योग स्वीकारा, मानसिक तणाव पळवा

By admin | Published: January 25, 2015 12:48 AM2015-01-25T00:48:56+5:302015-01-25T00:48:56+5:30

कोणतीही नोकरी असो वा व्यवसाय तणावाने सध्या सगळ्यांचेच जीवन व्यापलेले आहे. अगदी पहिल्या इयत्तेतील विद्यार्थीदेखील त्यातून सुटत नाहीत.

Accept yoga, get mental stress | योग स्वीकारा, मानसिक तणाव पळवा

योग स्वीकारा, मानसिक तणाव पळवा

Next

कोणतीही नोकरी असो वा व्यवसाय तणावाने सध्या सगळ्यांचेच जीवन व्यापलेले आहे. अगदी पहिल्या इयत्तेतील विद्यार्थीदेखील त्यातून सुटत नाहीत. तणाव नियंत्रणाचा योग विषयात अगदी मुळापासून विचार केला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून तणावांचे नियोजन करणे सहज शक्य आहे.
कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत सध्या योग विषयावर मूलभूत संशोधन सुरू आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात वाढणारा तणाव रोखण्यासाठी योग हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे त्यांच्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आता कॅलिफोर्नियातील बहुतांश शाळांमध्ये योग विषयाचा समावेश केला जाणार आहे. तर योग शिक्षण अमेरिकेच्या अनेक शाळांमध्ये देणे आता सुरू होत आहे. मानसोपचारातील संशोधनात अमेरिका जगभरात आघाडीवर आहे. त्याला योगविषयक संशोधनाची जोड मिळाल्याने तणावांवर विजय मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत व्हिक्टर कॅरियॉन हे लहान मुलांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक आजारांवर आणि खासकरून तणावांवर गेल्या १५ वर्षांपासून संशोधन करीत आहेत. योगविषयक संशोधनानंतर काही विद्यार्थ्यांवर योगथेरपी केल्यानंतर ते अधिक समंजस बनल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. लहान मुलांच्या शरीरामध्ये लवचीकता असते. पण त्यांच्या हालचाली मंदावलेल्या असतात. त्यांच्या खाण्याच्या सवयीने त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम झालेला असतो. त्या सवयी बदलणे अत्यंत जिकिरीचे असते. त्यातून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा जन्म होतो. खाण्याच्या वाईट सवयी आणि स्वच्छतेअभावी हार्मोन्समध्ये वेगाने बदल झाल्याने त्यांच्या मानसिकतेतही खूप चढ-उतार असतात. ही गुंतागुंत सोडवण्यास पालकांना योग अभ्यासाची नक्की मदत होऊ शकते.

योग तर आपल्या भूमीत निर्माण झालेला आहे. त्यामुळे शारीरिक-मानसिक पातळीवर अत्यंत मूलभूत विचार केलेल्या योग विषयाचा आपणही विचार करायला हवा. तणावासोबतच विशिष्ट विषयातील कौशल्य शिकण्याची मानसिकतादेखील योगविषयक अभ्यासाने तयार होते. सामाजिक-भावनिक मुद्दे समजावून घेण्याची तरलतादेखील योगाने निर्माण होते. ज्यांची विद्यार्थ्यांमध्ये मोठी कमतरता आहे.

शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठीही अमेरिकेत योग विषय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शिक्षणामध्ये गोडी निर्माण करणे योगाच्या माध्यमातून शक्य आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणात-अभ्यासात रस निर्माण होत नाही. त्यांनी योगाभ्यास केल्यानंतर त्यांच्यात मोठे बदल झाल्याचे निरीक्षण अमेरिकेतील शाळांमध्ये नोंदवण्यात आले आहे.

१ योगाचे प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात डिप ब्रिदिंग टेक्निक, उभ्या स्थितीतील आसने यात ताडासन, त्रिकोणासन, उत्कटासन, मानसिक स्वस्थतेसाठी रिलॅक्शेशन टेक्निक आणि ३-४ मिनिटे ध्यान अत्यंत गरजेचे ठरते.

२आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमरेतून मागे वाकण्याची आसनेदेखील खूप उपयोगी ठरतात. वयांचे गट करून त्यांच्यासाठी आसनांची निवड केल्यास शाळांसाठी चांगला अभ्यासक्रम निर्माण होऊ शकतो.

३योगतज्ज्ञांच्या मदतीने शाळांनी-शिक्षकांनी पुढाकार घ्यावा आणि पालकांनी योग विषयासाठी रेटा लावावा, चित्र आपोआप बदलेल. आनंदाने जगण्याचा वेगळा मार्ग याहून निराळा असूच शकत नाही.

Web Title: Accept yoga, get mental stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.