आमिरचे मनसंधारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:02 AM2018-04-28T00:02:04+5:302018-04-28T00:02:04+5:30

सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात.

Aamir's mindset! | आमिरचे मनसंधारण!

आमिरचे मनसंधारण!

Next


चित्रपटाची रूपेरी दुनिया म्हणजे एक झगमगता आभास असतो. जिथे पैसा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे फारसे कुणाला कशाचे सोयरसूतक राहत नाही. सामाजिक बांधिलकी वैगेरे शब्द कधी ओठी आलेच तर ते केवळ अभिनयापोटी येतात. पण, या कमालीच्या व्यवहारी विश्वातही काही सन्मानजनक अपवाद असे आहेत ज्यांनी प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर असूनही मातीशी जुळलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. आमिर खान हा याच क्रमातला एक संवेदनशील मनाचा कलावंत. विलासी आयुष्याची सर्व साधने सभोवताली असतानाही हा माणूस विदर्भातील होरपळून टाकणाऱ्या उन्हात हातात घमेले-फावडे घेऊन लोकांना जलसंवर्धनाचे महत्त्व सांगत सुटलाय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘वॉटर कप’ नावाचे वेड त्याने अवघ्या महाराष्ट्राला लावले आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्याही वेडाला मागे टाकेल इतक्या उत्साहाने लोक या ‘वॉटर कप’च्या प्राप्तीसाठी झपाटल्यागत कामाला लागले आहेत.ोपरिणामी तुफान गाजावाजा केलेल्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवारालाही जे साधले नाही ते काम या ‘वॉटर कप’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये होत आहे. यात विदर्भातील मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोट, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, कारंजा, मंगरुळ पीर, धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव, राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा, आर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू व नागपूर जिल्ह्यातील नरखेडचा समावेश आहे. पाण्याच्या बचतीचा हा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. यात सहभागासाठी आतापर्यंत सव्वालाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. या सर्व बाबी नजरेखालून घातल्या तर आमिर हे जे काही करतोय ते किती भव्य आहे, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. परंतु काही लोक या विधायक कामाला आमिरच्या व्यावसायिक आयुष्याशी जोडू पाहत आहेत. ‘ठग’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आमिर असले उद्योग करतोय, असा काहींचा आरोप आहे. परंतु आमिरने जलसंवर्धनातून मनसंवर्धनाचे जे स्वप्न पाहिले आहे ते पैशांच्या अवकाशालाही पुरून उरणारे आहे. त्यातही आमिर तीन वर्षांपासून या ‘वॉटर कप’चे सलग आयोजन करतोय आणि भविष्यात उभा महाराष्ट्र ‘पाणीदार’ होईपर्यंत तो हा घेतला वसा सोडणार नाहीये. चित्रपट हिट होवो वा फ्लॉप. आमिरने कधीच आपल्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्याची सरमिसळ होऊ दिली नाही. पाण्यासाठी तो आज जे काही करतोय ते त्याने केले नाही तर कुणी त्याला जाब विचारणार नाही वा त्याच्या चित्रपटांवर कुणी बहिष्कारही टाकणार नाही. तरीही आमिर हे करतोय कारण त्याला पाण्यासोबत माणसांची मनेही जोडायची आहेत.

Web Title: Aamir's mindset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.