अॅसिड हल्ल्याची धग
By Admin | Published: September 13, 2016 12:30 AM2016-09-13T00:30:28+5:302016-09-13T00:30:28+5:30
सूड भावना आणि एकतर्फी प्रेमातून प्रीती राठी नावाच्या तरुणीवर अत्यंत क्रूरपणे अॅसिड हल्ला करून तिचा जीव घेणारा नराधम अंकुर पनवार याला सत्र न्यायालयाने मृत्युदंड ठोठावून समाजातील
सूड भावना आणि एकतर्फी प्रेमातून प्रीती राठी नावाच्या तरुणीवर अत्यंत क्रूरपणे अॅसिड हल्ला करून तिचा जीव घेणारा नराधम अंकुर पनवार याला सत्र न्यायालयाने मृत्युदंड ठोठावून समाजातील अशा सैतानी वृत्तीला कदापि क्षमा मिळणार नाही, त्यांना आपल्या अमानुष कृत्याची शिक्षा भोगावीच लागेल, हे अधोरेखित केले आहे. दिल्लीतील २०१२ च्या निर्भया हत्याकांडानंतर भारतीय दंड संहितेमध्ये महिलांवरील बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यांबाबत काही कठोर तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्याआधारे बहुदा प्रथमच अॅसिड हल्ल्यातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या पीडितांना नुकसान भरपाई, त्यांचे पुनर्वसन तसेच मोफत उपचाराचीही व्यवस्था या कायद्यात करण्यात आली आहे. त्यासोबतच हे खटले तातडीने निकाली काढण्याचेही प्रयत्न न्यायालयाकडून होत आहेत. परंतु या सर्वांमुळे अॅसिड हल्ल्यातील पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी अॅसिड हल्ले मात्र थांबलेले नाहीत, हे वास्तवही स्वीकारावेच लागेल. सर्वोच्च न्यायालयाने अॅसिड विक्रीवर प्रतिबंध घातले असतानाही बाजारात सहजपणे उपलब्ध होणारे अॅसिड हे सुद्धा यामागील महत्त्वाचे कारण आहे. (आरोपीने राजधानी दिल्लीत अॅसिड खरेदी केले होते) नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१५ मध्ये देशभरात अॅसिड हल्ल्यांचे एकूण ३४९ गुन्हे नोंदविण्यात आले. मागील पाच वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. २०१० साली ५७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या अॅसिड हल्ल्यांना बळी ठरणाऱ्या ८५ टक्के महिला आणि प्रामुख्याने तरुणी आहेत. एखाद्या व्यक्तीला समाजातून आणि जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा हा अत्यंत घृणास्पद असा मार्ग आहे. या गुन्ह्यांना कुठेतरी पुरुषी मानसिकताच कारणीभूत आहे, यात दुमत असू नये. प्रीतीवर अॅसिड हल्ला झाल्यावर ३० दिवस ती प्राणांतिक वेदनांनी तडफडत होती. तिची दृष्टी गेली होती, स्वरयंत्र, श्वसन आणि अन्ननलिका निकामी झाल्या होत्या. अखेर तिने मृत्यूला कवटाळले. पण अशा हल्ल्यांमधून बचावलेल्या मुलींच्या वेदना जाणल्या की त्याची दाहकता आपल्याला कळते. समाजच नव्हे तर कुटुंबीयसुद्धा तिला या अवस्थेत स्वीकारण्यास कचरतात. ऐन तारुण्यात असताना जिवंतपणीच तिला मरणयातना सहन कराव्या लागतात आणि गुन्हेगाराला त्यातच असुरी आनंद मिळत असतो. त्यामुळे या प्रकरणात आरोपीचे कृत्य अत्यंत अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण अगदी योग्य आहे