अख्खा देश उंदीर मारण्याच्या लढाईवर; सामान्य जनता पाठिशी पण प्राणीप्रेमींचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 08:42 AM2023-07-11T08:42:37+5:302023-07-11T08:42:58+5:30
अलीकडेच काही शाळांमध्ये तर उंदीर मार स्पर्धाही घेण्यात आली. जे विद्यार्थी जास्तीत जास्त उंदरांची 'शिकार' करतील त्यांना 'पुरस्कार' आणि मोठी बक्षिसं देण्यात आली
एखाद्या देशाचा मुख्य कार्यक्रम काय असू शकतो?.. आपल्या देशाला जगात अग्रस्थानी पोहोचवणं, देशाची अर्थव्यवस्था बळकट करणं, बेकार हातांना काम आणि तरुणांना रोजगार देणं, संपूर्ण जगभरात आपल्या देशाची प्रतिमा उंचावणं, आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं बघू शकणार नाही, इतकी ताकद आपल्या देशाच्या बाहूंमध्ये निर्माण करणं.. अशी एक ना अनेक... प्रत्येक जण त्या दृष्टीने प्रयत्न करीत असतो. न्यूझीलंडसारख्या देशाचा अग्रक्रम मात्र काय आहे? सध्या या देशापुढचा प्राधान्याचा प्रश्न आहे, तो म्हणजे उंदीर मारणा का हा देश उंदरांच्या इतका मागे लागला आहे? कारण प्रश्नच तसा गंभीर आहे. या उंदरांमुळे देशाच्या प्रगतीलाच खोडा बसतो आहे. हे उंदीर अन्नधान्य खाताहेत. आजार पसरवताहेत. अनेक पक्षी, प्राणी यांचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवी तर धोक्यात आला आहेच, पण माणसांच्या भवितव्यावरही या उंदरांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. त्यामुळेच या उंदरांचा नायनाट करण्याचा विडा या देशानं आणि तेथील नागरिकांनी उचलला आहे. अर्थात उंदरांविरुद्धच्या लढाईचा विडा इथे पहिल्यांदाच उचलला गेला आहे, असं नाही. यापूर्वीही अनेकदा या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं आहे.
न्यूझीलंडचे तत्कालीन पंतप्रधान जॉन की यांनी २०१६ मध्येही उंदरांचा नायनाट करण्यासाठी मोठी मोहीम उघडली होती. केवळ उंदीरच नाही, तर उंदरांसकट जे जे उपद्रवी प्राणी आहेत, त्यांचा संपूर्ण दक्षिण पॅसिफिक प्रांतामधून सन २०५०पर्यंत कायमचा नाटनाट करण्याची 'प्रतिज्ञा' त्यांनी केली होती. न्यूझीलंडचे आताचे पंतप्रधान खिस हिपकिन्स यांनी हाच अजेंडा आता पुढे चालवायचे ठरवलं आहे. कारण उंदरांचा उपद्रव पराकोटीला पोहोचला आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये सध्या उंदीर मारण्याच्या मोहिमा मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आल्या आहेत. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवी या उंदरांपासून कसा वाचेल, याचेही प्रयत्न सुरू आहेत. उंदीर मारण्याच्या या मोहिमेला काही प्राणीप्रेमींनी विरोध केला असला, तरी सर्वसामान्य जनता मात्र याप्रश्नी सरकारच्या पाठीशी आहे. काहीही झालं तरी या उंदरांचा नायनाट केलाच पाहिजे, या निर्णयाप्रत सर्वसामान्य जनताही पोहोचली आहे. उंदीर मारण्यासाठी देशभरात अक्षरश: शेकडो 'सशस्त्र टीम गल्लीबोळात फिरताहेत. अनेक स्वयंसेवक स्वतःहून उंदरांचा शोध घेत आहेत आणि दिसेल त्या उंदराचा खात्मा करीत आहेत. उंदीर मारणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही प्रोत्साहनपर भत्ता आणि बक्षिसं दिली जात आहेत.
अलीकडेच काही शाळांमध्ये तर उंदीर मार स्पर्धाही घेण्यात आली. जे विद्यार्थी जास्तीत जास्त उंदरांची 'शिकार' करतील त्यांना 'पुरस्कार' आणि मोठी बक्षिसं देण्यात आली. आता शाळाशाळांमध्ये या स्पर्धा भरवल्या जाताहेत. विद्यार्थीही त्यात हिरीरीनं भाग घेताहेत. न्यूझीलंड हे एक द्वीपकल्प आहे. ते पाण्यानं घेरलेलं असल्यामुळे इथे उंदीर येण्याचा तसा प्रश्न नव्हता. पण पहिल्यांदा ते जहाजमार्गे न्यूझीलंडमध्ये आले. त्यानंतर व्यापारासाठी जी जी जहाजं युरोपातून न्यूझीलंडमध्ये आली, त्यातून हे उंदीरही इथे आले आणि पाहता पाहता त्यांनी इथे आपलं साम्राज्य उभं केलं. शेतं, जंगलं अन्नधान्य या साऱ्याच गोष्टी ते फस्त करत चालले आहेत. देशातील शेती आणि अन्नधान्य जर असंच नष्ट होत गेलं, तर माणसं आणि इतर प्राण्यांनी काय करायचं असा गंभीर प्रश्न त्यामुळे उभा राहिला आहे. सान्यांचीच त्यामुळे उपासमार होत आहे.
साऊथ अटलांटिकमधील साऊथ जॉर्जिया हे एक बेट. १७० किलोमीटर अंतरावर हे पसरलं आहे. या प्रदेशातील सर्व उंदरांचा नायनाट करण्यात आला आहे. उंदरांचा खात्मा करण्यात आलेलं हे सर्वांत मोठं बेट मानलं जातं. या बेटावर जर हे होऊ शकतं, तर आम्हीही ते करू शकू. असं न्यूझीलंडच्या नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना मनापासून वाटतं. काही अभ्यासक, विचारवंत आणि पर्यावरणप्रेमी यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. उंदरांचा नायनाट केला जाऊ शकतो, याबाबत त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानं न्यूझीलंडमधील राजकारणी आणि कार्यकर्त्यांनीही ही कल्पना उचलून धरली. त्यामुळे ते आता हात धुऊन उंदरांच्या मागे लागले आहेत!
भूक लागल्यावर माणसांनाही खातात उंदरं! कोणत्याही विपरीत परिस्थितीत तग धरून राहण्याची उंदरांची क्षमता अतिशय अफाट आहे. अगदी अण्वस्त्रांचा हल्ला पचवण्याचीही शक्ती त्यांच्यात आहे, असं म्हटलं जातं. भूक लागल्यावर ते काहीही खाऊ शकतात. पूर्वीच्या काळी जहाजातून प्रवास करताना ते महिनोन्महिने जहाजात अडकलेले असायचे. खायला काहीही नसायचं, अशावेळी झोपलेल्या माणसांना कुरतडायलाही त्यांनी कमी केलं नाही.