चाणक्याची मुत्सद्देगिरी आत्मसात करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 02:46 AM2019-03-27T02:46:45+5:302019-03-27T02:47:02+5:30

अलीकडेच दिल्लीतील कौटिल्य इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये माझे व्याख्यान झाले. त्यावेळी मी मत व्यक्त केले होते की, भारतीय मुत्सद्यांना ‘चाणक्य’चे अर्थशास्त्र वाचणे आवश्यक करायला हवे.

Acquire Chanakya rumor! | चाणक्याची मुत्सद्देगिरी आत्मसात करा!

चाणक्याची मुत्सद्देगिरी आत्मसात करा!

Next

- पवन के. वर्मा
(माजी राज्यसभा सदस्य)

अलीकडेच दिल्लीतील कौटिल्य इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये माझे व्याख्यान झाले. त्यावेळी मी मत व्यक्त केले होते की, भारतीय मुत्सद्यांना ‘चाणक्य’चे अर्थशास्त्र वाचणे आवश्यक करायला हवे. माझ्या मतामुळे मी भारतात मुत्सद्देगिरीची कला विकसित करणाऱ्या एका महान तत्त्ववेत्त्याला मानवंदना तर दिलीच, पण त्यांच्या अर्थशास्त्राचाही उदोउदो केला. मॅकीव्हॅलीने ‘द प्रिन्स’ हा ग्रंथ सोळाव्या शतकात लिहिला, पण त्यापूर्वी दीड हजार वर्षे अगोदर चाणक्यने अर्थशास्त्र लिहिले होते. चाणक्यचे अर्थशास्त्र अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर, परिस्थितीत बराच बदल झाला असला, तरी मुत्सद्देगिरी आणि युद्धशास्त्र याबाबत चाणक्यांनी जे लिहून ठेवले आहे, ते आजही कालसंगत वाटते.
स्वत:च्या हेतूंबद्दल स्वच्छता असावी, याविषयी चाणक्य आग्रही होते. ही स्वच्छता असण्यासाठी भावनाविरहित राहून एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करणे गरजेचे असते, तसेच त्या-त्या विषयाचा सांगोपांग विचार करणेही आवश्यक असते. चाणक्यांचा हा सल्ला आजच्या परिस्थितीसाठी वापरला, तर आपल्या लक्षात येईल की, भारताला सरहद्दीवरील केवळ एकाच शत्रू राष्ट्राचा सामना करायचा नाही, तर दोन राष्ट्रांचा- पाकिस्तान आणि चीन सामना करायचा आहे. आपल्या राष्ट्रीय हितांची जपणूक करीत आपल्याला या दोन राष्ट्रांचा सामना करायचा आहे, हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वभौमत्व कायम राखू शकू.
अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाने मसूद अजहर या दहशतवाद्यावर बंदी घालण्याची केलेली मागणी चीनने नकाराधिकाराचा वापर करून जेव्हा फेटाळून लावली, तेव्हा भारताने त्यावर दिलेली प्रतिक्रिया ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती. पाकिस्तान आणि चीन हे मित्र असून ते दोघे केव्हाही भारताच्या विरोधात उभे राहू शकतात. तेव्हा पाकिस्तानची मैत्री गमावण्याचे काम चीनकडून केले जाणार नाही, हेच आपण अपेक्षित ठेवायला हवे होते. ही स्पष्टता असल्यावर चीनच्या वागणुकीवरील आपली प्रतिक्रिया ही तिहेरी स्वरूपाची असायला हवी होती. एक म्हणजे चीनने आपला निर्णय बदलावा, यासाठी त्याची मनधरणी करण्यात आपण वेळ घालवायला नको होता. दुसरे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने अजहरवर घातलेल्या बंदीला फारशी किंमत न देता, आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला करण्यास भारताची तयारी आहे, हे आपण दाखवून द्यायला हवे होते. लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करूनही तो पाकिस्तानात मोकळेपणे हिंडून दहशतवादी कृत्ये करीतच असतो. तिसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादाला सहकार्य करीत असल्याबद्दल चीनचा निषेध करायला हवा होता!
