हा तर नित्याचा ताप
By admin | Published: February 25, 2016 04:31 AM2016-02-25T04:31:30+5:302016-02-25T04:31:30+5:30
शिवजयंतीच्या दिवशी मराठवाड्यातील एक मुस्लीम फौजदार आणि अन्य कर्मचारी यांची काही कथित शिवभक्तांकरवी सार्वजनिक अप्रतिष्ठा होण्यापूर्वी या पोलिसांनी मागितलेली
शिवजयंतीच्या दिवशी मराठवाड्यातील एक मुस्लीम फौजदार आणि अन्य कर्मचारी यांची काही कथित शिवभक्तांकरवी सार्वजनिक अप्रतिष्ठा होण्यापूर्वी या पोलिसांनी मागितलेली वाढीव कुमक वेळीच पाठविली नाही म्हणून एका पोलीस निरीक्षकाची बदली करणे आणि औरंगाबाद परिक्षेत्राच्या महानिरीक्षकास झाल्या प्रकाराची समग्र चौकशी करण्याचे आदेश देणे यातून फारसे काही साध्य होण्यासारखे नाही. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील पानगाव या लहानशा गावातील संबंधित शिवभक्त युवक गावभर भगवे झेंडे लावत होते. पण जातीय तणावामुळे कुख्यात झालेल्या एका चौकात त्यांना तसे करण्यास संबंधित मुस्लीम फौजदाराने अटकाव केला. त्यावर मोठा जमाव पोलीस ठाण्यावर चाल करुन गेला असता रेणापूरच्या निरीक्षकाकडे वाढीव कुमक पाठविण्याची विनंती केली गेली. पण ही कुमक वेळेवर दाखल झाली नाही. दरम्यान युनूस शेख आणि आवसकर या पोलीस कर्मचाऱ्यांची एकप्रकारे गावातून धिंड काढली गेली व जिथे भगवा फडकविण्यास त्यांनी अटकाव केला होता तिथे त्यांच्याच हस्ते तो फडकविण्यास भाग पाडून त्यांना घोषणा देण्यासही बाध्य केले गेले. या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर पोलिसांनी डझनभर युवकाना अटक केली असली तरी त्यांच्या म्होरक्यांना पोलिसांनी हातही लावला नसल्याचा आणि पोलीस कर्मचारी असूनही पोलीस दल आपल्या पित्याच्या पाठीशी उभे राहिले नसल्याचा आरोप युनूस शेख यांच्या मुलाने केला आहे. वास्तविक पाहाता गावातील जो चौक याआधी दलित आणि सवर्ण यांच्यातील संघर्षाला कारणीभूत ठरला होता तिथे भगवा झेंडा लावून अकारण जातीय तणावास निमंत्रण दिले जाऊ नये यासाठीच संबंधित पोलीस फौजदाराने अटकाव करण्याची भूमिका घेतली होती व ते त्याचे कर्तव्यच होते. ते करण्यापासून त्याला परावृत्त करणे आणि एकप्रकारे दहशत निर्माण करणे व तेदेखील छत्रपतींचे नाव घेऊन हा धिंगाणा झाला व तो निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. तथापि पानगावात अंमळ अधिकच अतिरेक झाला वा एका मुस्लीम पोलीस अधिकाऱ्याचा छळवाद झाला म्हणूनच कदाचित या घटनेची राष्ट्रीय बातमी झाली. पण असा धुडगूस आता संपूर्ण राज्यात सर्रास झाला आहे. एरवी काही संघटना सरकारने मान्य केलेली शिवजयंती मान्य करीत नाहीत. पण धुडगूस घालणाऱ्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते. तथापि केवळ शिवजयंतीच्याच दिवशी असे प्रकार होतात असेही नाही. कोणत्या ना कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या वा सणाच्या नावे गावातील हमरस्त्यावरुन निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे झेंडे घेऊन मोटारसायकल फेऱ्या काढणे व लोकाना वेठीला धरणे अलीकडच्या काळात सर्रास झाले आहे. पोलिसांची परवानगी घेऊन कधीही असले प्रकार होत नसले तरी पोलीस कधीही त्यांना अटकाव करताना दिसत नाहीत. परिणामी हा राज्यातील बहुतेक सर्व गावांमधील नित्याचा ताप झाला असून त्यांना पोलिसांपेक्षा विविध राजकीय पक्ष आणि राजकीय संघटनाचाच चाप लावू शकतात, कारण त्यांच्या आशीर्वादाने आणि अर्थसाह्यानेच हे घडत असते.