चिंतनासोबत कृती हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:27 AM2018-07-24T04:27:34+5:302018-07-24T04:28:14+5:30
वायुप्रदूषणामुळे मेंदूरोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले असून जगात दरवर्षी ९० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत.
वायुप्रदूषणाच्या चक्रव्यूहातून सुटका व्हावी, यासाठी जगभरातील संशोधक सातत्याने प्रयत्नशील आहेत. याचा धोका आता सर्वसामान्यांच्या घरातील चौकटीपर्यंत येऊन पोहोचला आहे. वायुप्रदूषणामुळे मेंदूरोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले असून जगात दरवर्षी ९० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. भारतात हीच संख्या १८ लाख आहे. चिंतेची बाब म्हणजे ३० टक्के लोकांना यामुळेच पक्षाघात होत आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या संशोधनातून समोर आले आहे. वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांवर जगभरात विविध पातळ्यांवर चिंतन सुरू आहे. २०१५ मध्ये पॅरिस येथे संयुक्त राष्ट्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हवामान बदलाच्या परिषदेमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली होती. यानंतर अनेक देशांनी यासंदर्भात कठोर पावलेदेखील उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र आपल्या देशात अद्यापही वायुप्रदूषणाला हवे तेवढे गंभीरतेने घेण्यात आलेले नाही हे दुर्दैव आहे. देशातील कुठल्याही शहरातील रस्त्यांवर मोकळा श्वास घेण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. नेतेमंडळींकडून मोठमोठे दावे निश्चित करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात ‘सायलेन्सर’मधून निघणाऱ्या धुराप्रमाणे हे दावे कधी हवेत मिसळून जातात हे कळतदेखील नाही. कागदावरील उपाययोजना या अद्यापही प्रत्यक्षात फारशा उतरलेल्या नाहीत. देशात ‘आयआयटी’, ‘नीरी’ इत्यादी ठिकाणी मौलिक संशोधन सुरू आहे. मात्र प्रयोगशाळा व चर्चासत्रांच्या चौकटींमध्येच हे संशोधन बंद झाले आहे. आपल्याकडे प्रदूषणाबाबत जनजागृती म्हटली की एक छोटेखानी कार्यक्रम, हारतुरे, पाहुण्यांचे स्वागत, फोटोग्राफी व त्यानंतर पेपरबाजी असा ठराविक क्रम असतो. असेच सुरू राहिले तर सर्वार्थाने जागृती होणे अशक्यप्राय बाब आहे. मुळात कुठल्याही प्रदूषणावर नियंत्रण आणणे ही केवळ कुठल्याही एका संस्थेची जबाबदारी नाही. ही सामाजिक समस्या समजून सर्वंकष व एकत्रितपणे प्रयत्नांची आवश्यकता आहे. समाजातील प्रत्येक स्तरांतून यात सहभाग होणे ही काळाची गरज आहे. राजकारण्यांनीदेखील संशोधकांच्या शिफारसी गंभीरतेने घेतल्या तरच खºया अर्थाने उद्दीष्ट गाठणे शक्य होणार आहे. वायुप्रदूषणाबाबत शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हायला हवी. संबंधित विषयाचे गुण व पुस्तकांच्या जगाबाहेर आणून विद्यार्थ्यांना अगदी मूलभूत बाबी सांगण्यावर भर देणे अपेक्षित आहे. कुठल्याही गोष्टीचे चिंतन हे आवश्यकच असते. मात्र हे चिंतन आत्मचिंतनात बदलले नाही, तर मग चिंता वाढायला सुरुवात होते. भविष्यातील धोका ओळखून केवळ चिंतन की ठोस कृती हे ठरविण्याची वेळ आली आहे.