जनाची नाही तर मनाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 07:28 AM2024-05-18T07:28:07+5:302024-05-18T07:28:37+5:30

या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. 

aap swati maliwal case and politics | जनाची नाही तर मनाची?

जनाची नाही तर मनाची?

देशाच्या कानाकोपऱ्यातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज कानावर पडतच असतात; पण जेव्हा देशाच्या राजधानीत, राज्यसभेची सदस्य असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षाला चक्क मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण होते, तेव्हा त्या प्रकरणाचे गांभीर्य किती तरी पटीने वाढते. दुर्दैवाने प्रत्येकच गोष्टीकडे राजकारणाच्या चष्म्यातून बघण्याची राजकारण्यांना एवढी सवय झाली आहे, की या गंभीर प्रकरणाचे गांभीर्यच हरवून गेल्यासारखे दिसत आहे. या घटनेची चर्चा केवळ समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. 

तुरळक बातम्या उमटल्या, तोवर त्याकडे गांभीर्याने न बघणे एकदाचे समजण्यासारखे होते; पण स्वाती मालीवाल यांनी घडलेल्या घटनेची पोलिसांकडे रीतसर तक्रार केल्यानंतरही, त्यातील गांभीर्य लक्षात न घेता, त्याकडे केवळ राजकीय उट्टे फेडण्याच्या नजरेनेच बघितले जात असेल, तर राजकारण्यांचे आणखी किती नैतिक अध:पतन व्हायचे बाकी आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. स्वाती मालीवाल १३ मे रोजी सकाळी ९:०० वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तिथे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विभव कुमार यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, शिवीगाळ केली आणि तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर चक्क मारहाणही केली, असा मालीवाल यांचा आरोप आहे. 

राजधानीतील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे, की मद्य घोटाळा प्रकरणात अंतरिम जामिनावर सुटका झाल्यामुळे आनंदलेल्या केजरीवाल यांना, सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना राज्यसभेत धाडायचे आहे आणि त्यासाठी मालीवाल यांना राज्यसभेचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. आम आदमी पक्षाचा पंजाबमधील एक राज्यसभा सदस्य राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारीत असून, त्याची जागा रिक्त झाल्यावर मालीवाल यांना पुन्हा राज्यसभेत पाठविले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. 

गेल्या जानेवारीतच राज्यसभा सदस्य बनलेल्या मालीवाल त्यासाठी तयार नाहीत आणि त्यासंदर्भात केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी म्हणूनच त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, असेही सांगण्यात येत आहे. खरेखोटे केजरीवाल, मालीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या अंतस्थ गोटातील लोकांनाच माहीत. पण, मालीवाल यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेली विभव कुमार यांच्या तोंडची वाक्ये विचारात घेतल्यास, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील चर्चेत काही ना काही तथ्य असावे, असे वाटू लागते. ते खरे निघाल्यास, शुद्ध नैतिक आचरणाच्या गप्पा मारणाऱ्या आपमधील मंडळींचे पायही मातीचेच असल्याकडे आणखी एक अंगुलीनिर्देश होईल. 

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा हे भाजपने रचलेले कुभांड असल्याचा आरोप करणारे केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आता स्वपक्षाच्याच ज्येष्ठ नेत्याने केलेल्या आरोपावर काय स्पष्टीकरण देणार आहेत? असा प्रकार आपचे सख्य नसलेल्या एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडला असता, तर एव्हाना आपने आभाळ डोक्यावर घेतले असते. आता मात्र केजरीवाल यांच्यासह आपचा प्रत्येक नेता तोंडात मिठाची गुळणी धरून बसला आहे. एवढेच नव्हे, तर आप घटक पक्ष असलेल्या ‘इंडिया’ आघाडीत सहभागी एकाही पक्षाचा एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही. अपवाद केवळ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा! समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बोलले, ते जणू काही त्यांची असंवेदनशीलता दाखवून देण्यासाठीच! 

भारतीय राजकारण्यांच्या संवेदनशीलतेचे गणित काही वेगळेच आहे. एखाद्या प्रकरणात विरोधी पक्ष अडचणीत येत असल्यास ते अतिसंवेदनशील होतात; अन्यथा असंवेदनशील वक्तव्ये करण्याचा त्यांना जणू काही परवानाच मिळालेला असतो! महिला कुस्तीगिरांच्या आंदोलनामुळे भाजप अडचणीत येत असल्याने विरोधी पक्ष महिला सुरक्षेचा झेंडा तातडीने आपल्या खांद्यावर घेतात. पण, मालीवाल प्रकरणात सहकारी पक्ष अडचणीत दिसतो, तेव्हा मात्र सोयीस्कर चुप्पी साधतात. 

दुसऱ्या बाजूला महिला कुस्तीपटू, मणिपूरमधील महिला अत्याचार, प्रज्वल रेवण्णा लैंगिक शोषणप्रकरणी तोंडातून अवाक्षर न काढणारी भाजपची मंडळी, मालीवाल प्रकरणात राजकीय लाभ दिसू लागताच, चुरूचुरू बोलू लागते! राजकारण्यांना त्यांच्या सोयीच्या मुद्द्यांचा सातत्याने शोध घ्यावाच लागतो. पण, ते करताना किमान मानवी संवेदनांचे, नैतिक मूल्यांचे भान राखणे अपेक्षित असते. जनाची नाही, तर किमान मनाची तरी लाज बाळगून राजकारण्यांनी काही मुद्दे, काही विषय तरी राजकारणाच्या परिघाबाहेर ठेवलेच पाहिजे.


 

Web Title: aap swati maliwal case and politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.