जातीय विद्वेषाविरुद्धचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:41 AM2018-01-07T01:41:53+5:302018-01-07T01:42:12+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रज्वलित केलेल्या जनलढ्याचा मुख्य उद्देश होता, तो हजारो वर्षे अजगरासारखा निपचीत पडलेला कणाहिन समूहाला उर्जस्वल करून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे. स्थित्यंतरासाठी तुम्ही कोण होता, कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे आहे, यासाठी त्यांनी ग्रंथसदृश आरसा दाखविला.
- ज. वि. पवार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रज्वलित केलेल्या जनलढ्याचा मुख्य उद्देश होता, तो हजारो वर्षे अजगरासारखा निपचीत पडलेला कणाहिन समूहाला उर्जस्वल करून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे. स्थित्यंतरासाठी तुम्ही कोण होता, कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे आहे, यासाठी त्यांनी ग्रंथसदृश आरसा दाखविला. याचाच एक भाग म्हणजे, दि. १ जानेवारी १९२७ रोजी कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन केले. हे अभिवादन आपल्या पूर्वजांच्या शौर्याला होते. पेशवाईचा खात्मा करणाºया शूर सैनिकांना होते. या अभिवादनानंतर त्याच वर्षी महाड येथील चवदार तळ्यावर २० मार्च रोजी पार पडलेल्या सत्याग्रहाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना, आपल्या अनुयायांना उद्देशून म्हणाले होते की, ‘तुम्ही धरतीला भार का होता?’ हा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा होता की, ‘तुम्ही तुमच्यावरील अन्यायाचा प्रतिकार का करत नाही? बाबासाहेबांनी प्रतिकार करण्याची ऊर्जा ज्या विजयस्तंभाकडून घेतली. त्या विजयाला या वर्षी २०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे सगळे रस्ते कोरेगाव - भीमाकडे वळले होते. याच्या पूर्वसंध्येला एक एल्गार परिषद पुण्यातील शनिवार वाड्यावर घेण्यात आली आणि तिचे नियोजन २५० सामाजिक संघटनांनी केले होते. या संघटना केवळ दलितांच्या नव्हत्या, तर संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनासुद्धा सामील झाल्या होत्या.
‘कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान’मार्फत झालेल्या एल्गार परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला हे काही जातीयवादी संघटनाना खुपू लागले. दुसºया दिवशी म्हणजे, १ जानेवारी रोजी हजारो लोकांनी त्या विजयस्तंभाला अभिवादन करणे म्हणजे आमच्या पराभूततेचे स्मरण करणे, याला पायबंद घालण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्या. विजयस्तंभाला अभिवादन करणाºया लोकांची कोंडी करावी, म्हणून एकप्रकारे बहिष्कार पुकारला. एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या वाहनांची तोडमोड केली. धर्मयुद्ध पेटविण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार पूर्वनियोजित असूनसुद्धा पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत होते. काही नेत्यांच्या आदेशानुसार दंगल पेटली असतानाही महाराष्टÑ शासन त्यांना अभय देत होते. दंगलीचा वणवा पेटला असतानाही हे दंगलखोर कोण आहेत, हे माहिती असूनही सरकार प्रतिबंधक उपाय करीत नव्हते आणि म्हणूनच या प्रेरणा अभियानच्या वतीने अॅड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी ‘महाराष्टÑ बंद’ची हाक दिली. हा प्रकाश अत्यंत शांततेने पार पडावा, असे प्रसारमाध्यमांमार्फत आवाहनही त्यांनी केले आणि आश्चर्याची बाब म्हणजे, मुंबईसह अवघ्या महाराष्टÑाने ‘बंद’ला प्रतिसाद दिला. हा बंद केवळ दलितांसाठी दिला नव्हता. कारण आपल्या स्वत:च्या बळावर दलित समाज ‘बंद’ यशस्वी करू शकत नाही. संविधानावर विश्वास टाकणाºया समस्त लोकशाहीवाद्यांनी समर्थन दिल्यामुळे हा ‘बंद’ यशस्वी झाला. हा संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय ठरला.
