घडी घालून खिशात ठेवता येणारा टीव्ही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:22 PM2022-11-26T12:22:44+5:302022-11-26T12:25:07+5:30

नॅनोटेक्नॉलॉजी वापरून साध्य करायच्या काही कल्पना इतक्या भन्नाट आहेत की भविष्यात असं काही होईल हे कुणाला खरंसुद्धा वाटणार नाही.

A TV that can be folded and kept in your pocket | घडी घालून खिशात ठेवता येणारा टीव्ही...!

घडी घालून खिशात ठेवता येणारा टीव्ही...!

Next

अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखक, सहलेखिका आसावरी निफाडकर -

भविष्यात नॅनोटेक्नॉलॉजीमुळे सगळीकडे भन्नाट बदल दिसून येतील, असं आज मानलं जातंय. नॅनो पदार्थाचे विलक्षण गुणधर्म कळायला लागल्यामुळे संशोधकांची कल्पनाशक्ती चौफेर उधळली आहे. नॅनो तंत्र वापरून काय काय करता येईल याची कल्पना करण्यात आज प्रत्येक जण गढला आहे. यातल्या काही कल्पना इतक्या भन्नाट आहेत की भविष्यात असं काही होईल हे आज कुणाला खरं वाटणार नाही. 

‘नॅनोटेक्नॉलॉजी’ म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थ किंवा यंत्रं बनवण्याचं तंत्रज्ञान! अतिसूक्ष्म म्हणजे किती सूक्ष्म? तर आपल्या रक्तातल्या पेशींपेक्षाही सूक्ष्म! असे लहान पदार्थ किंवा अशी यंत्रं बनवणं, या गोष्टी व्यवहारात कशा वापरता येतील याचा विचार करणं म्हणजे नॅनोटेक्नॉलॉजी आणि अशा अतिसूक्ष्म वस्तूंचा अभ्यास करणं, ते कोणते नियम पाळतात हे शोधणं म्हणजे ‘नॅनो सायन्स’! ‘नॅनो’ हा मुळातला ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ लहान किंवा सूक्ष्म असा होतो. एक नॅनोमीटर म्हणजे एक भागिले एक वर नऊ शून्य (१/१०००००००००) इतके मीटर्स किंवा एक मीटरचा एक अब्जावा भाग.  ज्यावेळी एखाद्या पदार्थांमध्ये १०० ते १०००० अणू राहतात त्यावेळी त्या पदार्थाला ‘नॅनो पदार्थ’ म्हणतात. अशा पदार्थांमध्ये लांबी, रुंदी आणि जाडी यापैकी एक तरी एक ते शंभर नॅनोमीटर इतक्या आकाराचं असावं लागतं. नॅनोपदार्थाचे गुणधर्म त्याच्या मापावर अवलंबून असतात. म्हणजे पदार्थ तोच; पण त्याचा अतिसूक्ष्म भाग घेतला तर त्याचे गुणधर्म वेगळे असतात. 

उदा. साखरेच्या कणाचा आकार १० नॅनोमीटर इतका लहान केला तर तिचा रंग निळा होईल आणि चवही खारट होईल वगैरे. याचाच उपयोग नॅनॉटेक्नोलॉजीमध्ये केला जातो. ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ हे तंत्रज्ञान भविष्यात काय काय कमाल करू शकेल याचा आपण विचारही करू शकत नाही. यातल्या काही फक्त शक्यताच आहेत; पण कित्येक वापरात उतरण्याचीही बरीच शक्यता आहे. हे तंत्रज्ञान वापरून ‘स्ट्रक्चरल कलर’ नावाचं वैशिष्ट्यपूर्ण रंग लावलेल्या कार्स बनवता येतील. वेगानुसार या कार्स आपले रंगही बदलतील. या कारमधल्या सीट्स त्यावर बसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या शरीरयष्टीप्रमाणे आपला आकार बदलतील. वळणावर वेगात जात असताना या गाडीच्या चाकाचा आकार बदलून आपली सुरक्षितताही वाढेल. या कारचं इंजिन एखाद्या सुईएवढं छोटं असेल आणि ते गरमही होणार नाही. या कार्स पेट्रोलवर किंवा डिझेलवर न चालता हायड्रोजन वायूवर चालतील. त्यामुळे त्या भसाभसा धूर सोडणार नाहीत वगैरे. ‘ग्राफीन’ नावाच्या पदार्थापासून बनवलेला टीव्ही चक्क घडी घालून कपाटात ठेवता येईल किंवा कुठेही खिशातून/पिशवीतून सहज इकडून तिकडे नेता येईल. टीव्ही बघायचा असेल त्यावेळी तो बाहेर काढायचा, पसरायचा आणि बघायचा !! 

