संचित : कनेक्टिंग द डॉट्स...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:17 AM2020-09-14T03:17:19+5:302020-09-14T03:18:30+5:30
मी पदवीधर नाही. कॉलजेच्या फक्त सहा महिन्यांनंतर मी ड्रॉप आउट झालो आहे.
- स्टीव्ह जॉब्ज
आयुष्याचे बिंदू आपल्याला सांधता आले पाहिजेत. कारण हे बिंदू जोडूनच तुमचं आयुष्य उभं राहात असतं. या संदर्भात माझ्या आयुष्यातलीच एक गोष्ट आहे जी माझ्या जन्माच्या आधी सुरू झाली आहे..
मी पदवीधर नाही. कॉलजेच्या फक्त सहा महिन्यांनंतर मी ड्रॉप आउट झालो आहे. माझी आई एक तरुण, अविवाहित पदवीधर तरुणी होती. मी पोटात असतानाच तिनं मला दत्तक देण्याचा निर्णय घेतला होता. ग्रॅज्युएट असलेल्या दांपत्यालाच मला दत्तक द्यायचं याबाबतचा तिचा निर्णय अतिशय पक्का होता. कारण त्यामुळे मलाही चांगलं, उच्चशिक्षण मिळेल असा तिचा कयास होता; पण तिला नंतर कळलं की ज्यांना मी दत्तक जाणार होतो, ते कायदेशीर पालक पदवीधर नव्हते. हे कळल्यावर मात्र दत्तक विधानाच्या अंतिम कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तिनं स्पष्टपणे नकार दिला. तिच्या खूप विनवण्या केल्यानंतर आणि मी एक दिवस नक्कीच कॉलेजात जाईल असं आश्वासन मिळाल्यानंतरच तिनं कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
त्या घटनेनंतर बरोबर सतरा वर्षांनी मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; पण भोळेपणानं मी जे कॉलेज निवडलं होतं, ते अतिशय महागडं होतं. नोकरदार असलेल्या माझ्या पालकांची होती नव्हती ती सगळी पुंजी कॉलेजच्या ट्यूशन फीमध्येच संपली होती. शिवाय सहा महिने कॉलेजला गेल्यानंतर मला कळलं, या शिक्षणात काहीच राम नाही. म्हणून मी ते शिक्षण सोडलं. पुढे काय, म्हणून आमच्याच कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचा कोर्स मी जॉइन केला. अक्षरांचे वेगवेगळे नमुने, त्यांचे सुंदर घाट हे सगळं मी तिथे शिकलो. भविष्यात त्याचा काही उपयोग होईल, अशीही काही चिन्हं नव्हती. दहा वर्षांनंतर मात्र जेव्हा मॅकिन्टोश कॉम्प्युटर आम्ही डिझाइन करायला घेतला, त्यावेळी कॅलिग्राफीचं ते ज्ञान उपयोगाला आलं आणि सुंदर टायपोग्राफी जन्माला आली. आयुष्याचे बिंदू जोडले जातात ते तसे. ते फक्त आपल्याला नंतर कळतं.
(२००५ साली केलेल्या भाषणाचा सारांश)