‘बंद’ यशस्वी झाल्यामुळे दलित भवितव्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. दलितांचे राजकारण, रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य, असले विषय ऐरणीवर आले आहेत. बंदची हाक महाराष्टÑ लोकशाही आघाडीने इतरांबरोबर दिली व या लोकशाही आघाडीचा अविभाज्य घटक भारिप बहुजन महासंघ आहे आणि तो राजकीय पक्ष आहे, हे मान्य करूनही बंद राजकीय नव्हता. या बंदचा आणि दलित राजकारणाचा दुरान्वयाने संबंध नाही. भारिप बहुजन महासंघ राजकीय पक्ष असला, तरी सत्तांतर करणे हा या संघाचा उद्देश नसून, सामाजिक क्रांती घडवून आणणे हे ध्येय आहे. सत्तांतरापेक्षा स्थित्यंतराला महत्त्व देणारा हा पक्ष आहे. महाराष्टÑातील डाव्या विचारसरणीच्या लोकांचे एकत्रीकरण बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत. ते केवळ व्यवस्थेत आमूलाग्र बदल व्हावा, यासाठीच भारतातील राजकारण असो, अर्थकारण असो, सांस्कृतिकरण असो, त्याचा पाया ‘जात’ हा आहे. तो पायाच उखडून टाकण्यासाठी बाळासाहेब जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. बाबासाहेबांच्या ‘अॅन अनिलियशन आॅॅफ कास्ट’ या ग्रंथाला ७५ वर्षे पूर्ण झाली, तेव्हा जातीच्या निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतला होता, तो बाळासाहेब आंबेडकर यांनीच. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख करू नये,’ अशी भूमिका घेतल्यानंतर, आरक्षणवादी प्रवृत्तीने बाळासाहेबांवर टीकेची झोड उठविली होती. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाºयांना टीकेचे प्रहार सोसावेच लागतात. जे काल बाळासाहेबांविरुद्ध होते, ते आज 'शौर्या'च्या विषयांवर बाळासाहेबांबरोबर आले, हे महत्त्वाचे आहे. ‘रिपब्लिकन पक्षाच्या गटांचे एकत्रीकरण’ हा विषय संपुष्टात आला आहे. कारण सगळी जनता स्वयंस्फूर्तीने बाळासाहेबांचे नेतृत्व मान्य करू लागल्यामुळे, ऐक्य आपोआपच अस्तित्वात येणार आहे. राजकीय ऐक्याचा विचार केल्यास, जे भाजपा सेना यांच्या परिघात आहेत, ते कदाचित या ऐक्यात सामील होणार नाहीत, परंतु एक बाब स्पष्ट झाली आहे की, या नेतृत्वाचे अनुयायी मोठ्या प्रमाणात ‘बंद’मध्ये सामील झाले होते. माझा तर सारखा फोन खणखणत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, बाळासाहेबांना पर्याय नसल्यामुळे ते पक्षबदल करू इच्छितात.
सर्व प्रकारचा वर्चस्ववाद नष्ट करणे आणि त्या आधारे स्वाभिमानाचा विस्तव पेटवित राहणे हे बाबासाहेबांचे विहित कर्तव्य होते. हे मान्य केल्यावर त्या मळवाटेने बाळासाहेब आंबेडकरांचा प्रवास अबाधितपणे सुरू आहे. या मळवाटेने जाताना कदाचित सत्तास्थाने मिळणार नाहीत, पण आत्मतेजाचे दर्शन घडेल. या दर्शनोत्सुकासाठी अधीर झाला आहे, तो समस्त पुरोगामी तरुण. रिपब्लिकन परिघाबाहेर राहिलेले त्यांचे पूर्वजही आता जागरूक झाले आहेत. त्यांची मुले आता आंबेडकर वाचू लागली आहेत. त्यांना आता समजून चुकले आहे की, आता आपले संरक्षक कवच हे फक्त ‘भारतीय संविधान’ हेच आहे. या संविधानावर घाला घालणारे हे माझे शत्रू आहेत आणि जे भारतीय संविधानाचे समर्थक आहेत, तेच माझे मित्र आहेत. या शत्रुविरु द्ध लढण्यासाठी मित्राला सशक्त करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. जातीय विद्वेष विरुद्ध संघर्ष करू पाहणाºया या तरुणाईचे अभिनंदन.
(लेखक आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)