कमळाबाई घाले डोळा, सत्तारांना लागला लळा
By सुधीर महाजन | Published: August 31, 2019 08:00 AM2019-08-31T08:00:00+5:302019-08-31T08:00:07+5:30
आतापर्यंत चोरून मारून ते चकरा मारत होते. आता तर भरदिवसा कमळीचे नाव घेत पंजाने घराच्या दरवाजावर थाप मारतात.
- सुधीर महाजन
‘कमळाबाई, कमळाबाई दार उघड’ असे आर्जव करीत अब्दुल सत्तार भाजपच्या दरवाजावर गेल्या काही महिन्यांपासून पंजाची थाप देत आहेत. कमळाबाई कधी रथाचा दरवाजा उघडतात, कधी विमानाचा दरवाजा किलकिला करतात; पण रथात किंवा विमानात त्या सत्तारांना बसू देत नाहीत. उभ्या उभ्या कानगोष्टी करतात. चोरटं प्रेम करणाऱ्या नवत्या प्रेमिकांसारखे या जरठ आशिकांचे वागणे आहे. कमळाबाईला खाकी पॅन्ट आणि काळी टोपी घालणाऱ्या चुलत सासऱ्याची भीती वाटते. नाही तर तिने कधीच दादल्याला खिशात टाकले आहे. घरातल्या पोराटोरांना कमळाबाईचं हे नवं प्रकरण पसंत नाही. कारण सत्तार घरात आले, तर या पोरांच्या नशिबी देशोधडीला लागण्यावाचून पर्याय नाही. आजवर सांभाळलेल्या काबाडकष्टांनी उभ्या केलेल्या इस्टेटीतून ते बेदखल होणार. आता कुठे सुखाचे दिवस आले होते. सत्तेच्या खुराकानं चांगलं-चुंगलं खायला मिळत होतं. आतापर्यंत शिळे कुटके मोडून उन्हातान्हात राबल्यामुळे हे सुखाचे दिवस आले. सुख अंगी लागायला लागले तशी कमळाबाईची मती फिरली. सत्तारांशी नेत्रपल्लवी सुरू केली. चोरून भेटीगाठी होऊ लागल्या, तसा बोभाटा झाला. यानंतर तरी लोकलज्जेची बूज राखून कमळीची वागणूक बदलेल, असे वाटले. कमळी ही मन मारून सत्तारांकडे दुर्लक्ष करू लागली तरी सत्तारांनी मात्र कमळीची गल्ली आणि दरवाजा सोडला नाही. आतापर्यंत चोरून मारून ते चकरा मारत होते. आता तर भरदिवसा कमळीचे नाव घेत पंजाने घराच्या दरवाजावर थाप मारतात.
कमळीच्या पोरांचा संताप होतो; पण दादला डोळे मिटून तिच्या या नखऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. सासऱ्याचीच कमळीला फूस दिसते. कारण घरातल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला या काळ्या टोपीतल्या चुलत सासऱ्याला वेळ नाही. त्याचा बागेतच रेशमाच्या लडी गुंडाळण्यात तो व्यस्त असतो. तो तरी कुठे-कुठे लक्ष देणार. गरती बाईच असं वागत असेल, तर एक-दोनदा समजावता येईल. नवती पोरगी असती तर घरात डांबून ठेवली असती. पोरांनी आदळआपट केली; पण ती कमळाबाईच्या माघारी. त्यामुळं घरातलं वातावरण बिघडलं आहे. सत्तार एकटेच येणार असते, तर फारसं बिघडत नाही; पण ते पोरंसोरं, चुलते-पुतणे, सोयऱ्याधायऱ्यांसह येणार म्हणजे आपला सगळा लवाजमाच आणणार म्हटल्यानंतर घरात जागेचा प्रश्नच आहे. आता कुठं ‘आवास योजनेतून’ घरावर छप्पर आलं होतं. सत्तेच्या एअर कंडिशनची थंड झुळूक अंगावर घेत होतो, तोच हे उद्भवलं. कमळाबाईची पोरं संस्कृतीरक्षक. त्यांना या सगळ्या पाहुण्यांचं ‘अतिथी देवो भव’ या न्यायानुसार स्वागत करावं लागेल. आपला बसायचा पाट त्यांना द्यावा लागेल. भलेही वाडवडिलांनी सांगितलं आहे की, समोरच्याला आपल्यासमोरचं ताट द्यावं; पण आपला पाट देऊ नये. कारण येणारा ताटात जेऊन परत जातो; पण पाटावर बसला की, हलत नाही. नंतर यजमानावरच घर सोडायची वेळ येते; पण कमळाबाईची लेकरं पडली संस्कृती अभिमानी. त्यांच्यावर संस्कारही तसेच झालेले. त्यामुळं सत्तार व त्यांच्या लवाजम्याला ते मर्जीच्या विरोधात का होईना; पण नाराजीनं पाट देतील. कारण कमळाबाईसमोर बोलण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही.
इकडे सत्तारांचीही बेचैनी वाढली. खरं तर त्यांनी सगळ्यात अगोदर अगदी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी कमळाबाईला ‘डोळा घातला’ होता. तिनेही मुरका मारत डोळा स्वीकारला. त्यानंतर अनेकांना तिने घरात जागा दिली; पण सत्तारांना अजून झुलवत ठेवले आहे. त्यामुळे त्यांची घालमेल वाढली, तर कमळाबाईचा फेरा निघाला. ती येणार या आनंदाने त्यांनी तिच्या स्वागताची जोरदार तयारी केली. तिच्या पोरांनी भांडण काढले तरी पहिल्यांदा पडती बाजू घेत चार पावलं दूर गेले. तिनेही त्यांचे स्वागत व नजराणा स्वीकारला. रथावर बोलावून घेतले. त्याक्षणी वाटले की, आता कमळीने घरात घेतले; पण तिने नजराणा-स्वीकारून दोन मादक कटाक्ष टाकताच सत्तार घायाळ झाले आणि त्या धुंदीत असतानाच त्यांना सोडून रथात बसून कमळाबाई निघून गेली. निघताना ‘सुरेश, इद्रीस, ज्ञानेश्वर, सुनील या पोरांच्या पाठीमागे तुम्ही आहात का’ असा सवाल प्रजेला केला. त्यामुळे सत्तार अधिकच बुचकाळ्यात पडले. कमळाबाई नेमकी कोणाला झुलवतेय याचाच उलगडा होत नाही. सत्तारांना, घरातल्या पोरांना की प्रजेला?
कमळाबाई घाले डोळा । सत्तारांना लागला लळा ।
पोरंसोरं झाली गोळा। दादला वाजवे खुळखुळा।।