आदित्य ठाकरेंनी ऐतिहासिक निर्णय घ्यायलाच हवा, पण...
By संदीप प्रधान | Published: May 29, 2019 12:17 PM2019-05-29T12:17:51+5:302019-05-29T12:21:51+5:30
ठाकरे कुटुंबातील आदित्य हे विधानसभा निवडणूक लढवू पाहत आहेत हे वेगळेपण आहे. पण तेच खटकणारेही आहे.
>> संदीप प्रधान
शिवसेनेच्या गेल्या ५३ वर्षांच्या इतिहासात सर्वात धाडसी व प्रभावशाली निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत दिल्याबद्दल युवा नेते आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत संसदीय राजकारणात उडी घेण्याचा आदित्य यांचा निर्णय योग्य असला तरी त्याचे टायमिंग बिचकवून टाकणारे आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला प्रचंड यश लाभले असून संपूर्ण प्रचारात मोदी यांच्या प्रचाराचा भर हा घराणेशाहीच्या विरोधात होता. आम्ही 'कामदार' (लोकांची कामे करणारे) आहोत तर ते (राहुल गांधी) 'नामदार' (घराणेशाहीचे प्रतीक) आहेत, असे मोदी बोलत होते. काँग्रेसचे नेतृत्व केवळ नेहरु-गांधी घराण्यातच जन्माला येते हे सांगून मोदी यांनी 'घराणेशाही' विरोधात लोकांच्या मनात घृणा निर्माण केली आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या पुत्रांकरिता उमेदवारी द्या अन्यथा पक्ष सोडतो, अशा धमक्या दिल्याने मुलांना तिकीटे दिली व त्यामुळे पराभव झाला अशी नाराजी खुद्द राहुल गांधी यांनी आता व्यक्त केल्याची चर्चा दिल्लीत असून तेथेही मुद्दा घराणेशाहीचाच आहे. घराणेशाहीच्या या मुद्द्याने राजकारणात असे काही वडवानल पेटवून दिले की, शरद पवार यांचे नातू पार्थ हेही पराभूत झाले. आतापर्यंत पवार हे लोकांमधून निवडून न येणाऱ्यांची कुत्सिक शब्दात रेवडी उडवत होते. ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीपासून चार हात दूर राहत असल्याने तेही पवार यांच्या बोचकाऱ्यातून सुटले नव्हते. त्याच पवार यांच्या घरात मोदींच्या घराणेशाही विरोधामुळे पराभव झाला असताना ठाकरे कुटुंबातील आदित्य हे विधानसभा निवडणूक लढवू पाहत आहेत हे वेगळेपण आहे. पण तेच खटकणारेही आहे.
आदित्य यांचे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्रानुसार नेतृत्व केले. खुद्द आदित्य हे आपल्याला १०० टक्के राजकारण व १०० टक्के समाजकारण करायचे आहे, असे सांगतात. आदित्य यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून ते कवी मनाचे आहेत. विद्यापीठाच्या स्तरावरील राजकारण यशस्वी केले आहे. लवकरच होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात उपमुख्यमंत्रीपद देऊन आदित्य यांचा राजकारणातील प्रवेश केला जाईल, अशा चर्चा आहेत. उपमुख्यमंत्रीपदाला संविधानिक दर्जा नाही. ती एक राजकीय सोय आहे. त्यामुळे ते पद आदित्य यांनी घेण्यात काहीच गैर नाही. मंत्रीपदावर बसल्यावर सरकार नामक महाकाय अजगर भल्याभल्यांना कसा गिळतो आणि नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नोकरशाहीच्या आडमुठेपणाबद्दल जाहीर नाराजी का व्यक्त करावी लागते, याची जाणीव आदित्य यांना होईल. मंत्रिमंडळात प्रस्ताव आणण्याकरिता मंत्र्यांना करावा लागणारा पाठपुरावा, वेगवेगळ्या खात्यांच्या सचिवांचे जणू आपल्याच खिशातून पैसे जाणार आहेत अशा अविर्भावातून होणारे प्रस्तावांना विरोध, मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांचे शासन आदेश काढताना केली जाणारी ढिलाई, एखादा शब्द किंवा उल्लेख बदलून सरकारच्या निर्णयाला मारली जाणारी मेख, वित्त खात्याची कवडीचुंबक प्रवृत्ती व तेथे जाऊन तुंबणारे असंख्य प्रस्ताव, सरकारी बदल्या-बढत्या यामधील रस्सीखेच, कंत्राटदार-बिल्डर यांनी पोखरलेली व्यवस्था अशा असंख्य अनुभवांतून आदित्य यांना जावे लागेल. सध्या शिवसेनेचे मंत्री उद्धव ठाकरे यांना येऊन जे सांगतात त्यावरुन आदित्य यांचे सरकारच्या कारभाराबद्दल व त्यामधील अडीअडचणींबद्दल आकलन होत असेल. आता ते प्रत्यक्ष साक्षीदार होत आहेत हे उत्तम आहे. पाण्यात पडल्याखेरीज पोहता येत नाही, अशी एक म्हण आहे. त्यामुळे आदित्य यांनी आता काठावरुन थेट पाण्यात उडी मारावीच. आदित्य खरोखरच उपमुख्यमंत्री झाले व तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक लढून विजयी झाले तर शिवसेनेतील नेतृत्वाचा मोठा पेच संपुष्टात येणार आहे. शिवसेनेत गेल्या काही वर्षांत ज्येष्ठ नेते हे विधान परिषदेवर नियुक्त झाले होते व त्यांच्या तुलनेत कनिष्ठ असलेले विधानसभेत निवडून आले होते. विधानसभेत दोन किंवा तीन टर्म जिंकलेल्यांना आपण लोकांमधून विजयी होतो, याचा अहंभाग होता तर विधान परिषदेत असलेल्या नेत्यांना आपण शिवसेनेकरिता आयुष्य दिल्याचा अभिमान होता. आदित्य यांनी नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यावर, उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून देसाई-शिंदे समर्थकांमध्ये नाराजीनाट्य होणार नाही आणि उद्धव यांना मोठा दिलासाच मिळेल.
