‘निकाल स्वीकारा... पुढचा विचार करा’
By admin | Published: May 29, 2016 03:29 AM2016-05-29T03:29:55+5:302016-05-29T03:29:55+5:30
विद्यार्थ्यांनीही निकालाचा जास्त ताण घेऊ नये. जो निकाल लागेल त्याचा स्वीकार करावा. दहावीचा निकाल हा शेवटचा निकाल नसतो. यामध्ये अपयश आले तरीही खचून जाऊ नये.
- पूजा दामले
विद्यार्थ्यांनीही निकालाचा जास्त ताण घेऊ नये. जो निकाल लागेल त्याचा स्वीकार करावा. दहावीचा निकाल हा शेवटचा निकाल नसतो. यामध्ये अपयश आले तरीही खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे. या काळात ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ताण कमी करण्यासाठी आवडत्या गोष्टी कराव्यात. या कालावधीत नातेसंबंधांवर परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
शाळेतील मुले परीक्षा देतात, परीक्षांचा निकाल येतो त्यानंतर ते पुढच्या इयत्तेत जातात. पहिली ते नववी इयत्तेत शिकताना विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टी चांगल्याच ओळखीच्या झालेल्या असतात. तरीही गेल्या काही वर्षांपासून दहावीचे प्रस्थ वाढले आहे. दहावी इयत्तेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अधिक अभ्यास कर’, ‘नीट परीक्षा दे’ असे सतत सांगितले जाते. दहावीची परीक्षा म्हणजे वेगळी परीक्षा नाही. अन्य शालेय परीक्षांप्रमाणेच ही परीक्षा असते. यात एकच फरक असतो की, बोर्ड ही परीक्षा घेते. त्यामुळे याला महत्त्व असले तरीही ही परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा नाही, हे पालक आणि विद्यार्थ्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे.
वर्षभर केलेला अभ्यास, परीक्षेत लिहिलेले पेपर या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर येणारा निकाल अवलंबून आहे. दहावीचा निकाल पुढच्या काहीच दिवसांत जाहीर होणार आहे. या निकालात मिळालेल्या यशावर कोणत्या महाविद्यालयात, कोणत्या शाखेत प्रवेश मिळणार हे अवलंबून असते. त्यामुळे चांगले गुण मिळावेत असे सर्वांनाच वाटत असते. पण प्रत्येकाला चांगले गुण मिळणे शक्य नाही. काहींना खूप चांगले, काहींना चांगले तर काहींना वाईट गुण मिळतात, तर काही मुले नापास होतात. पण जो काही निकाल लागेल तो स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. जर निकाल स्वीकारलात तरच विद्यार्थी आणि पालक पुढचा रस्ता शोधू शकतात. त्यामुळे निकाल लागण्याआधी आणि लागल्यानंतरही डोके शांत ठेवणे गरजेचे असल्याचे मत समुपदेशक मुरलीधर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.
पालकांनी आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतेचा आणि आवडीचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याची क्षमता ओळखणे आणि मान्य करण्याची गरज आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी कलमापन चाचणी दिलेली आहे. दहावीत एखादा विद्यार्थी नापास झाला तरीही त्याचे वर्ष फुकट जाणार नाही. कारण, जुलैमध्ये नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना पास होण्याची संधी आहे आणि जरी जुलैच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाला तरीही तणाव घेण्याचे कारण नाही. नापास विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. वर्षभर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्ष फुकट जाणार नाही. विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करताना दहावीचा अभ्यासही करू शकतात. विद्यार्थी नापास झाल्यास त्याच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मुलांना खचू देऊ नये. त्यांना समजून घेऊन अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मोरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनीही निकालाचा जास्त ताण घेऊ नये. जो निकाल लागेल त्याचा स्वीकार करा. दहावीचा निकाल हा शेवटचा निकाल नसतो. यामध्ये अपयश आले तरीही खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे. या काळात ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ताण कमी करण्यासाठी आवडत्या गोष्टी कराव्यात. या कालावधीत नातेसंबंधांवर परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. पालक आणि पाल्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईक, शेजारी काय म्हणतात, त्यांना काय वाटेल याकडे लक्ष देऊ नये. पालक आणि पाल्यांनी मिळून पुढच्या करिअरची वाट शोधणे आवश्यक आहे, असे समुपदेशक बी.के. हयाळीज यांनी सांगितले.