू शकतात त्यांच्या शेजारी अडखळत वाचन करणारे विद्यार्थी बसवले जातात. या सर्व प्रयत्नांतून माझ्या शाळेत वाचन, लेखन क्षमता विकसित होते आहे.त्यामुळे ‘असर’ अहवाल खरा की खोटा, यावर वाद न करता ही समस्या मान्य करून राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये व माध्यमिक शाळेत पर्यवेक्षीय यंत्रणेने छोटी वाचन, लेखन, गणन चाचणी घ्यावी व त्याआधारे शाळांनी कमजोर मुलांसाठी अधिकचे प्रयत्न करावेत. पुढील शिक्षकांनी मागील शिक्षकांना दोष देण्यापेक्षा किमान ‘आपल्या शाळेतील एकही विद्यार्थी वाचन, लेखन, गणन यात अप्रगत राहणार नाही’, असा प्रयत्न केला तर हे चित्र बदलू शकते. जे विद्यार्थी लेखन, वाचन करू शकत नाहीत, त्यांना शिक्षणात रुची राहत नाही. ते लवकर शाळा सोडतात. गळती वाढण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.