निवडणुकीनंतरची जोड-तोड

By admin | Published: October 11, 2014 05:20 AM2014-10-11T05:20:38+5:302014-10-11T05:28:46+5:30

युती-आघाडीचा संसार वा-यावर आल्याने एकहाती सत्ता हे आता दिवास्वप्न असून, ‘टेकूंचे राज्य’ ही अपरिहार्यता असेल! हा टेकू कोणाचा व कोणाला असेल

Addition to post-election | निवडणुकीनंतरची जोड-तोड

निवडणुकीनंतरची जोड-तोड

Next

रघुनाथ पांडे (विशेष प्रतिनिधी, लोकमत समूह, नवी दिल्ली) - 
युती-आघाडीचा संसार वा-यावर आल्याने एकहाती सत्ता हे आता दिवास्वप्न असून, ‘टेकूंचे राज्य’ ही अपरिहार्यता असेल! हा टेकू कोणाचा व कोणाला असेल? प्रचारात जीभ सैल सोडत कुरघोडी सुरू असली तरी निकालानंतर मैत्रीचे पोवाडे कोण कुणाचे व कसे गाईल याचा नेम नाही. ज्या मुद्द्यावरून पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीची स्थापना केली त्यानंतरची १५ वर्षे ते काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेच. या बदलाबाबत कोणी विचारले का ‘साहेबांना’?
संख्येच्या कारणावरून युती तुटेपर्यंत भाजपा का अडून होती? अलीकडची चार वर्षे सत्तेत असूनही राष्ट्रवादीने काँग्रेसला लक्ष्य केले होते. सहमती व सलोख्याचे तर कधी नाईलाजाचे राजकारण सुरू होते. त्याची कबुली आता पृथ्वीराज चव्हाण देतच आहेत. पवारांचे दिल्लीतील राजकीय स्थान चव्हाण यांना ठावूक असल्याने चव्हाण पवारांशी भिडले होते. त्यामुळेच राजकीय धक्कातंत्रात माहीर असलेल्या पवारांच्या एक पाऊल पुढे चव्हाणांनी टाकले. लोकांमधून निवडून या, असे सांगणारे पवार राज्यसभेत प्रवेशले व त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचे बारामतीत मताधिक्य ओसरले तेव्हापासून पवार नावाच्या ‘राजकीय भास्कराचार्याला’ धक्का देण्याचे काँग्रेसने मनोमन ठरविले! पवार आता कबूल करतात, ‘आघाडी होईल म्हणून आम्ही आश्वस्त होतो, निवडणूक सोबतीने लढायची सवय असल्याने ऐनवेळी खूप ठिकाणी अडचण निर्माण झाली.’ ‘धोरण लकव्या’ची जाहीर टवाळी, नंतर ‘मुख्यमंत्री हटाओ मोहीम’, लोकसभा निवडणुकीची पराभव मीमांसा सुरू असताना अँटोनी समितीपुढे काँग्रेस नेत्यांची उफाळलेली महत्त्वाकांक्षा, चव्हाण विरुद्ध मंत्री असा वाद, तो शमत नाही तोच राणेंचे कथित बंड, मग मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग... असे सारेच बाण कोणाच्या भात्यातून येत होते, ते १०, जनपथला पटवून देण्यात चव्हाण यशस्वी झाले. ठंडा करके खाओ, या राजधानीतील राजकीय प्रमेयाने आघाडी तुटली. राजकारणात एकाएकी काहीच घडत नाही.
प्रादेशिक पक्षाची नाळ लोकांशी कितीही जुळली असली, तरी ती तोडायची. त्याखेरीज केंद्रात किंवा राज्यातही एकहाती सत्ता येत नाही या विचाराचे पुन्हा दृढीकरण होऊ लागले आहे. निवडणुकीच्या ऐन पुढ्यात दोस्तांना गाफिल ठेवत भाजपा व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी तेच केले. पक्ष असेल तर पुढेही सत्ता मिळेल, हे लक्षात घेऊन पवार व ठाकरे यांनी पक्षाला बळ देण्याचे ठरविले, हाच या स्वबळाच्या लढाईचा अन्वयार्थ...! एक मात्र खरं, प्रचारात काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पवार किंवा राष्ट्रवादीला लक्ष्य केले नाही, याउलट शिवसेनेला विरोधक मानत नाही, अशी साखरपेरणी करत भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेला आडव्या हाताने घेतले, तर शिवसेनेने ‘त्यांना काशीला पाठवा’ अशी जाहिरात करून थेट पंतप्रधानांनाच बोचकारले. असे घडले असले तरी नवी समीकरणे पुढे येऊ शकतात. चौघेही बहुमताची खात्री देत असले, तरी परिस्थिती तशी अजिबात नाही. किमान ४० चे संख्याबळ अपुरे पडेल व ‘साथी हात बढाना ’हे निवडणूक प्रचारातून हद्दपार झालेले गाणे राजकीय नेते आळवतील व टेकू घेतील.
उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सांगितले, की पवार यांना सरकारमध्ये घेण्यास भाजपाचे नेते उत्सुक होते. आठवले, शेट्टी, जानकर या भाजपाच्या कच्छपी लागलेल्या नेत्यांचा उल्लेख करून त्यांनी हा दाखला दिला. ४० वर्षांच्या राजकारणात कधीही भाजपा-शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांसोबत गेलो नाही, असे सांगून पवार शक्यता नाकारत असले, तरी जिल्हा परिषदेपासून सुरू होणारी सत्ताही ते नाकारत नाहीत, हे वास्तव आहे. ‘साबरमती ते बारामती’ हा मैत्रीचा सेतू आधीच बांधला गेला आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी पवार-एनडीए मैत्रीचा बॉम्बगोळा टाकल्याने भाजपाचे निम्मे काम सोपे केले आहे. पवार जेव्हा कृषिमंत्री होते, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींशी त्यांचे सूत चांगले जुळायचे. गुजरातच्या भूकंपाचे आपत्ती व्यवस्थापन करताना पवारांनी कसे नियोजन केले होते, याचे दाखलेही मोदींनी दिले होते. आता नेपथ्य बदलले. मोदी पंतप्रधान झाल्यावर सर्वप्रथम राज्यातील दुष्काळाच्या मदतीसाठी व भाजपाआधी पवारांनी भेट घेतली होती. ही मुत्सद्देगिरी संपत नाही, तोच काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादी असतानाही, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विमा विधेयकावर पवारांनी भाजपाची साथ केली होती.
युती तुटल्याने अवजड उद्योगमंत्री अनंत गिते राजीनामा देतील असे चित्र असताना निकालानंतरच्या संख्याबळावरून शिवसेना भाजपाला पुन्हा ताणेल, असेच दिसते. मुंबईला परतल्यावर गिते राजीनामा देतील असे बोलले जात होते. ते अजूनही घडले नाही. उलट, गितेंनी राजीनाम्याची घाई करू नये, असा सल्ला गडकरींनी दिला. त्यापाठोपाठच युती तुटायला नको होती, भाजपा देशात मोठा पक्ष असला तरी राज्यात प्रादेशिक पक्षांची ताकद अधिक असते, याचे भान भाजपा नेत्यांनी बाळगायला हवे होते, असा वडीलकीचा सल्ला भाजपाचे सल्लागार लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या महाराष्ट्रातील सभांना प्रारंभ होण्याच्या एकच दिवस आधी दिल्याने गुंतागुंत कमालीची वाढली व पक्षात समन्वय नाही हेही अधोरेखित झाले. दिल्लीचे आम्हाला सांगू नका, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, अशी दरडवणारी भाषणे करणाऱ्या शिवसेनेने गितेंच्या घटनाक्रमावरून ‘गल्लीत गोंधळ व दिल्लीत मुजरा’ हा प्रयोगही दिल्लीकरांना दाखवला म्हणूनच भाजपा म्हणत असावी, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा..!!’
ओढाताणीच्या खुमखुमीत आघाडी तुटली. पण राजकीय संधानात, सत्तेच्या जोडकामात दिल्ली नेहमी आशावादी असते. संख्याबळावर नवी जोडकामे होऊ शकतात. ताटातुटीच्या मौसमात वातावरणात ताण असताना, अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात गप्पांचा फड रंगला होता. काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी पत्रकारांच्या गराड्यात म्हणाले,
कोई मंजिल हो , बहोत दूर ही होती है ।
मगर, रास्ते वापसी कें लंबे नही होते...

Web Title: Addition to post-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.