नायट्रोजन वापरून ‘सुरक्षित’, ‘झटपट’ मृत्युदंड?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 06:54 AM2024-02-10T06:54:00+5:302024-02-10T06:55:18+5:30

हवेऐवजी फक्त नायट्रोजन वायूचे श्वसन करायला लावून मृत्युदंड देण्याच्या अमेरिकेतल्या घटनेने वादळ उठले आहे. अलाबामा राज्याने नेमके काय केले?

A 'safe', 'quick' execution using nitrogen? nitrogen-gas-death-penalty- | नायट्रोजन वापरून ‘सुरक्षित’, ‘झटपट’ मृत्युदंड?

नायट्रोजन वापरून ‘सुरक्षित’, ‘झटपट’ मृत्युदंड?

डॉ. गौतम पंगू

२५ जानेवारी, संध्याकाळचे ७:५३. मृत्युदंड कक्ष आणि पाहण्याच्या खोलीमध्ये असलेला पडदा उघडण्यात आला. पांढऱ्या कपड्यात लपेटलेल्या केनेथ स्मिथला एका खाटेवर बांधून झोपवण्यात आलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर रेस्पिरेटर मास्क लावण्यात आला होता. मास्कला शेजारच्या खोलीतून आलेली एक नळी जोडली होती. स्मिथला त्याचं डेथ वॉरंट वाचून दाखवण्यात आलं. माईकमधून तो शेवटची वाक्यं बोलला. ७:५६ ला त्याची मृत्युदंडाची शिक्षा सुरू झाली. ७:५८ पासून पुढची किमान दोन मिनिटं तो प्रचंड थरथरत होता, अंगाला जोरजोरात वेडेवाकडे झटके देत होता. त्यामुळं त्याची खाट गदागदा हलत होती. मग त्यानं भराभर श्वास घ्यायला सुरुवात केली. त्याची छाती धपापू लागली. हळूहळू श्वासांचा वेग मंदावत गेला. ८:०८ पर्यंत त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही हे न कळण्याइतपत मंदावला. ८:१५ वाजता मधला पडदा पुन्हा बंद करण्यात आला. ८:२३ वाजता स्मिथ मरण पावल्याचं घोषित करण्यात आलं.

१९८८ मध्ये केलेल्या मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी स्मिथला अमेरिकेतल्या अलाबामा राज्यानं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. २५ जानेवारी २०२४ या दिवशी ही शिक्षा अमलात आणण्यात आली; पण त्यासाठी वापरलेल्या पद्धतीमुळं ही कार्यवाही वादग्रस्त ठरली आहे. या शिक्षेसाठी अमेरिकेत, किंबहुना जगात पहिल्यांदाच ‘नायट्रोजन हायपोक्सिया’ ही पद्धत वापरली गेली. म्हणजे कैद्याला हवेऐवजी फक्त नायट्रोजन वायूचं श्वसन करायला लावायचं. हवेतला ७८% नायट्रोजन जरी बिनधोक्याचा असला तरी १००% नायट्रोजनचं श्वसन धोकादायक असतं. त्यामुळं शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडून प्राण गमावले जाऊ शकतात. एक मृत्यूदंडाची पद्धत म्हणून ‘नायट्रोजन हायपोक्सिया’वरचं संशोधन फारच मर्यादित आहे. तरीही अलाबामानं हा पर्याय का निवडला? 

सर्वसाधारणत: अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेसाठी तीन वेगवेगळ्या रसायनांची इंजेक्शन्स क्रमानं दिली जातात; पण ही रसायनं बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांचा मृत्युदंडाच्या शिक्षेसाठी वापर करण्यावर निर्बंध आणल्यामुळं किंवा त्यांचं उत्पादनच बंद केल्यामुळं राज्यांना ही रसायनं मिळणं अवघड झालंय. शिवाय ही इंजेक्शन्स देताना ‘आयव्ही’ यंत्रणा नीट काम न करणं, इंजेक्शनसाठी योग्य शीरच न सापडणं, कैद्याच्या शरीरातून सुई निघून येणं किंवा बुजून जाणं असे अनेक गोंधळ झाल्यानं कार्यवाहीला उशीर आणि कैद्यांना त्रास झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्या. २०२२ मध्ये खुद्द स्मिथच्या शिक्षेची कार्यवाही जवळजवळ दोन तास त्याला सुया टोचूनही आयव्ही यंत्रणेनं नीट काम न केल्यानं रद्द झाली होती. म्हणूनच यावेळी अलाबामा राज्यानं ‘नायट्रोजन हायपोक्सिया’चा मार्ग निवडला. अलाबामाच्या अधिकाऱ्यांच्या मते मृत्युदंड द्यायची ही अतिशय सुरक्षित, झटपट आणि सहृदय पद्धत आहे. त्यांनी सांगितलं की, ही कार्यवाही अतिशय ‘टेक्स्टबुक’ पद्धतीनं पूर्ण झाली, इंजेक्शन देऊन मारण्याला ‘नायट्रोजन हायपोक्सिया’ एक उत्तम पर्याय आहे हे अलाबामानं आज सिद्ध केलंय. पण तिथं हजर असलेल्या मोजक्या लोकांचा वृत्तांत अगदीच वेगळा आहे. त्यांच्या मते स्मिथला झटपट आणि वेदनारहित मरण अजिबात आलं नाही. उलट कित्येक मिनिटं चालू असलेल्या या प्रक्रियेत त्याचा छळच झाला. शेवटपर्यंत स्मिथसोबत असलेले त्याचे आध्यात्मिक मार्गदर्शक रेव्हरंड हूड म्हणाले की, त्याला होणाऱ्या यातना मला बघवल्या नाहीत! ही कार्यवाही व्हायच्या आधी आणि नंतरही तज्ज्ञांनी ‘नायट्रोजन हायपोक्सिया’मधले धोके सांगितले होते. नायट्रोजन शुद्ध नसेल किंवा मास्क नीट बसला नसेल तर कैद्याला मरण न येता तो जीवनमृत्यूच्या मधल्या निष्क्रिय अवस्थेत जाऊ शकतो. म्हणूनच अशा पद्धतीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर कैद्यांवर करणं हे क्रौर्य आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ‘मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्याला मरताना त्रास झाला तर बिघडलं कुठं?’- असा प्रश्न मनात येऊ शकतो; पण हे लक्षात घेतलं पाहिजे की, रितसर खटला चालल्यानंतर आरोपीला शिक्षा झालेली असते ती मृत्यूची - छळ होऊन येणाऱ्या मृत्यूची नव्हे! त्यामुळं त्याला बिनत्रासाचं मरण देणं हा यंत्रणेच्या कर्तव्याचा भाग आहे.

मृत्युदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा पाश्चात्त्य देशांपैकी एकमेव देश आहे. स्मिथच्या शिक्षेबद्दल युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या कार्यालयानं तीव्र खेद व्यक्त केला आहे. खुद्द अमेरिकेत ५० पैकी २३ राज्यांत मृत्युदंडाची शिक्षा अवैध आहे. बायडेन प्रशासनानंही स्मिथची शिक्षा ज्याप्रकारे अमलात आणली गेली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मृत्युदंडाची शिक्षा ही माणसाच्या जगण्याच्या हक्काची पायमल्ली आहे, या शिक्षेमुळं समाजातली गुन्हेगारी कमी होत नाही; जे लोक गुन्ह्याचे बळी ठरलेले असतात त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाही खरं समाधान किंवा ‘क्लोजर’ लाभत नाही, त्यामुळं ही शिक्षा देणं बंद केलं पाहिजे, असं याचे विरोधक म्हणतात. ‘आज अलाबामामध्ये मानवतेचं एक पाऊल मागं पडतंय’ हे स्मिथचे शेवटचे शब्द होते. त्याला त्याच्या दुष्कृत्याची अंतिम सजा मिळाली... पण ती योग्य मार्गानं मिळाली का, हे मात्र सांगता येत नाही!

(लेखक औषधनिर्माण क्षेत्रातील अमेरिकास्थित शास्त्रज्ञ आहेत)

gautam.pangu@gmail.com

Web Title: A 'safe', 'quick' execution using nitrogen? nitrogen-gas-death-penalty-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.