द्रुतगती मार्ग: मृत्युचा सापळा

By admin | Published: June 3, 2016 02:17 AM2016-06-03T02:17:42+5:302016-06-03T02:17:42+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रसिद्ध उद्योगपती डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात सुदैवाने ते बचावले असले, तरी त्यांचा चालक जागीच ठार झाला.

Accelerated route: Death trap | द्रुतगती मार्ग: मृत्युचा सापळा

द्रुतगती मार्ग: मृत्युचा सापळा

Next

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रसिद्ध उद्योगपती डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात सुदैवाने ते बचावले असले, तरी त्यांचा चालक जागीच ठार झाला. या महामार्गामुळे प्रवाशांची सोय नक्कीच झाली; पण त्यावरून जाताना वेगाशी जीवघेणी स्पर्धा करणाऱ्या वाहनांमुळे अपघात तर होत आहेतच; पण रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांनी अपघात प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे न राबविल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
उतारावर सतत अवजड वाहने उलटणे, समोरच्या वाहनांना धडकणे, दुभाजक तोडून विरुद्ध लेनवर जाणे, असे अपघात होतात. तीन वर्षांपूर्वी ओझर्डे गावाजवळ रस्ता दुभाजक ओलांडून आलेल्या एका गाडीच्या धडकेमुळे प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे या उगवत्या अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. भक्ती बर्वेंसारख्या दिग्गज अभिनेत्रीचाही याच महामार्गावर काही वर्षांपर्वी दुर्दैवी अंत झाला. सेलिब्रिटींसह शेकडो सामान्य नागरिकांना या महामार्गावर प्राणास मुकावे लागले.
आनंद अभ्यकर यांच्या अपघातानंतर या मार्गावर दोन्ही कॉरिडॉरच्या मध्ये सुरक्षेसाठी ‘बायफ्रेन रोप’ लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे रोप सर्वत्र लावलेले नाहीत. दगडी चिरे असलेल्या भागात विशेषत: खंडाळा घाट व परिसरात हे रोप लावलेले नाहीत. सातत्याने पाठपुरावा करूनही या भागात दुभाजकांची उंची अद्याप वाढविलेली नाही. येथे उतार असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यास बायफ्रेन रोपअभावी अवजड वाहने थेट समोरच्या वाहनांना धडकतात किंवा दुभाजकावरून विरुद्ध लेनवर जाऊन अपघात होतात. ‘खंडाळा एक्झिट’च्या ठिकाणी महिन्यात सरासरी किमान दोन अपघात घडतात. प्रशासकीय पातळीवर काहीच उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. या महामार्गावर अवजड वाहने सर्व लेनमधून धोकादायक पद्धतीने जातात. त्यामुळे अन्य वाहनांना जागा राहात नाही. यामुळे या वाहनांसाठी कडक निर्बंध घालून त्यांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. लेनशिस्तीचे पालन न करण्याची वृत्ती दिसून येते़ महामार्गावर कोठेही थांबू नये, अशा सूचना जागोजागी लिहिलेल्या आहेत; पण अनेकदा काही वाहने थांबतात़ ट्रक, बस यासारखी जड वाहने उजव्या लेनमधून जातात़ प्रत्यक्षात उजवी लेन केवळ ओव्हरटेकिंगसाठी मोकळी ठेवायची असते़ त्यामुळे असंख्य मोटारी अशा वाहनांना डाव्या बाजूने सर्रास ओव्हरटेक करतात़ या महामार्गावर डाव्या बाजूने ओव्हरटेकिंग करणे हा नियम झाल्यासारखे दिसते़ त्यांना अटकाव करेल, अशी यंत्रणा नसल्याने आज या महामार्गावर सर्वत्र गोंधळाचे चित्र आहे़
रस्ते विकास महामंडळाने या महामार्गावरील अपघातामागील कारणांचा शोध घेतला़ या महामार्गावर आजवर ११ हजारांहून अधिक छोटेमोठे अपघात झाले असून, त्यांतील ८० टक्क्यांहून अधिक अपघातांमागे मानवी चुका, हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले़ महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंपनीवर आहे़; पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.
केंद्र शासनाच्या नियमानुसार महत्त्वाच्या महामार्गाचे दर तीन वर्षांनी रोड सेफ्टी आॅडिट स्वतंत्र संस्थेकडून करून घेणे बंधनकारक आहे़ वाढते अपघात पाहता, या महामार्गाचे रोड सेफ्टी आॅडिट करून घेणे व अहवालानुसार त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे़ नोएडा ते आग्रा यादरम्यानच्या यमुना एक्स्प्रेस या द्रु्रतगती महामार्गापासून आपण अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत़ पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा पहिलाच प्रयत्न होता़ त्यामुळे त्यानंतर अनेक बाबी पुढे आल्याने यमुना एक्स्प्रेस वेचे नियोजन पहिल्यापासून चांगले झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही या उपाययोजनांचा अवलंब करणे, ही आता काळाची गरज बनली आहे. - विजय बाविस्कर

Web Title: Accelerated route: Death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.