अभिनयाचा वस्तुपाठ, रंगभूमीचे व्याकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:46 AM2019-12-19T05:46:13+5:302019-12-19T05:46:36+5:30
लागू म्हणजे विचारवादी कलाकार! जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न उभे राहिले, त्या वेळी ते ठामपणे प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहिले.
कलेच्या, विशेषत: नाटकाच्या प्रांतात काम करत असताना यापेक्षा अधिक काय चांगले, असा विचार नेहमीच केला जातो. वाटचाल करत असताना कायमच एखाद्या दीपस्तंभाची गरज असते. आपल्या भवताली कोणाच्या तरी रूपाने तो तेवत असतो. सुरुवातीच्या काळात बालगंधर्व, त्यानंतर राम गणेश गडकरी, देवल, दिवाकर, नानासाहेब फाटक अशी दिग्गज मंडळी होऊन गेली. भालबा केळकर आम्हाला गणपतराव जोशींचे किस्से सांगत असत.
स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारतीय रंगभूमीची जडणघडण होऊ लागली, प्रांतीय आदानप्रदान होऊ लागले. साठ-सत्तरच्या दशकात नवीन संवेदना विकसित होऊ लागल्या. त्या वेळी अभिनयाच्या क्षेत्रात चांगला अभिनय कोणता, असा प्रश्न पुढे आला की नेहमी त्रिकूटाचे नाव समोर येत असे. बंगालमध्ये शंभू मित्र, उत्पल दत्त आणि महाराष्ट्रामध्ये डॉ. श्रीराम लागू ही नावे अग्रणी राहिली. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी रंगभूमीवर नवनवीन प्रयोग केले. भूमिकेतील अचूकता आणि बारकावे, स्पष्ट शब्दोच्चार, धारदार आवाज आणि नाटककाराच्या आशयाला अधोरेखित करण्याची त्यांची प्रक्रिया केवळ अविस्मरणीय आणि लाजवाब! डॉ. लागू रूढार्थाने ट्रेंड अॅक्टर नव्हते. परंतु, उभरत्या काळात त्यांनी युरोपमध्ये समृद्ध रंगभूमी पाहिली होती. त्या काळात त्यांच्यावर तेथील रंगभूमीचे संस्कार झाले असावेत. पाश्चिमात्य रंगभूमीवरील लॉरेन्स आॅलिव्हिए यांच्यासारख्या अभिनेत्याच्या तोडीस तोड असे डॉ. लागू होते. त्यांच्याकडे नजर ठेवून प्रत्येक जण आपापली पायरी ओळखून असायचा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आदरयुक्त भीती होती. डॉ. लागू यांच्याकडे विचारांची स्पष्टता होती.
सर्वसामान्य माणसालाही त्यांची आदरयुक्त भीती वाटायची. आपल्या अंगणात वर्षानुवर्षे उभा असलेला वटवृक्ष असावा, तशा त्यांच्या अभिनयाच्या छटा रंगभूमीवर पारंब्यांप्रमाणे रुळल्या आहेत. त्यांच्या जाण्याने हे सगळेच दृष्टीआड झाले आहे. नटाने कसे जगावे, व्यक्तिगत आयुष्यात कसे असावे, विचारांशी कशा प्रकारे ठाम राहावे, आपल्या संपत्तीचे निराकरण कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठ डॉ. लागू यांनी घालून दिला. आपल्या दानशूर वृत्तीचा त्यांनी कधीही गाजावाजा केला नाही. अनेक पडद्यामागच्या कलाकारांना, गरजूंना त्यांनी सढळ हाताने मदत केली. अनेक संस्थांसाठी मदतीचा हात पुढे केला. बाबा आढाव यांची अडचण समजल्यावर डॉ. लागू, निळू फुले आणि रोहिणी हट्टंगडी यांनी ‘लग्नाची बेडी’ नाटकाचा दौरा महाराष्ट्रभर केला. त्यातून कोणताही गाजावाजा न करता निधी उपलब्ध करून दिला. सरकार दरबारापासून डॉक्टर नेहमी लांब राहिले. आपल्या विचारांवर कायम त्यांनी निष्ठा राखली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कायमच पुरस्कार केला. आणीबाणीसारख्या प्रसंगांमध्येही ते ठामपणे उभे राहिले. कलेच्या माध्यमातून त्यांनी आणीबाणीला विरोध केला. डॉ. लागू यांनी ‘अँटिगनी’ हे नाटक ‘एक होती राणी’ या नावाने रंगभूमीवर आणले. यामध्ये दीपाने प्रमुख भूमिका केली. डॉ. श्रीराम लागू यांचा प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या संस्थेमध्ये सहभाग होता. १९५१ मध्ये भालबा केळकर यांच्या मदतीने त्यांनी संस्था स्थापन केली. संस्थेमध्ये आपल्याला न पेलवणारी वेगळी विचारसरणी आहे, हे लक्षात येताच ते बाजूला झाले. विजया मेहता यांच्या सान्निध्यात गेल्यावर त्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता आणि विजय तेंडुलकर या त्रिकूटाने आधुनिक मराठी रंगभूमीला नवा आयाम प्राप्त करून दिला. डॉ. लागूंच्या निधनाने आम्हा कलाकारांसमोरील दीपस्तंभ हरवला आहे. लोकप्रिय चित्रपटांमध्ये किरकोळ भूमिका करून पैसे मिळवावेत आणि त्या पैशांचे निराकरण आपल्याला जी रंगभूमी पटते, जो विचार पटतो त्यासाठी करावे, अशा पद्धतीने त्यांनी काम केले. ते ४० वर्षांचे असताना आफ्रिकेहून स्वत:ची प्रॅक्टिस सोडून आले. आपल्याला पटेल त्याच पद्धतीने त्यांनी रंगभूमीवर वावर ठेवला. चित्रपटांमधून मिळालेल्या पैशांचे निराकरण त्यांनी समाजाला मदत होईल, अशा पद्धतीनेच केले.
लागू म्हणजे विचारवादी कलाकार! जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न उभे राहिले, त्या वेळी ते ठामपणे प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहिले. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बार्इंडर’च्या वेळी कलाकार आणि नाटककारांना त्यांनी भक्कम पाठिंबा दिला. ‘गिधाडे’ या नाटकाला कोणी हात लावत नव्हते. त्या वेळी डॉ. लागू सेन्सॉर बोर्डाशी भांडले आणि त्यांनी ते नाटक रंगभूमीवर आणले. ते कायम ठाम विचारांनी जगले. त्यांचे वडील गांधीवादी होते, त्यामुळे त्यांच्यावर या विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांच्या विचारांचा कल समाजवादी विचारसरणीकडे झुकणारा होता. डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने अभिनयाची शाळाच काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांनी अभिनयाचा वस्तुपाठ आणि रंगभूमीचे व्याकरणच प्रत्यक्षात आणले. आपण केवळ मराठीच नव्हे, तर जागतिक रंगभूमीवरचा एक मोठा नट गमावला आहे. त्यांचा अभिनय खूप प्रगल्भ आणि कलाकारांना खूप काही शिकवणारा असायचा. त्यांचे ‘सॉक्रेटिस’चे २० मिनिटांचे स्वगत ज्यांनी ऐकले असेल, त्यांचे आयुष्य सार्थकी लागले असे मला वाटते. गणपतराव जोशी यांच्याप्रमाणे लागू यांच्या अभिनयाच्या, माणुसकीच्या छटा कायम मनावर अधिराज्य करतील.
सतीश आळेकर
ज्येष्ठ नाटककार