नॅनो युगातले कपडे ‘स्मार्ट’ असतील. या कपड्यांवर कधी धूळ बसणारच नाही, तसंच त्यांच्यावर कधी सुरकुत्याही पडणार नाहीत.  नॅनो पदार्थ वापरून बनवलेली ही कापडं धाग्यांऐवजी अतिसूक्ष्म नळ्यांची बनलेली असतील. या नळ्यात हवा भरली की कापड जाड होईल आणि हवा काढून टाकली की तेच कापड पातळ होईल. म्हणजेच उन्हाळ्यात जो शर्ट पातळ आहे म्हणून घालायचा तोच नंतर थंडीत स्वेटर म्हणून वापरायचा. 

वैद्यकीय क्षेत्रात नॅनोटेक्नॉलॉजीमुळे प्रचंड बदल होणार आहेत. इंग्लंडमधल्या काही संशोधकांनी जखम आपलं स्वतःचं अँटिबायोटिक्स सोडू शकेल, असं बँडेज शोधून काढलं आहे. विशेष म्हणजे, जसजशी जखम भरेल तसतसा या बँडेजचा रंग बदलेल. त्यामुळे जखम किती भरली आहे हे कळेल. नॅनोटेक्नॉलॉजी वापरून एक अगदी अतिसूक्ष्म नॅनोरोबॉट्सही बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे रोबॉट्स एक अतिसूक्ष्म लेझर बसवून  आपल्या शरीरात सोडले जातील. हे रोबॉट् शरीरातला ट्युमर शोधून काढून लेझरच्या मदतीनं जाळून परत शरीरातून बाहेर येईल!! 

काही वर्षानंतर कॉम्प्युटर्स अत्यंत सूक्ष्म, विलक्षण जलद आणि अफाट हुशार झालेले असतील. भविष्यात ते कॉम्प्युटर्स अंगठीत, घड्याळ्यात, चष्म्यात कुठेही बसवता येतील. भविष्यात नॅनोटेक्नॉलॉजी वापरून ‘क्वांटम कॉम्प्युटर्स’ नावाचे नवे कॉम्प्युटर्स येतील. त्या कॉम्प्युटरमध्ये सगळी माहिती गुप्त ठेवायला ‘क्वांटम क्रिप्टोग्राफी’ नावाची पद्धत वापरली जाईल. 

यामुळे आपल्या बँकेतलं खातं सुरक्षित होईल. भविष्यात नॅनोअस्त्रं बनतील. ही अस्त्रं शत्रूवर सहज सोडता येतील; पण या तंत्रज्ञानाचा वापर युद्धभूमीवर न होता माणसाच्या विधायक उपयोगासाठी होईल, अशी आशा करूया. सामाजिक चळवळीनं, शांततापूर्वक, लोकशाहीच्या मार्गानं खऱ्या अर्थानं लोकाभिमुख समाजव्यवस्था प्रस्थापित झाली तर मात्र नॅनोटेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यात सुवर्णयुग आणेल यात शंका नाही!
godbole.nifadkar@gmail.com

Web Title: A TV that can be folded and kept in your pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.