खरेच न्याय झाला?

By admin | Published: December 10, 2015 11:47 PM2015-12-10T23:47:28+5:302015-12-10T23:47:28+5:30

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही.

Actually got justice? | खरेच न्याय झाला?

खरेच न्याय झाला?

Next

सलमान खान, त्याचे कुटुंब आणि त्याचे अगणित चाहते यांना गुरुवारच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे नक्कीच हायसे वाटले असणार यात शंका नाही. तेरा वर्षे एका मानसिक तणावाखाली वावरल्यानंतर आणि आपल्या शिरावरील मनुष्यहत्त्येचा डाग धुऊन निघाल्यानंतर कोणालाही हायसे वाटणारच. पण हा डाग धुऊन निघताना खरोखरीच न्याय झाला का हा प्रश्न मात्र शिल्लकच राहणार आहे. सप्टेंबर २००२मध्ये सलमान ज्या मोटारीतून मुंबई शहरात प्रवास करीत होता त्या मोटारीला वान्द्रे परिसरात अपघात होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य चौघे जखमी झाले. सत्र न्यायालयाने समोर आलेले पुरावे आणि साक्षी लक्षात घेऊन कामगाराच्या मृत्युस सलमान जबाबदार असल्याचे मान्य केले व गेल्या मे महिन्यात त्यास पाच वर्षांची शिक्षाही सुनावली. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली असता न्या.ए.आर.जोशी यांनी त्याची सर्व आरोपांमधून मुक्तता केली. सत्र न्यायालयास जे पुरावे शिक्षा करण्यासाठी पर्याप्त वाटले ते पुरावे आणि घेतल्या गेलेल्या साक्षी निर्विवादपणे सलमानचा कथित गुन्हा सिद्ध करु शकत नाहीत असे न्या. जोशी यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. याचा ठपका अर्थातच सदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर जातो. ज्या वाहनास अपघात झाला ते वाहन स्वत: सलमान चालवीत होता का, तसे करताना त्याने मद्यप्राशन केले होते का, टायर फुटण्यामुळे त्याच्या वाहनाला अपघात झाला की अपघातानंतर ते फुटले आणि जो कामगार मरण पावला तो नेमका सलमानच्या मोटारीखालीच मयत झाला का क्रेनखाली दबून मेला, या चार मुद्यांच्या भोवतीच सारा तपास आणि सारा खटला फिरत राहिला. त्यात सलमानच्या संरक्षणासाठी तैनात पोलीस रवीन्द्र पाटील (कालांतराने त्याचे निधन झाले) अपघाताच्या वेळी सलमानसोबतच असल्याने त्याच्या साक्षीला सत्र न्यायालयाने महत्व दिले. पण उच्च न्यायालयाने त्याची साक्षच अविश्वासार्ह ठरविली. चार जखमींच्या साक्षीमध्येही वरिष्ठ न्यायालयास विसंगती आढळून आली. पोलिसांच्या एकूणच कामगिरीवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून गुन्हेगाराचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध करण्याची जी जबाबदारी तपासी यंत्रणेवर असते ती नीट पार पाडली गेली नाही असे म्हटले आहे. याचा सारांशात मतलब इतकाच की सलमान खानला संशयाचा लाभ मिळाला असून असा संशय निर्माण करण्याचे कार्य पोलिसांनी केले आहे. तरीही जे पुरावे त्याला दोषी ठरविण्यास पुरेसे असतात तेच पुढे निरुपयोगी सिद्ध होतात तेव्हां या प्रकरणात खरोखरीच न्याय झाला की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच.

 

Web Title: Actually got justice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.