दुर्घटनेस पोषक वातावरण निर्मिती

By admin | Published: August 28, 2015 03:36 AM2015-08-28T03:36:02+5:302015-08-28T03:36:02+5:30

एक काय ती साधी आंघोळ! तिच्यासाठी गोदावरीतले जितके पाणी (त्याचे तीर्थ म्हणे साधू-संत स्वत:ला नदीपात्रात बुचकळवून घेऊन बाहेर पडतात तेव्हां होते) सांडायचे तितकेच द्रव्यदेखील

The accident produces a nutritive atmosphere | दुर्घटनेस पोषक वातावरण निर्मिती

दुर्घटनेस पोषक वातावरण निर्मिती

Next

एक काय ती साधी आंघोळ! तिच्यासाठी गोदावरीतले जितके पाणी (त्याचे तीर्थ म्हणे साधू-संत स्वत:ला नदीपात्रात बुचकळवून घेऊन बाहेर पडतात तेव्हां होते) सांडायचे तितकेच द्रव्यदेखील सांडायचे आणि तरीही क्षणाक्षणाला याच साधू-संतांचा हात त्यांच्या कमंडलुमधील मंतरलेल्या (?) जलात जाणार आणि त्यांचे ओष्ट शापवाणीचे उत्सर्जन करणार, अशी हिणकस पण तरीही सत्याच्या बरीचशी जवळ जाणारी टीका भले बुद्धिप्रामाण्यवादी कितीही करोत, दर तपामागे गोदातिरी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रस्थ वृद्धिंगतच होत चालले आहे. हा कुंभमेळा खरा त्र्यंबकेश्वरी भरणारा की नाशिकमध्ये भरणारा या अत्यंत गहन प्रश्नावर अजूनही साधूसमाजाचे एकमत होण्यास तयार नाही. किंबहुना शैव आणि वैष्णव यांच्यातील द्वंद्वयुद्धाचे ते एक परिमाणही आहे व ते यावश्चन्द्रदिवाकरौ तसेच राहील अशी लक्षणे आहेत. महाभारतात धर्मराजाच्या तोंडी ‘वयं पंचाधिकं शतं’ असे एक वाक्य आहे. म्हणजे आपसात आपण (पांडव आणि कौरव) भले पाच विरुद्ध शंभर असू पण परकीयांसमोर मात्र पुरे एकशेपाचच आहोत! साधूसमाजाचेही तसेच काहीसे आहे. मुळात त्र्यंबक असो की नाशिक असो, तिथे जमणारा साधू समाज हा ज्ञानोपासक नव्हे तर बलोपासक! कोणे एकेकाळी परकीयांच्या आक्रमणापासून हिन्दु धर्माचे कधीही खाडा न करता संरक्षण करणाऱ्या फौजाच त्या, आणि म्हणून त्यांच्या बटालीयन्सना म्हणायचे अखाडे! धर्मरक्षण करायचे म्हणजे सेना सशस्त्र असणे ओघानेच आले. परिणामी आजदेखील या साऱ्या अखाड्यांना प्राणघातक शस्त्रे बाळगण्याची, त्यांचे खेळ वा प्रात्यक्षिके करण्याची आणि क्वचितप्रसंगी वापरदेखील करण्याची विशेष अनुमती! यातील मुद्दा इतकाच की असे नाना रंगाचे, नाना ढंगाचे, नाना हिकमती आणि नाना करामती करणारे साधू एकसमयावच्छेदेकरुन बघायला मिळणार म्हटले की बघ्यांची गर्दी होणारच. त्यातच तेरा महिने चालणाऱ्या सिंहस्थ पर्वकाळात गोदावरीत डुबकी मारली की तोवरच्या साऱ्या पापांचा नाश होणार, ही भावना आपली पाळेमुळे घट्ट रोवून बसलेली. त्यामुळेच संपूर्ण पर्वकाळात किती लक्ष किंवा किती कोटी लोक देश आणि परदेशातून नाशकात येऊन जाणार याचे नुसते अंदाजावर अंदाज बांधले जात आहेत. पण तरीही तेरा महिन्यांपेक्षा अंमळ अधिकचे महत्व प्राप्त आहे ते साधूंच्या आंघोळींच्या म्हणजेच शाही स्नानांच्या दिवसाला. यंदा असे चार दिवस आहेत. पैकी साधूंच्या पहिल्या दोन आंघोळी उभय ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे उद्याच होणार आहेत. साधूंच्या जलक्रीडा याचि देही याचि डोळा बघणे आणि साधलेच तर जिथे त्यांनी या क्रीडा केल्या तिथेच पण त्यांचे सारे यथावकाश पार पडल्यानंतर आपणही क्रीडा करुन घेणे हा म्हणे एक मोठा आकर्षणाचा विषय. तेव्हां लोक येणार, गर्दी करणार आणि या गर्दीचे नियोजन करावे लागणार हे सारे ठीकच. त्यातच पुन्हा गेल्या पर्वणीतील एका शाही स्नानाच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत तेहतीस नागरिकांचा मृत्यु झाल्याने व्यवस्थेने अधिक सतर्क होणे, हेदेखील समजण्यासारखे आणि समजूनही घेण्यासारखे. परंतु अधिकचे सतर्क होणे म्हणजे अधिकचा बिनडोकपणा करणे, अधिकचे नाडणे आणि अव्यवहार्यतेला कुशीत घेणे असा काहीसा अर्थ या कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या कारभाऱ्यांनी लावलेला दिसतो. जो दिवस किंवा जी सकाळ साधूंच्या शाही स्नानासाठी निश्चित आहे, त्याच्या आदल्या रात्रीपासून असे स्नान ज्या रामकुंडात आणि त्र्यंबकेश्वरीच्या कुशावर्तात होणार असते, त्याच्यापासून कमाल पाच ते सात किलोमीटर्सच्या परिघात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी लागू करणे समर्थनीय ठरते. याआधी तसेच होत आले आहे. एकदा का साधूंच्या आंघोळी पार पडल्या आणि ते आपापल्या राहुट्यांमध्ये परतले की सारा ताण तिथेच संपून जातो. पण सलग अठ्ठेचाळीस ते साठ तास केवळ रामकुंड वा कुशावर्ताचाच परिसर नव्हे तर संपूर्ण नाशिक महानगर बंद करुन ठेवणे याला नियोजन वा सतर्कता नव्हे तर आव्हानांपासून केलेले पलायन आणि जबाबदारीचे वहन करण्यातील अक्षमता म्हणतात. या तीन दिवसात नाशकात येणारी प्रत्येक व्यक्ती जणू आंघोळासाठीच येणार आहे असे गृहीत धरुन बाहेरगावाहून येणारी वाहने शहराच्या हद्दीच्याही बाहेर कमाल पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत अडवून ठेवणे यापरता बिनडोकपणा दुसरा असूच शकत नाही. शहराच्या ज्या भागाचा आणि खरे तर या शहरातील मूळ रहिवाशांचा दुरान्वयानेही अशा या आंघोळींशी संबंध नाही व ते तसा येऊदेखील देऊ इच्छित नाहीत त्यांच्या संचारस्वातंत्र्यावर घाला घालणे व पर्यायाने ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या पोटावर पाय आणणे याला तर काही तोडच नाही. जेव्हां शासक कमजोर असतो, तेव्हां ते बारभाई कारभाराला रीतसर निमंत्रणच असते. आज नेमके तेच सुरु आहे. हवा, पाणी, वाफ यांना जितके म्हणून कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल तितके ते अधिक जोमाने उफाळून येत असते आणि तोच न्याय मग लोकांच्या लोंढ्यालाही लागू पडत असतो. याची कैक उदाहरणे सापडू शकतात. पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन जे काही या कथित पुण्यपावन पर्वाच्या निमित्ताने घडविले जाते आहे त्याला दुर्घटनेस पोषक वातावरणाची निर्मिती करणे असेच म्हणतात.

Web Title: The accident produces a nutritive atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.