आदित्य यांना जे शहाणपण सुचले ते खरेतर शिवसेनेतील मागच्या पिढीला सुचायला हवे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी मुंबईत 'मला आपल्याशी काही बोलायचे आहे', अशी घोषणा करणारी पोस्टर्स लावून आयोजित केलेल्या सभेत आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र २०१४ ची निवडणूक न लढवताच माघार घेतली होती. आदित्य यांनी आपल्या काकासारखी कच खाऊ नये. किंबहुना राज ठाकरे शिवसेनेत असतानाच त्यांनी निवडणूक लढवली असती तरी आज वेगळे चित्र दिसले असते. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा व अमित शहा यांची पक्षावरील घट्ट पकड ही रचना भाजपला भरभक्कम यश देऊ शकते तर राज ठाकरे यांचा करिष्मा आणि उद्धव ठाकरे यांची पक्षबांधणी ही रचना शिवसेनेलाही यश देऊ शकली असती. राज यांनी स्वत: निवडणूक लढवून शिवसेनेचे उमेदवार विजयी केले असते तर उद्धव यांनी विधान परिषदेवर जाऊन पक्ष संघटना बांधली असती. मात्र ठाकरेंना सत्तेचा मोह नाही अशा भ्रामक व स्वप्नाळू कल्पना कुरवाळत बसण्यामुळे दोन्ही भावांचे नुकसान झाले. अर्थात त्याला आता उशीर झाला आहे. मात्र आपल्या वडील व काकांच्या चुकांतून आदित्य यांनी धडा घेऊन लढायचे ठरवले आहे हे योग्य आहे. आदित्य यांचे धाकटे बंधू तेजस यांना राजकारणाची किती आवड आहे हे माहीत नाही. परंतु आदित्य हे उद्धव यांच्यासारखे नेमस्त आहेत तर तेजस हे राज यांच्यासारखे आक्रमक असल्याचे त्यांना लहानपणापासून ओळखणारे सांगतात. त्यामुळे आदित्य व तेजस यांच्यात संसदीय राजकारण कुणी करायचे व संघटना कुणी सांभाळायची, याची वाटणी करून पूर्वसुरींच्या चुकांपासून धडा घेण्याची संधी आहे.
सध्या शिवसेनेची भाजपसोबत युती आहे. उद्धव यांनी मागील साडेचार वर्षे सत्तेत राहून भाजपवर प्रहार केले. भाजपचे चाणक्य हे धूर्त आहेत. आदित्य यांना संसदीय राजकारणाची लालसा आहे हे भाजपच्या नेत्यांनी हेरून त्यांना या निर्णयाकरिता उद्युक्त केले असू शकते. आदित्य सत्तेत सहभागी झाल्यावर भाजप आदित्य यांना सत्तेची चटक लावून आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करील. सत्तेत बसलेल्या व्यक्तीला निर्णय घ्यावे लागतात. त्यातून काही चुका होतात. विरोधक चौकशीची मागणी करतात. प्रकरणे न्यायालयात जातात किंवा मुद्दाम पाठवली जातात. अशावेळी भाजपची चाणाक्ष मंडळी भविष्यात आदित्य यांनाही एखाद्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्नच करणार नाहीत, याची कुणी खात्री देऊ शकत नाही. मात्र त्यामुळे आताच घाबरुन जायचे कारण नाही. भाजपच्या कच्छपि किती लागायचे व आपले स्वतंत्र अस्तित्व किती ठेवायचे, याचे भान आदित्य यांनी राखले तर 'ठाकरे' हेही राजकारणात यशस्वी होण्यात काहीच अडचण येणार नाही.