आपले उद्दिष्ट निश्चित असेल, तर त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असू शकतात, असे चाणक्याचे म्हणणे आहे. हे मार्ग अर्थातच साम, दाम, दंड आणि भेद या चार तºहेचे असू शकतात. आणखी एक पाचवा, पण फारसा माहीत नसलेला मार्ग म्हणजे कुंपणावर बसण्याचा! प्रत्येक मार्गाचा निश्चित उपयोग होतो. हे सर्व मार्ग वेगवेगळे वापरता येतात किंवा सर्व समावेशकतेनेही वापरता येतात!! जशी परिस्थिती असेल, त्याप्रमाणे मार्गाचा अवलंब करायचा असतो.
मला कधी-कधी वाटते की, पाकिस्तान आणि चीन या दोन राष्ट्रांनी चाणक्यांच्या तत्त्वांचा आपल्यापेक्षा चांगल्या तºहेने वापर करण्याचे साध्य केले आहे. पाकिस्तान एकीकडे आक्रमण करून दंड, नीती वापरत असतो, तर दुसरीकडे भारताचा अनुनय करून ‘साम’ तत्त्वाचा वापर करीत असतो. पुलवामाच्या हल्ल्यात आणि त्यानंतरच्या घटनाक्रमातून हे स्पष्टच झाले आहे. सर्वप्रथम पाकिस्तानने ‘जैश’ या अतिरेकी संघटनेचा वापर करून आत्मघाती बॉम्बद्वारे सीआरपीएफच्या दलावर हल्ला करून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर पंतप्रधान इम्रानखान यांनी लगेच संवादाची भाषा करीत भारताला चर्चेसाठी पाचारण केले. विध्वंसक भेदात्मक कृती करण्यातही पाकिस्तान तरबेज आहे. पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेने काश्मिरातील स्थानिक भारतीयांचा वापर करून भारताविरुद्ध छुपे युद्ध सुरूच ठेवले आहे. याशिवाय भारतभर त्यांचे स्लीपर सेल कार्यरत असून, त्यांना ते केव्हाही कार्यक्षम करू शकतात. हा भेदाचाच प्रकार आहे.
चीननेदेखील चाणक्यचे तत्त्वज्ञान आत्मसात केलेले दिसते. ‘साम’ तत्त्वाचा वापर करताना चीन बोलणी करीत असतो, पण ती करीत असताना ‘दंड’ तत्त्व कधीही नजरेआड करीत नाही. चीनचे अध्यक्ष शी जिन पिंग सप्टेंबर, २०१४मध्ये भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असताना, चीनचे लष्कर लडाखच्या चुमर क्षेत्रात कसे शिरले होते हे आठवले की, चीनकडून चाणक्य विचारांची कशी अंमलबजावणी करण्यात येते हे स्पष्ट होते.
चाणक्यच्या मते युद्ध हे चार प्रकारचे असते. मंत्र युद्ध (मुत्सद्देगिरीच्या पातळीवर), प्रकाश युद्ध (खुले युद्ध), कूट युद्ध (मनोवैज्ञानिक), गुदा युद्ध (गोपनीय युद्ध). बालाकोटवर हल्ला करून आपण निर्णायक कृती जरूर केली, पण आपली कृती ही नेहमी प्रतिक्रियात्मक राहिली आहे. वास्तविक, ती क्रियात्मक असायला हवी, पण अनेकदा ती तेवढ्यापुरती आणि वायफळ राहिली आहे. दोन हजार वर्षांपूर्वी देशाला मुत्सद्देगिरीचे धडे देणा-या चाणक्यच्या राष्ट्राकडून हे अपेक्षित नाही!

Web Title: Acquire Chanakya rumor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत