‘मारो ना पिचकारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:15 AM2018-08-20T06:15:10+5:302018-08-20T06:17:07+5:30

सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचा निर्धार नागरिकांनी केला तरच शहर स्वच्छ राहील.

action started in nagpur against people who spits in public places | ‘मारो ना पिचकारी’

‘मारो ना पिचकारी’

Next

उपराजधानीतील पोलिसांनी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याने समस्त थुंकीबहाद्दरांच्या जीवाचा किती थयथयाट झाला असणार याची कल्पना न केलेली बरी. काहींवर तर गुन्हेही दाखल झाले आहेत म्हणे. पोलिसांच्या हातून हा प्रमाद घडलाच कसा? ते ही स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिकांविरुद्ध; ज्यांना कुठेही, केव्हाही आणि कसेही थुंकण्याचा अधिकार बहाल झालायं. (असं ते मानतात) आम्हाला कुणीही रोखू शकत नाही अशा अविर्भावात पिचकाºया उडविणाºया आणि त्यातच खरा राष्ट्राभिमान मानणाऱ्या या महाभागांचे आता कसे होणार. बसमध्ये असो, कारमध्ये वा दुचाकीवर आजूबाजूने जाणाºयांचा थोडाही विचार न करता आपल्या तोंडातली घाण थुंकणाºयांना आता आपली ही हौस कशी भागविता येणार? कारण सार्वजनिक ठिकाणी थुंकून प्रदूषण करणारी, लोकांचे आरोग्य धोक्यात आणणारी ही मंडळी स्वत:च्या घरात थुंकत नसणारच याची शंभर टक्के खात्री आहे. खरे तर अशा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासोबतच थुंकलेली जागासुद्धा स्वच्छ करण्यास त्यांना बाध्य केले पाहिजे. असे अनारोग्य पसरविण्याचा अधिकार यांना दिला कुणी? सार्वजनिक स्वच्छता हा तसा कायमच दुर्लक्षित राहिलेला विषय. ही जबाबदारी केवळ सरकारचीच नाहीतर आमचीपण आहे याचे भान आम्हाला स्वातंत्र्याची सत्तरी उलटून गेल्यावरही आलेले नाही. थुंकणे हा त्यातील अत्यंत किळसवाणा प्रकार. पु.ल.देशपांडेंच्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘शिंके, फुंके आणि थुंके’ असे तीन प्रकार आहेत. विदर्भात थुंक्यांची संख्या जास्त आहे. कारण या भागात तंबाखुयुक्त गुटखा खाणारे प्रचंड आहेत. शासकीय कार्यालये आणि रस्ते तर सोडाच रुग्णालयांतही सर्व भिंती पान-तंबाखू खाऊन थुंकणाºयांनी रंगविलेल्या असतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे घाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती असूनही आम्ही असे का वागतो? बरेच लोक आपले घर स्वच्छ ठेवतात पण बाहेर पडले की त्यांच्यात अस्वच्छतेचे भूत संचारते. एक परिचित सिंगापूरला गेले होते. परतल्यावर जाम नाराज. यापुढे कधीही सिंगापूरला जाणार नाही,अशी प्रतिज्ञाच त्यांनी घेतली. कारण काय तर तेथे थुंकण्यास मनाई आहे. हा काय प्रकार आहे? थुंकायला काय भारतात येणार होतो काय? असा उलटप्रश्न. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मोठा दंड भरावा लागेल, वेळप्रसंगी तुरुंगातही जावे लागेल हे कळल्यावर त्यांची पंढरी घाबरली होती. त्यात पुन्हा तुरुंगातही थुंकण्यावर बंदी. थुंकायचेच नाही म्हटल्यावर जगायचे कसे? असा यक्षप्रश्न त्यांना पडला होता म्हणे. आता पोलिसांनी आपली कारवाई अशीच युद्धपातळीवर सुरू ठेवली तर येथेही असेच होणार आहे, हे या थुंकीबहाद्दरांनी ध्यानात ठेवावे. लोकांनीही या मोहिमेत स्वेच्छेने सहभागी होण्याची गरज आहे. कारण सरकारने स्वच्छतेसाठी कितीही निधी खर्च केला तरी लोकांच्या सहभागाशिवाय ते शक्य नाही. सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचा निर्धार नागरिकांनी केला तरच शहर स्वच्छ राहील.

 

Web Title: action started in nagpur against people who spits in public places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर